पुरस्कार नाकारणाऱ्या मुलीची गोष्ट परवाच तेजोमयीस कळली. हा पुरस्कार साधासुधा नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतिने दिला जाणारा चॅम्पियस ऑफ द अर्थ, असं या पुरस्कारचं नावं. हा पुरस्कार मोठ्या सन्मानाचा. तो कुणालाही मिळत नाही. त्यासाठी भरीव म्हणजे खूप मोठी आणि ठोस कामगिरी बजवावी लागते. तशी या १५ वर्षाच्या मुलीची कामगिरी असल्यानेच तिची निवड केली गेली. पण तिने हा पुरस्कार नाकारला. ही मुलगी म्हणजे अमेरिकत राहणारी कॅलेन बेन्सन.
या मुलीनं पुरस्कार नाकारण्याचं धाडस केली नि सारेच थक्क झाले.
पण बाबा, असं पुरस्कार नाकारणं योग्य आहे का हो? तेजोमयीनं बाबांना विचारलं.
कशाबद्दल बोलतेस गं तू, बाबा म्हणाले, तेव्हा तेजोमीयने कॅलेनची संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली.
०००
वयाच्या १३ व्या वर्षापासून पर्यावरण रक्षणासाठी कॅलेन काम करतेय. पर्यावरण रक्षणाच्या जनजागृती साठी तिने कल्पकतेने मोनार्क फुलपाखराचं प्रतिक वापरलं. त्यासाठी तिने तिच्या आईबाबांच्या मदतीने एक पॅरॅशूट बनवलं. या पॅरशुटवर मोनार्क फुलपाखराचं चित्र काढलं. त्यावर १६शे मुलांच्या सह्या घेतल्या. त्यासाठी शाळाशाळांमध्ये जाऊन तिने मुलांना पर्यावरणाचा ऱ्हास किती आणि कसा होत चाललाय हे समजावून सांगितलं. आपल्याच मनातलं कुणीतरी बोलतेय याची खात्री या मुलांना पटली. त्यांनी आनंदाने या पॅरॅशूटवर सह्या केल्या. मग हे पॅरॅशूट आकाशात धाडण्यात आलं. अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांचं लक्ष या मोनार्क पॅरॅशूटकडे गेलं. पर्यावरण संरक्षणासाठी अभिनव पध्दतीने काम करणारी कॅलेन एकदम प्रकाशझोतात आली.
अमेरिकेतील मेरीलँड या प्रातांत कॅलेन राहते. त्या राज्याच्या प्रशासनाने प्रत्येक नागरिकास स्वच्छ आणि शुध्द पर्यावरणाचा हक्क बहाल करणारा कायदा केला. या कायद्याची पायमल्ली करणाऱ्यास खटला दाखल करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकांना देण्यात आला. हा कायदा महत्वाचा असल्याचं कल्लासच्या लक्षात आलं आणि तिने या कायद्याला अभिनव पध्दतीनं पाठिंबा दिला. इतरांचं लक्ष या कायद्याकडे वळावं म्हणून तिने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील ९० दिवस एके ठिकाणी काहीही न बोलता दिवसभर बसून राहण्याचं ठरवलं. या काळात ती ॲनॅपोलीस हया ठिकाणच्या कार्यालयासमोर बसून क्रोशाची फुलपाखरं विणायची. या काळात कुणासोबतही ती एकही शब्द बोलायची नाही. संध्याकाळी ही क्रोशाची फुलपाखरं या कार्यालयाच्या परिसरात येणाऱ्या लोकांना देऊन टाकायची. कशासाठी? हे असं कुणी विचारलं तर त्याचं उत्तर देण्यासाठी तिने एका फळ्यावर लिहून ठेवलेलं, पर्यावरण रक्षणाच्या या कायद्यास पाठिंबा द्या, वाक्याकडे बोट दाखवायची. तिच्या या अभिनव प्रयत्नांचा जनजागृतीसाठी मोठा प्रभाव पडला.
कॅलेनची ख्याती सर्वदूर पसरू लागली. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या इतर संस्था तिच्या कार्याचे कौतुक करायला लागल्या..
०००
कॅलेनची गोष्ट ऐकून बाबा फार प्रभावित झाले. काय ग्रेट मुलगी आहे ही कॅलेन? त्यांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती.
ती ग्रेट तर आहेच बाबा..पण तिने पुरस्कार नाकारुन योग्य केलं की अयोग्य केलं हे मी तुम्हाला विचारलं होतं..
हो हो आठवलं. कॅलेनच्या गोष्टीत त्याचं विस्मरण झालं. एखादी व्यक्ती पुरस्कार नाकारते तेव्हा एक तर त्याला या पुरस्काराबद्दल सांगितलं जात नाही..किंवा मग काहीजणांना वाटतं आपण या पुरस्कारासाठी पात्रच नाही. तर काहीजणांना वाटतं की आपलं काम फारच अल्पस्वल्प आहे, आणखी खूप काही करायच राहिलय, तेव्हा नकोच बुवा आपणाला हा पुरस्कार..
याचा अर्थ या तीनपैकी एका कारणांमुळे कॅलेनने पुरस्कार स्वीकारला नसेल असं तुम्हास वाटतं का बाबा…
नक्कीच. आपण त्याचा गुगल महाराजांच्या मदतीने शोध घेऊ याकी… तेजोमयीस बाबा म्हणाले.
तेजोमयीने गुगल महाराजांना कॅलेनने पुरस्कार नाकारण्याचं कारण विचारलं.हे कारण समोर येताच बाबा आणि तेजोमीयनं त्याचं सामूहिक वाचन केलं.
बाबा, ही कॅलेन तर ग्रेट पेक्षाही ग्रेट निघाली हो..
होना…अगं बघ, पर्यावरण रक्षणासाठी माझ्या प्रयत्नांना फारसं यश मिळत नाहीय. माझा अमेरिका देश जगात सगळयात बलाढय समजला जातो पण त्याच्याकडूनही पर्यावरण रक्षणासाठी काही घडतय असं दिसत नाही..मग पुरस्कार तरी कसा स्वीकारणार? असं कॅलेननं जाहीररीत्या सांगितलय.
बाबा, असं आपल्याच देशाबद्दल नावबोटं ठेवलेलं चालतं का हो?
एखादं सत्य सांगणं म्हणजे नावबोटं ठेवणं नव्हे. आता कॅलेनसारख्या ध्येय्यवेड्यामुलीस तसं वाटून ते ती जाहीरपणे सांगत असेल तर ते सत्य स्वीकारायलाचं हवं ना..
बाबांचं म्हणनं तेजोयमीला पटलं.
पर्यावरण रक्षणासाठी ही मुलगी इतकी जीवापाड प्रयत्न करते. मात्र आपल्या घरी या विषयावर साधी चर्चा सुध्दा होत नाही. बाजारातून भाजीपाला प्लॅस्टिकच्या पिशव्यात आणण्याचं कुणी सोडत नाही. प्लॅस्टिक इकडे-तिकडे फेकून देण्यात आपणास काहीही गैर वाटत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे सुध्दा आपण लक्षात घेत नाही..तेजोमयीनं बाबांच्या लक्षात आणून दिलं.
बाबांनी होकारार्थी मान हलवली.
किमान आपल्या सोसायटीमध्ये तरी प्लास्टिक बंदीसाठी तू प्रयत्न करायला काय हरकत आहे? बाबांनी तेजोमयीस विचारलं…
आपल्या सोसायटीसाठी, कॅलेन बणून न कंटाळता प्रयत्न करीन बाबा, तेजोमयीन बाबांना आश्वासन दिलं…