पुरस्कार नाकारणाऱ्या मुलीची गोष्ट परवाच तेजोमयीस कळली. हा पुरस्कार साधासुधा नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतिने दिला जाणारा, चॅम्पियस ऑफ द अर्थ, असं या पुरस्कारचं नावं. हा पुरस्कार मोठ्या सन्मानाचा. तो कुणालाही मिळत नाही. त्यासाठी भरीव म्हणजे खूप मोठी आणि ठोस कामगिरी बजवावी लागते. तशी या १५ वर्षाच्या मुलीची कामगिरी असल्यानेच तिची निवड केली गेली. पण तिने हा पुरस्कार नाकारला. ही मुलगी म्हणजे अमेरिकत राहणारी कल्लास बेन्सन.
या मुलीनं पुरस्कार नाकारण्याचं धाडस केली नि सारेच थक्क झाले.
०००
वयाच्या १३ व्या वर्षापासून पर्यावरण रक्षणासाठी कल्लास काम करतेय. पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी तिने कल्पकतेने मोनार्क फुलपाखराचं प्रतिक वापरलं. त्यासाठी तिने, तिच्या आईबाबांच्या मदतीने एक पॅरॅशूट बनवलं. या पॅरशुटवर मोनार्क फुलपाखराचं चित्र काढलं. त्यावर १६शे मुलांच्या सह्या घेतल्या. त्यासाठी शाळाशाळांमध्ये जाऊन तिने मुलांना पर्यावरणाचा ऱ्हास किती आणि कसा होत चाललाय, हे समजावून सांगितलं. आपल्याच मनातलं कुणीतरी बोलतेय याची खात्री या मुलांना पटली. त्यांनी आनंदाने या पॅरॅशूटवर सह्या केल्या. मग हे पॅरॅशूट आकाशात धाडण्यात आलं. अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांचं लक्ष, मोनार्क पॅरॅशूटकडे गेलं. पर्यावरण संरक्षणासाठी अभिनव पध्दतीने काम करणारी कल्लास प्रकाशझोतात आली.
अमेरिकेतील मेरीलँड, प्रातांत कल्लास राहते. त्या राज्याच्या प्रशासनाने प्रत्येक नागरिकास स्वच्छ आणि शुध्द पर्यावरणाचा हक्क बहाल करणारा कायदा केला. या कायद्याची पायमल्ली करणाऱ्यास खटला दाखल करण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आला. हा कायदा महत्वाचा असल्याचं कल्लासच्या लक्षात आलं. तिने या कायद्याला अभिनव पध्दतीनं पाठिंबा दिला. इतरांचं लक्ष या कायद्याकडे वळावं म्हणून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील ९० दिवस एके ठिकाणी काहीही न बोलता दिवसभर बसून राहण्याचं ठरवलं. या काळात ॲनॅपोलीस ह्या ठिकाणच्या कार्यालयासमोर,क्रोशाची फुलपाखरं विणायची. कुणासोबत,एकही शब्द बोलायची नाही. संध्याकाळी ही फुलपाखरं, या कार्यालयाच्या परिसरातील लोकांना द्यायची. कशासाठी? हे कुणी विचारल्यास, एका फळ्यावर लिहून ठेवलेलं, “पर्यावरण रक्षणाच्या कायद्यास पाठिंबा द्या,” वाक्याकडे बोट दाखवायची. तिच्या या अभिनव प्रयत्नांचा जनजागृतीसाठी मोठा प्रभाव पडला. कल्लासची ख्याती सर्वदूर पसरू लागली. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या इतर संस्था तिच्या कार्याचे कौतुक करायला लागल्या.
०००
“पर्यावरण रक्षणासाठी माझ्या प्रयत्नांना फारसं यश मिळत नाहीय. माझा अमेरिका देश जगात सगळयात बलाढय समजला जातो, पण त्याच्याकडूनही पर्यावरण रक्षणासाठी काही घडतय असं दिसत नाही.मग पुरस्कार तरी कसा स्वीकारणार? असं कल्लासनं जाहीररीत्या सांगितल.”
०००
“बाबा, असं आपल्याच देशाबद्दल नावबोटं ठेवलेलं चालतं का हो?”तेजोमयीनं विचारलं.
“एखादं सत्य सांगणं म्हणजे नावबोटं ठेवणं नव्हे. कल्लाससारख्या ध्येय्यवेड्यामुलीस तसं वाटून, ती जाहीरपणे सांगत असल्यास, ते स्वीकारायलाचं हवं.” बाबांचं म्हणनं तेजोयमीला पटलं.
“पर्यावरण रक्षणासाठी,कल्लास जीवापाड प्रयत्न करते. मात्र, आपल्या घरी या विषयावर साधी चर्चासुध्दा होत नाही. बाजारातून, भाजीपाला प्लॅस्टिकच्या पिशव्यात आणण्याचं कुणी सोडत नाही. प्लॅस्टिक इकडेतिकडे फेकून देण्यात काहीही गैर वाटत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होतो, हे आपण लक्षात घेत नाही.” तेजोमयीनं बाबांच्या लक्षात आणून दिलं.
बाबांनी होकारार्थी मान हलवली.
“किमान आपल्या सोसायटीमध्येतरी प्लास्टिक बंदीसाठी तू प्रयत्न करायला काय हरकत आहे? बाबांनी तेजोमयीस विचारलं.
“आपल्या सोसायटीसाठी, कल्लास बणून, न कंटाळता प्रयत्न करीन बाबा,” तेजोमयीने बाबांना आश्वासन दिलं.
सुरेश वांदिले
०००