पालवी आणि फुलपाखरु
तेजोमयीच्या कॉलनितल्या तिच्या सदनिकेसमोर असलेलं झाड प्रचंड पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे कोसळलं. खूप जुनं असलेलं हे झाड कोसळल्यानं आई – बाबा- तेजोयमी आणि कॉलनितल्या सर्वांना खूप दु:ख झालं. सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
दोन- तीन दिवस ते झाड तसंच अस्ताव्यस्त पडून होतं. एके दिवशी सकाळी सकाळी महापालिकेची एक गाडी आली. त्यातून पाच सहा माणसं उतरली. त्यांच्याकडे मोठ मोठी अवजारे होती. त्या अवजारांच्या सहाय्यानं त्या व्यक्तींनी झाडाच्या फांद्या कापायला सुरुवात केली. त्या यंत्राच्या आवाजामुळे आईबाबा आणि तेजोयमीस जाग आली. अलेक्झांडर जोरजोरात भुंकू लागला. आईबाबांनी गॅलरित येऊन बघितलं. झाडं कापण्याचं काम लयित सुरु होतं. यंत्रांनी कापल्या फांद्यांकडे बघून आईबाबास भरुन आलं. तेजोयमीस कससचं वाटलं.अलेक्झांडर गॅलरीच्या खिडकीवर चढून भुंकू लागला. बाबांनी त्याला चूप केलं.
बराच वेळ फांद्यांची कापाकापी सुरु होती. फांद्या कापणारी माणसं वेगळी होती आणि कापलेली लाकडं गोळा करुन व्यवस्थितपणे ट्रकमध्ये ठेवणारी माणसं वेगळी होती. दोन दिवस हे काम सुरु होतं. बुंध्यापर्यंत झाड कापून झालं होतं. त्यानंतर ट्रकात ती लाकड घेऊन महापालिकेची माणसं निघून गेली.
मुळासकट उखडलेला तो बुंधा बघितला की आईला रडू कोसळायचं. आईच्या डोळयात पाणी बघितलं की तेजोमयीला भरुन यायचं.या दोघींची ही अवस्था बघून अलेक्झांडर कावराबावरा व्हायचा. बाबा शांत असायचा.
असेच काही दिवस गेले. पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर एके दिवशी आईबाबा-तेजोयमी आणि अलेक्झांडर सकाळी फिरायला बाहेर पडले. फांद्या कापून नेल्याने ओकाबोका झालेल्या झाडाच्या बुंध्याकडे अलेक्झांडरचं लक्ष गेलं.त्याने बाबाला ओढतच तिकडे नेलं. त्या पडलेल्या बुंध्याला पालवी फुटत होती. इतर कोणाच्याही लक्षात न आलेली बाब अलेक्झांडरला कळली होती. ती इवली इवली पालवी बघून बाबांना खूप आनंद झाला. आईला नाचावसं वाटलं. त्या दोघांची अवस्था बघून काहीतरी भारी घडल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं. अलेक्झांडर आनंदानं शेपूट हलवू लागला.
बाबा काय झालं रे.तेजोमयीनं विचारलं.
तेजू,या झाडाचा पुर्नजन्म झालाय …त्याने स्वत:चं दु:ख विसरुन नव्यानं फुलण्याचं ठरवयल बघ.. ही पालवी म्हणजे त्याचं हे आपल्याला सांगणं आहे.
पण हा बुंधा असा अर्धवट कंलंडलेलाच आहे. अपघातात पाय गेल्यावर एखादी व्यक्ती कशी दिसतो तसा दिसतो हा…
थांब गं,असं काही अभद्र बोलू नकोस. खर तर झाड्याच्या फांद्या कापल्या तेव्हाच महापालिकेच्या लोकांनी हा बुंधा सरळ करुन त्याला जमिनित पुरायला हवं होतं.
विसरले असतील गं ते ….
पण आता मात्र उशिर नको करायला…
म्हणजे.. अग महापालिकेमध्ये अशा उन्मळून पडलेल्या वृक्षांची पुन्हा लागवड करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी असतात, त्यांना आज ताबडतोबड बोलावून घेतो…
वाव बाबा,तेजोमयी आंनदानं म्हणत बाबास बिलगली.
बाबाने महापालिकेच्या वार्ड ऑफसरला मोबाईल वरुन कळवलं. एका तासात महापालिकेची टिम आली. त्यांनी त्या बुंध्यास सरळ केलं. ज्या जागेतून ते झाडं पडलं होतं, त्या ठिकाणी त्यास व्यवस्थित बसवलं. सभोवताली माती टाकली, खत टाकलं. झारीने पाणी टाकलं….
आता एक महिना होत आलाय…त्या झाडावरची पालवी हळू हळू वाढतच चाललयी.. परवा तेजोमयीनं त्या पालवीवर फुलपाखरांना इकडून तिकडून जाताना बघितलं आणि ती हरखून गेली…..
सुरेश वांदिले
