तेजोमयीच्या सोसायटीच्या बाजूला एक इंटरनॅशनल स्कूल आहे. ही तशी श्रीमंतांची म्हणा किंवा हायफाय लोकांची शाळा. कारण या शाळेतील सगळी मुलं मुली त्यांच्या आईबाबांच्या चकचकीत महागड्या गाडीतून येतात. या शाळेत दररोज नृत्य, गाणी, वक्तृत्व स्पर्धा असे कोणते ना कोणते कार्यक्रम होतात. त्यासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर केला जातो. त्याचा आवाज खूपच मोठा ठेवला जातो. दररोजच्या प्रार्थनेच्या वेळीही ध्वनीक्षेपकाचा आवाज असाच मोठा असतो.
या कर्कश आवाजामुळे सोसायटीतील आजी आजोबांना त्रास होतोच पण शेपूटवाल्या दोस्तांनाही त्रास होतो.
सोसायटीच्या अध्यक्षांनी बरेचदा शाळेच्या मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार करुनही काहीच उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस त्रास वाढतच चालला होता. पोलिसांकडे तक्रार करावी का? यावर सोसायटीच्या सभेत चर्चेत चर्चा झाली. पण त्याआधी शिष्टमंडळानं मुख्याध्यापकांना भेटून त्यांना आजूबाजूच्या सोसायटितील वृध्दांना आणि प्राण्यांना होणारा त्रास समजून सांगावा, असं एकमतानं ठरलं. त्यासाठी एक युक्ती तेजोमयीच्या बाबांनी सुचली. त्यांनी अध्यक्षांच्या कानात ती टाकली. त्यांनी सगळयांना सांगितली.
रितसर वेळ घेऊन सोसायटीचे शिष्टमंडळ या शाळेत गेले. मुख्याध्यापकांच्या दालनात गेल्यावर तेजोमयीच्या बाबांनी अचानक मोबाइलच्या यूट्युबूमधील एक गाणं पूर्ण आवाजात सुरु केलं. हे बघून इतरांनीही अशीच कृती केली. आवाजाच्या या गोंगाटानं मुख्याध्यापक गांगरुन गेले. त्यांना या शिष्टमंडळाचा खूप राग आला. तो त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसू लागला.
“स्टॉप इट, स्टॉप इट. थांबवा थांबवा हा आवाज.” ते रागाने ओरडले नि त्यांनी त्यांच्या टेबलवरची छडी धाडकन आदळली. कानावर हात ठेवले.
“काय झालं सर इतकं रागावायला नि कानावर हात ठेवायला?” तेजोमयीच्या बाबांनी गंभिर चेहऱ्यानं विचारलं.
“अहो, काय झालं म्हणून काय विचारता? किती मोठ्याने तुम्ही सर्वांनी मोबाइलमधील गाणी लावलित. मला त्रास देण्यासाठीच हे असं करताहात ना तुम्ही” मुख्याध्यापकांचा पारा आता फार चढला होता.
“आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी आलो नाहीत सर.”
“मग हे हे काय? इतका मोठा आवाज म्हणजे किती मोठं साऊंड पोल्यूशन, किती मोठं ध्वनी प्रदूषण, हे तुमच्यासारख्या सुशिक्षितांच्या लक्षात यायला नको का?” मुख्याध्यापकांचा राग काही कमी होत नव्हता. त्यांच्या तोंडून ध्वनीप्रदूषणाचा उल्लेख होताच तेजोमयीच्या बाबांनी मोबाइल बंद केला. इतरांनिही तेच केलं. केबिनमध्ये शांतता पसरली. मुख्याध्यापकांनी गटागटा पाणी पिलं. गोंगाटामुळे ते बरेच अस्वस्थ झाले होते. त्यांच्या कपाळावरुन घाम ओघळू लागला होता.
आवाजाचा गोंगाट थांबताच मुख्याध्यापकांना हायसं वाटलं. त्यांनी कपाळावरचा घाम पुसला. ते काही बोलणार तोच तेजोमयीचे बाबा त्यांना म्हणाले,
“सर एवढ्याशा आवाजानं तुम्हाला ध्वनीप्रदूषण, साउंड पोल्यूशनचा त्रास व्हायला लागला. पण दररोज तुमच्या शाळेत वेगवेगळ्या कार्यासाठी ध्वनीक्षेपणातून आवाजाचा दणदणाट होतो, तेव्हा आजूबाजूच्या सोसायटीतील वृध्दांना, प्राण्यांना आणि जे काही चार-दोन पक्षी आपल्या आभाळात उडताना दिसतात, त्यांना किती त्रास होत असेल, ते किती अस्वस्थ होत असतील, याची काही कल्पना आहे का तुम्हाला?”
“नाही म्हणजे हो, म्हणजे तसा काही आमचा हेतू नाही, म्हणजे…” असं काहीतरी मुख्याध्यपक त त प प करु लागले.
“अहो सर, तुमच्या शाळेत मुलांना तुम्ही ध्वनीप्रदूषणाचा धडा शिकवत असालचना. जे शिकवता त्याच्या अगदी उलटं तुम्ही वागता. हे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, असं झालं.” अध्यक्ष म्हणाले.
“अशाने मुलांना कसं काय महत्व कळणार ध्वनीप्रदूषणांचं? त्यांना तर हा विनोदच वाटणार.” सचिवांनी मुद्दा मांडला.
ही मात्रा चांगलीच लागू पडली. मुख्याध्यापकांनी चमकून सगळ्यांकडे बघितलं. त्यांच्या कपाळावर पुन्हा घाम आला. तेजोमयीच्या बाबांनी त्यांना पाणी दिलं. मुख्याध्यापकांनी कपाळावरचा घाम पुसला. सर्वांसमोर हात जोडून त्यांनी क्षमा मागितली. यापुढे कधीही ध्वनीक्षेपकाचा असा वापर करणार नाही हे त्यांनी कबूल केलं.
जाता जाता तेजोमयीचे बाबा म्हणाले, “सर, शाळेत शिकवणारे धडे, मुलांनी त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात तसेच गिरवायचे असतील तर, जे तुम्ही शिकवता, तसच नको का वागायला?”
मुख्यध्यापकांनी आपली चूक मान्य केली. यापुढे असं काहीही घडणार नाही हे त्यांनी पुन्हा एकदा कबूल केलं.
सुरेश वांदिले