पुढे काय करायचं?–
विद्यार्थ्यांच्या करिअर विषयक काही प्रश्नांची उत्तरे..उदा.- प्रश्न- मी १२ वीचा विद्यार्थी असून पोलीस दलात जायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल?
जयदेव करंबे,ब्रम्हपुरी
उत्तर – जयदेव,महाराष्ट्रातील पोलीस दलात पुढील चार पध्दतीने सामील होता येतं. (१) थेट शिपाई भरती- पोलीस विभागामार्फत जिल्ह्यांच्या ठिकाणी ही भरती केली जाते. त्यासाठी स्थानिक व विभागीय वृत्रपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते. (२) पोलीस उपनिरीक्षक – राज्य लोकसेवा आयोगामार्फत या पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाते. (३) पोलीस उपअधिक्षक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेमार्फत राजपत्रित अधिकाऱ्यांची विविध पदे भरली जातात. त्यात पोलीस उपअधिक्षक पदाचा समावेश असतो. पदांची संख्या, उमेदवारांचे गुण आणि पसंतीक्रम यावर आधारित पोलीस उपअधिक्षकांची नियुक्ती केली जाते. (४) पोलीस अधिक्षक – संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणा-या नागरी सेवा परीक्षेद्वारे भारतीय पोलीस सेवसाठी
निवडलेल्या महाराष्ट्र संवर्गातील अधिकाऱ्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून संधी दिली जाते. या सर्व परीक्षांसाठी तुला चांगली तयारी करावी लागेल. लेखी परीक्षेसोबतच शारीरिक चाळणीतही चांगले गुण मिळवावे लागतील.या सेवेसाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. त्यासाठी आतापासूनच व्यायाम, योग्य खाणेपिणं ,मानसिक सक्षमता याकडे लक्ष द्यावे लागेल.
०००
प्रश्न– मी विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा देणार आहे. पुढे मला विधी शाखेकडे जाण्याची इच्छा आहे. भविष्यात मला कोणत्यासं धी उपलब्ध राहतील. मी या क्षेत्राकडे वळावे का?
– विशाखा सोनकुसरे,नाशिक
उत्तर– विशाखा, विधि शाखेत पदवी घेतल्यास कनिष्ट स्तरीय दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश,सरकारी वकील अशा शासकीय संधी उपलब्ध होऊ शकतात.खाजगी प्रॅक्टिस करता येणं शक्य आहे. मोठ्या विधि सल्लागार कंपन्यामध्ये नोकरी मिळू शकते.नामवंत खाजगी वकिलांचे सहाय्यक म्हणून संधी मिळू शकते. कार्पोरेट लॉ, सायबर लॉ, इंकम टॅक्स लॉ, प्रशासकीय सेवा प्राधिकरण विशेषज्ञ असे स्पेशलायझेशन केल्यास आणखी संधी मिळू शकतात.
०००
पुढे काय करायचं?
प्रश्न- मला अभिनयाची खूप आवड असून मला मराठी चित्रपटात जायचय. पण मी ग्रामीण भागातील असल्याने आवश्यक माहिती व मार्गदर्शक नाही, मी काय करू, कुठे जाऊ?
सर्वेश रासपायले, अचलपूर
उत्तर- सर्वेश, अभिनय वा कलेच्या प्रातांत करिअर करण्यासाठी तुम्ही नागरी वा ग्रामीण भागातील आहात का, ही बाब महत्वाची ठरत नाही. प्रतिभा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तिस संधी मिळू शकते. तथापि मराठी चित्रपटसृष्टी ही पुणे-मुंबईत केंद्रित झाली असल्याने तू या दोन शहरांमध्ये आल्यास संधी मिळणं सुलभ ठरेल. तू आतापर्यंत अभिनयाच्या क्षेत्रात काय काय केलं आहेस याचं चांगलं सादरीकरण (पोर्टफोलिओ)करुन ठेव. संबंधितांना भेटताना हे सादरीकरण दाखवून स्वत:बद्दलची माहिती देणं सोईचं ठरतं. अभिनयाचं प्रशिक्षण घेतल्यास संधी लवकर मिळू शकतात. त्यासाठी तू पुढील काही संस्थामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करावास. (१)फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ पुणे- या संस्थेनं दोन वर्षे कालावधीचा पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ॲक्टिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. संपर्क- http://www.ftiindia.com (२) नॅशनल स्कूल ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स- या संस्थने तीन वर्षे कालावधीचा डिप्लोमा कोर्स इन ड्रॅमॅटिक आर्ट्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अभिनय या विषयात स्पेशलायझेशन करण्याची सोय आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- https://nsd.gov.in/ (3)व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल- या संस्थेने बी.ए इन ॲक्टिंग हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस या संस्थेशी हा अभ्यासक्रम संलग्नित आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी.संपर्क- /www.whistlingwoods.net
०००
पुढे काय करायचं?
प्रश्न- मी इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. माझा भविष्यात काहीतरी वेगळे करण्याचा विचार आहे. मला पुढे जागतिक शांतता व अशाच विविध मुद्द्यांवर काम करायचय. मला विज्ञान व व्यवस्थापन या विषयांमधयेही रस असून मला लोकांशी इंटरॅक्ट व्हायला आवडतं. कृपया मार्गदर्शन करा.
सोनल देशपांडे,रायगड
उत्तर- सोनल,तुझ्या प्रश्नावरुन तुला खूप साऱ्या गोष्टी भविष्यात करावयाच्या आहेत, असं दिसतं. मात्र एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याऐवजी एक वा दोन बाबींवर लक्ष केंद्रित केलेलं अधिक चांगलं. व्यवस्थापन विषयात तुला करिअर करावयाचे असल्यास तुला आधी पदवी व त्यानंतर एमबीए ही पदव्युत्तर पदवी घ्यावी लागेल. हा अभ्यासक्रम चांगल्या संस्थेतून करणं गरजेचं आहे. विज्ञान विषयात सुध्दा पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अभ्यासक्रम केल्यास उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. जागतिक शांतता हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यासाठी स्पेशल किंवा खास असा अभ्यासक्रम नाही. तथापि संयुक्त राष्ट्र संघटनेत विविध पदावर काम करुन या क्षेत्रात योगदान देता येतं. मानव्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तम गुणांनी प्राप्त केल्यावर तुला अपेक्षित संधी मिळू शकतात. त्यासाठी मनापासून अभ्यास करणं आवश्यक ठरतं. तुला संवादकौशल्य वाढवावं लागेल. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावं लागेल. सध्या तरी अभ्यास आणि चौफेर व्यक्तिमत्व विकास करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं.
००००