(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आईबाबा कधी ऑफिसला जातात याची वाट पुसी कॅट बघतच होती. ते जाताच तिने शेपूट वर आपला आनंद व्यक्त केल नि मग तिची लगबग सुरु झाली. घरातून बाहेर जाण्यासाठी तिने छान छान तयारी सुरु केली.नटली.थटली. आरशात बघून स्वत:वरच खुष झाली.हे सगळं रोनाल्डो डॉगी बघत होता.आईबाबा गेले की ही बया अशीच बाहेर पडते हे त्याला स्वानुभवारुन ठाऊक झालं होतं.त्यामुळे तो तिच्याकडे दुर्लक्षच करायचा.पण आज जरा बाईसाहेब जास्तच नटल्याचं त्याच्या लक्षात आलं.त्यामुळे न राहवून त्याने पुसीला टोकलंच शेवटी,

‘ काय पुसी मॅडम, इतक्या नटूनथटून चाललात तरी कुठे?’ रोनाल्डोने तिला विचारलं.

चक्कर मारुन येत जरा.‘ पुसी टेचात म्हणाली.

‘ मॅडम तुम्ही, तू दररोजच अशा चक्कर मारायला बाहेर पडता. आईबाबा घरी येण्याची वेळ साधून बरोबर घरी परतात. पण आज जरा विशेषच वाटतं.’

तुला कां बरं वाईट वाटतय? तू घरकोंबडा आहेस म्हणून मीसुध्दा घरकोंबडी व्हावं असं तुला वाटतं का? छे,छे,आपणास बुवा ते नाही जमायचं. मी तर राणी. नाचते छान गाते गाणी.नजर नाही लावू शकणार कुणी. हा हा हा!!!’ पुसी गिरकी घेत पुन्हा टेचात म्हणाली.

‘ अहो मॅडम राणी साहेब, मी घरकोंबडा असलो म्हणून काय झालं? घराच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावरच टाकून आईबाबा बाहेर जातात ना. मग मी त्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असं कसं वागणार?’ रोनाल्डो म्हणाला.

बर बाबा,तू राहा घरी. घराचं रक्षण कर. उंदीर मामूवर लक्ष ठेव नि झुरळांना हाकलून लाव.हे कर नि तसं कर. मी मात्र निघाले.

हो हो, जा जा. राणीसरकार. आमची हिम्मत कुठे तुम्हाला थांबवायची पण आज जरा आपण जास्तच नटलास नि सजलास.काही तरी नक्कीच खास, म्हणून विचारलं.

सांगेन की रोनू तुला. पण बाहेरुन आल्यावर.ओके बाय बाय.’ असं बोलून पुसी कॅटने रोनाल्डोला एक फ्लाईंग किस देत हळूच खिडकीतून बाहेर उडी घेतली.

बाहेरचं मोकळं आभाळ, उडणारे पक्षी,हिरवी हिरवी झाडं, मस्त सुटलेली हवा यांनी पुसी ला नवीन उर्जाच मिळालीत.

बाहेर पडण्याची मौज रोनूला कधीच कळायची नाही, असं खिडकीजवळ उभा असलेल्या रोनाल्डोसाठी मनातच म्हणत, पुसीने शेपूट उंच केली आणि थाटात नि तोऱ्यात पुढे निघाली.

इकडे तिकडे बघत, वाहनांना चुकवत,पुसी माहिमच्या मासोळी बाजारात आली. ही पुसी अत्यंत आवडीची जागा. या बाजारात कोळीण मावश्यांकडे अनेक मांजरी पहुडलेल्या असायच्या. मासोळ्यांना स्वच्छ केल्यावर त्यांचे काप करुन काही मावश्या ग्राहकांना देत. त्यातला एखादा तुकडा त्यांच्या बाजुला पहुडलेल्या मांजरीपुढे टाकत. त्या मांजरी डोळे न उघडताच खात असत. काही मांजरी तर तेही कष्ट घेत नसत. तर अशा आपल्या काही चुलत तर काही दूरच्या नात्यातल्या मांजरींची पुसीने चांगली मैत्री केली होती. पुसी इथे आली की बाजारातील मांजरी तिलासुध्दा मासोळीचा एखादा तुकडा देत.अहाहा,समुद्रातील ती चवदार मासळी पोटात जाताच पुसीला स्वर्गीय आनंदच मिळे. गुरुवार आणि शनिवार सोडला तर तिला इतर कोणत्याही दिवशी मासोळीची मेजवाणी चालते.गुरुवार शनिवारी आईबाबांकडे नॉन व्हेज चालायचं नाही ना म्हणून ती खबरदारी घ्यायची. तिने मासोळीची मेजवाणी केलीय हे कदाचित त्यांना कळलंही नसतं.पण त्या रोनाच्या नाकाला काही अक्कल नाही ना.त्याला लगेच वास यायचा ही आपलं भाडं फुटायचं.हे चाणाक्ष पुसीला बरोबर ठाऊक होतं.त्यामुळे या तीन दिवशी ती माहीमला न जाता आपली वाट सिध्दीविनायक मंदिराकडे करायची.

तर आज बुधवार असल्याने मासोळीचा मेजवाणी करण्यास काहीच बंधन नव्हतं त्यामुळे या बाजारात प्रवेश करताच एका मावशीकडील एका लठ्ठूबाई मावशीने तिला पापलेटचा तुकडा दिला. तो गट्टम करत असतानाच तिन त्या लठ्ठू बाईस विचारलं.

येतेस कां गं माझ्या बरोबर फिरायला?’

तिने नाक फेंदारुन पुसीकडे बघितलं. नि सुखाचा जीव कशासाठी दु:खात टाकायचा असं सांगून तिने ताणून दिली.

मासोळी बाजारातील या महाळशी मांजरींना सोडून पुसी पुढे निघाली. कडेकडेने चालत ती राणीच्या बागेत पोहचली. ऑक्सर पेंग्विनला बघून पुढे जात असताना तिच्या कानावर हाक आली,

अगं मावशे, इकडे कुठं? भाचऱ्याला भेटावयास आली वाटतं.

पुसीने चमकून मागे वळून पाहिले. करिश्मा वाघीण तिलाच बोलत होती. पटकन मागे फिरुन पुसी करिश्माजवळ पोहचली.

करिश्माला बघून पुसी आनंदली. तिच्या डोळयातून अश्रू आले.

किती दिवसांनी भेटलीस गं तू?’

काय करणार करिश्मे, असं दररोज मला नाही जमणार ना इथं इतकं दूर येणं. पण करिश्मे तू अशी या पिंजऱ्यात कां बरं? येतेस का माझ्याबरोबर फिरायला?’ पुसीने विचारलं.

नाही गं मावशे, मला काही शक्य नाही. वीरा माझं लेकरु, एक महिन्याचासुध्दा नाहीना! त्याला सोडून जाऊ शकत नाही. या पिंजऱ्यातून बाहेर कसं पडायचं हेही मला ठाऊक नाही.करिश्मा वाघीण, पुसीची नजर चुकवित म्हणाली.

म्हणजे करिश्मे तू इथं समाधानी नाहीस का?’ पुसीनं विचारलं. करिश्मा काहीतरी सांगणार तोच वीरा धडपडला.त्याला सावरायला करिश्मा निघून गेली. त्यांचं बोलणं अर्धवटच राहिलं.

दुरुनच करिष्माला बाय करुन पुसी पुढे निघाली. बागेच्या बाहेर असणाऱ्या बसथांब्याजवळ एक गाडी थांबलेली दिसली. कुणाच्याही लक्षात येणार नाही हे बघून पुसी त्या गाडीत चढली आणि एका सिटखाली जाऊन बसली.

ती गाडी काही वेळाने, गेट वे ऑफ इंडिया जवळ पोहचली. तिथे सर्व प्रवासी उतरले. पुसीही उतरली. गेट वे ऑफ इंडियाजवळ छत्रपती महाराजांच्या पुतळयाजवळ ती आली. महाराजांचा घोडा आपल्या अंगावर येईल की काय असं वाटून ती दचकली. पण तो घोडा बराच वेळ काहीच करत नाही हे बघून तिला हायसं वाटलं. आपल्यासोबत येतोस का फिरायला? असं त्याला विचारावं असं पुसीस वाटलं. पण कितीही मान उंचावली तरी आपलं बोलणं त्याला ऐकू जाणार नाही हे तिच्या लक्षात आल्याने ती पुढे निघाली.

अवतीभवती बऱ्यापैकी गर्दी होती. लोकं गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवरुन बोटिमध्ये बसत असल्याचं पुसीला दिसलं.

ती हलक्या पावलानं त्यांच्यासोबत चालू लागली आणि कुणाच्याही लक्षात येणार नाही हे बघून तिने बोटित उडी घेतली. बोट सुरु झाली. समुद्राच्या पाण्यातून जाऊ लागली. पाण्याचे तुषार अंगावर पडताच पुसीचं अंग शहारलं. तिने हळूच मान बाहेर काढली. त्याचवेळेला एक छोटी मासळी तिच्याजवळ आली. असं  दोन-तिनदा घडलं. पुसीने मनात काहीतरी ठरवलं आणि ती तोंड उघडून सज्ज झाली. तिच्या सुदैवाने आणखी एक छोटी मासोळी तिच्याजवळ आली तिने पटकन पकडून गट्टम केलं.

वा वा! दिवसभराचा सारा शिण या मेजवाणीनं निघून गेला. पुसी स्वत:च कौतुक करत म्हणाली.

बोट बऱ्याच दूरपर्यंत गेली आणि पुन्हा परत फिरली. पाण्यावरन  वरखाली ,खालीवर होणाऱ्या बोटीमुळे पुसीच्या पोटातलं पाणीही खालीवर होऊ लागलं. त्याची तिला गंमत वाटू लागली. काही वेळाने बोट थांबली. सर्व प्रवाशी लोक उतरले. पुसीही सावध राहून उतरली.

पुसी चाणाक्ष आणि हुषार होती. त्यामुळे ती जशी घरापासून गेट वे ऑफ इंडिया जवळ पोहचली. तसाच मार्ग पकडून आणि तशाच पध्दतीने घरी पोहचली.

ती पोहचली तेव्हा बऱ्यापैकी अंधार झाला होता. आईबाबा घरी यायचे होते. पुसीने हुश्श केले. घरात शिरल्या शिरल्या तिने आनंदाने उडी मारली. शेपूट उंचावून रोनाल्डोभोवती फेर धरला.

अगं, एवढा आनंद व्हायला काय घडलं? सांगशील का जरा मला.रोनाल्डोने विचारलं.

अरे, त्याचीच तर वाट बघतेय ना.कधी सांगतेय तुला,असं झालय मला’.

मग सांग की…

त्यानंतर पुसीने दिसभरात काय काय घडलं याची इथ्यंभूत माहिती दिली. ती गोष्टीवेल्हाळ असल्यानं, सारं काही रंगवून रंगवून सांगितलं. पाण्यातल्या मासोळीची कथा ऐकल्यावर तर रोनाल्डोच्या तोंडास पाणी सुटलं.

बरं बाई जमतं तुला.पुसीला दु:खी अंत:करणानं रोनाल्डो म्हणाला.

अरे, तुला सुध्दा जमू शकतं की. तुला तर म्हंटल होतं की चल माझ्यासोबत म्हणून. आज पर्यटन दिवस, म्हणजे फिरण्याचा दिवस. फिरायला निघालं की असं नवं दिसतं.मजा येते. मेजवाणीही मिळते. बाहेरच पडलो नाही तर कसा मिळायचा आनंद आणि कशा दिसणार छान छान गोष्टी?’ पुसी त्याला म्हणाली.

पुढच्या पर्यटन दिवसाला मी नक्कीच येईन हं पुसी तुझ्यासोबत, लहान तोंड करुन रोनाल्डो पुसीला म्हणाला.

पुसी खुदकन हसली आणि तिने स्वत:भोवती गिरकी घेतली.

०००