पुस्तक वाचण्याचा कंटाळा
पुस्तक वाचण्याचा जाम कंटाळा यायचा तेजोमयीला. पुस्तकं म्हंटली की तिचं असायचं, नो वे…स्वप्नात सुध्दा तिला पुस्तक दिसलं की ती स्वप्नावर काट मारायची. स्वप्नातल्या परीशी कट्टी घ्यायची. थेट, अट्टी कट्टी गोरगोटी लिंबाचा पाला हलू नको पर्यंत ती पोहचायची. परीराणी हिरमुसली व्हायची.
व्हाट इज धिस..तेजोमयी..ती कधी रागाने म्हणायची.
तर, कोंबडिका पिस, म्हणून तेजोमयी खोखो हसत सुटायची..
परीराणीला सूचेना की या बयेला पुस्तक आवडावित म्हणून काय करावं बरं..जी मुलं पुस्तक वाचतात..तीच परीस आवडायची.
एकदा परीला खूप तहान लागली. तेव्हा इतर मुलांनी तिला थंडगार पाणी दिलं..पण तेजोमयीनं मात्र पियुष दिलं..तेव्हा पासून ती तिला खूप आवडायला लागली. एकदा तर तेजोमयीनं तिला रसना देऊन, आय लव्ह यू असंही म्हटलं..तेव्हा पासून तर परीने तिच्या स्वप्नात जाण्याचा एकही दिवस चुकवला नाही.
हळूहळू तेजोमयीचं मन वळवू अशी तिला खात्री होती. पण तेजोमयी मात्र ढिम्म. पुस्तकं म्हंटल की ती थेट,सेडना, या दहाव्या ग्रहावरच पोहचायची. तिथून तिला परत आणनं परीराणीला कठीण व्हायचं.
एकदा परीराणिने तेजोमयीसमोर तिच्यासमोर एक हॅरी पॉटरचं आणि दुसरं फास्टर फेणचं पुस्तक ठेवलं नि त्यातून हॅरी आणि फेणेला अलगद बाहेर काढलं.
हॅरीने त्याचा जादूचा झाडू आणला होता. त्याच्या एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात होतं अॅडव्हान्स्ड बूक ऑफ मॅजिक,म्हणजे जादु शिकवणारं प्रगत पुस्तक.
फेणेच्या हातात क्रिकेटची बॅट आणि आणि सानेगुरुजीचं पुस्तक होत. दोघांच्या हातातील पुस्तकाकडे लक्ष जाताच तेजोमयी ओरडली,
टाका ते पुस्तक खाली आधी नाही तर मी तुमच्याशी बोलणारच नाही.
हॅरी म्हणला, नो वे..फेणेनं तर तिच्याकडे लक्षच दिलं नाही.
मी पुस्तक खाली टाकणार नाही. हॅरी म्हणाला.
मग मी तुझ्याशी खेळणार नाही.. तेजोमयी फुगून म्हणाली.
नो प्रॉब्मेल..तू खेळली नाहीस तर काहीच बिघडत नाही. मी या फेणेला आणि दुसऱ्या मुलांना माझ्या जादुच्या झाडूवर बसवतो नि घेउन जातो आकाशात..ढगावर बसून आम्ही भेळ खाऊ तिथे .. हॅरी म्हणाला.
तिच्या उत्तराची वाट न बघताच त्याने फेणे आणि तेजोमयीच्या इतर मित्रांना जादुच्या झाडूवर बसवले. आकाशात उंच सूर मारला…
ढगांच्या राजाने आकाशात त्यांचे स्वागत केले. मुलं वर येताच त्याने जादुचा शंख फुंकला..त्यातून खूप सा-या कॅडबरीज बाहेर पडल्या..आईसक्रीमसुध्दा..तेजोमयीचं आवडतं स्ट्राबेरी आइसक्रीमपण होतं..ते बघून तिच्या तोंडाला पाणी सुटलं.. हॅरी, फेणे आणि इतर मुलं मस्त मिटक्या मारत खाऊ लागली.
ढगांच्या राजाने मग सगळयांना रंगीत पेन्सिली दिल्या..सगळी मुलं, दे धमाल चित्र रंगवत बसली..थोडया वेळानं आला वडापाव..आता मात्र तेजोमयीला राहवेना..तिच्या तोंडचं पाणी थांबेना..परीराणी दुरुनच ही सारी गंमत बघत होती.
बघ तुझी संधी गेली.. परीराणी हळूच तेजोमयीला म्हणाली.
गेली तरी गेली.. तेजोमयी म्हणाली. हॅरीने पुस्तकं खाली टाकलं असतं तर गेली असते मी त्याच्या सोबत.. ती म्हणाली.
पुस्तकं ही खरी मित्र असतात तेजू.. परीराणी तिला समजावत म्हणाली.
हे वाक्य मी एकहजार वेळा माझ्या पप्पां-आईकडून आणि टिचरकडून एैकलय..त्यात नवीन काही नाही..”
तुझी आवडती दीपिका पदुकोन वेळ मिळाला की ती पुस्तकातच शिरते..आणि शाहरुख अंकलच तर विचारुच नको…
मी विचारतच नाही… तेजोमयी रागाने म्हणाली..
या हट्टी मुलीचा परीराणीला खूप राग यायला लागला..तेवढयात परीराणीचं लक्ष ढगांकडे गेलं. हॅरी, पॅरी, फेणे नुसते उंडारत असताना तिथे अमिताभ अंकल, हृतिक,रणवीर आणि जादू आला..
वाSव, तेजोमयीचं लक्ष जाताच ती उर्त्स्फूतपणे म्हणाली..तिला जादुला प्रत्यक्ष बघण्याची, त्याला हात लावण्याची इच्छा होती. अमिताभ अंकल,रणवीर आणि ह्रतिकची सहीसुध्दा तिला हवी होती.
हॅरीने आपल्या जवळचं पुस्तक काढलं नि अमिताभ अंकलच्या समोर केलं. अंकलने त्यावर झक्कास सही केली…फेणेने कागदावर सही घेतली. सर्वांनी मग बिगफूलचा डाव मांडला. अमिताभ अंकल बिगफूल ठरले.
ढगांच्या राजाने मस्तपैकी भेळ आणि पिज्जा आणला. अंगत पंगत करत सारेच ताव मारु लागले…भोजनानंतर मग झालं सुरु पुस्तक पुस्तक हा खेळ..या खेळात भाग घ्यायला परीराणीही तेजोमयीला सोडून वर उडाली. या खेळात जादूनेही भाग घेतला..या खेळात जो जिंकेल त्याला जादू आपल्या ग्रहावर घेऊन जाईल, असं ठरलं. खेळ सुरु झाला..वेगवेगळया पुस्तकांवरच्या प्रश्नाचा बॉल ढगांचा राजा टाकत होता. या बॉलवर सर्वाधिक सिक्सर मारले ते फास्टर फेणेनेच.. लहानपणापासून पुस्तक वाचण्याचा, वाचून समजून घेण्याचा , समजल्यावर त्यावर मंथन करण्याची सवय त्याला लागल्याने त्याला अनेक विषयाचं अद्ययावत ज्ञान होतं. अमिताभ अंकल सुध्दा थक्क झाले. ऋतिकने त्याला चित्रपटात घेण्याचा निर्णय तिथेच घोषित केला. हॅरीने त्याला जादुच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. जादूसोबत त्याच्या ग्रहावर जाण्याची संधी फेणेला मिळाली. परीराणीने त्याला दोन पंख दिले. हे पंख लावले की फेणेला सातासमुद्रावरुन उडणं सहज शक्य होतं…
तेजोमयी सारं काही बघत होती.. परीराणीने आपल्याला ढगावर नेलं नाही याचं तिला खूप दु:ख झालं नि रागसुध्दा आला.आता परीराणीशी बोलायचच नाही असं तिनं पक्क मनात ठरवलं.
परीराणी जेव्हा तिच्याकडे आली तेव्हा तिने तोंडच फिरवलं..
परीराणीला सारं काही कळलं.
मी काय करणार..तुला मी खूपदा समजावलं ना पुस्तक वाच म्हणून, पण तू समजून घ्यायलाच तयार नाही…
मला पुस्तकं वाचायाचीच नाहीत..
जी मुलं पुस्तकं वाचत नाहीत त्यांचं कसं नुकसान होतं हे तुझ्या कां लक्षात येत नाही. तुला पुस्तकांचा एवढा राग कां येतो..
परीराणी तुला माहीत नाही..आम्हाला अभ्यासाची किती पुस्तकं वाचावी लागतात ते…
मग काय झालं?पुस्तकांमुळे ज्ञान मिळतं ना…हे ज्ञानच माणसाला पॉवरफुल्ल बनवतं.. नॉलेज इज पॉवर म्हणतात ना.. हॅरीला ते कळलय बघ. म्हणूनच खेळताना सुध्दा त्याच्या जवळ पुस्तक असतं. वेळ मिळाला की ते पुस्तक तो वाचतो.. त्यामुळे त्याच्या जादुच्या ज्ञानात सारखी भरच पडतेय…एके दिवशी तो जगातला सगळयात मोठा जादूगर होणार बघ..
होउु दे ना..मला काय त्याचं. मी बाई आपली खेळणार…मी पुस्तकं वाचणार नाही…
पुस्तक वाचण्याच्या आनंदापासून तू मुकशील.. नवं नवं ज्ञान मिळणार नाही ते वेगळचं….
सो व्हाट..ज्ञान मिळालं नाही तर काय बिघडेल गं माझं…
तू गाढव होशील ना…
गाढव तर गाढव..मस्त मजेत राहता येईल.. नि गाढव मस्ती करता येईल…. तेजोमयी म्हणाली. याचा परीराणीला खूप राग आला… म्हणजे तू माझं म्हणनं एैकणार नाहीस तर…
तेजोमयी काहीच बोलली नाही. परीराणीने जादूची छडी काढली नि तिच्यावरुन फिरवली…
0000
पुढं व्हायचं तेच झालं…तेजोमयी गाढव झाली..तुम्ही जेव्हा एखादा गाढव बघाल ते गाढव पुस्तक न वाचणारी तेजोमयीसुध्दा असू शकेल… फेणेकडे वळून हॅरी त्याला सांगू लागला. पण फेणेच कुठे लक्ष होतं. त्याच्याकडे असलेल्या बटयाटयाची चाळ या पुस्तकात केव्हाच डोकं खुपसून बसला होता.
सुरेश वांदिले
.jpg)