बाप्पांची एक गोष्ट बाबा तेजोमयीला सांगत होते. तशी ती सर्वांनाच ठाऊक असलेली. बाप्पा आणि त्यांचे बंधुराज कार्तीकस्वामी यांच्यात एकदा स्पर्धा लागली, की कोण सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतो ते. यावेळी नारदमुनी तिथेच होते. पार्वती माता आणि महादेवांना वंदन करुन कार्तीकस्वामी पृथ्वीप्रदक्षिणेसाठी निघालेसुध्दा.
मात्र, बाप्पा तेथेच घुटमळत राहिले.
“अरे, तू गेला नाहीस अजून.“ नारदमुनींनी विचारलं.
“मला जायची गरज नाही.” बाप्पा उत्तरले.
“या स्पर्धेत हरशील अशी भीती वाटतेय का तुला?” नारदमुनी, पार्वतीमाता आणि महादेवांनी एकाच वेळी बाप्पांना विचारलं.
“नाही हरणार? मीच जिंकणार.“ बाप्पा आत्मविश्वासानं म्हणाले. नारदमुनी, पार्वती माता आणि शंकर भगवान यांना आश्चर्य वाटलं.
कार्तीकस्वामी, त्यांचं वाहन असलेल्या मोरावर बसून कधीचेच खूप दूर निघून गेले होते. बाप्पांचं वाहन असलेले मूषकस्वामी मोदकावर ताव मारत होते. हा जाणार कधी आणि पृथ्वीला प्रदक्षिणा मारणार कधी? तिघांनाही प्रश्न पडला. अखेरीस नारदांनी न राहवून विचारलच…
“गणेशा अरे, तू अद्याप इथेच आहेस. कार्तीकेयाने तर एव्हाना अर्धी पृथ्वी पालथी घातली असेल. तू आता जरी इथून निघालास तरी तू कार्तीकेयाच्या निम्म्यावरसुध्दा जाऊ शकणार नाहीस.“
बाप्पा हसले. त्यांनी पार्वती माता, महादेव आणि नारदमुनींना वंदन करुन पार्वती मातेस प्रदक्षिणा घातली. नारदांकडे वळून म्हणाले,
“महर्षी, झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा!” कार्तीकेयदादा तर दूरुन दूरुन सुध्दा दिसत नाहीत मला.“
“हे कसं शक्य?” नारदमुनींना प्रश्न पडला. मात्र महादेव आणि पार्वती मातेस कळून चुकलं.
“अहो, नारदमहर्षी, पृथ्वीचं दुसरं रुप कोणतं? आईचच ना. गणेशाने त्याच्या आईला प्रदक्षिणा घातली म्हणजे, पृथ्वीला प्रदक्षिणा नाही का घातली? महादेवांनी नारदांना समजावून सांगितलं. पार्वती मातेने कौतुकानं बालगणेशाला कवटाळलं. नारदमुनींना गणेशाच्या बुध्दीचं आणि चातुर्याचं कौतुक वाटलं. त्यांनीही त्याची तोंडभरुन स्तुती केली.
” वेळप्रसंग पाहून अशी हुषारी, अशी बुध्दी चालवावी लागते. हा धडा यातून आपण शिकायचा.“ बाबा तेजोमयीस सांगते झाले.
०००
“अहो, किती दिवस हा धडा तुम्ही सांगत राहणार आपल्या लेकीला.“ हॉलमध्ये आवाज घुमला. सर्वांनी चमकून दाराकडे बघितलं.
दस्तुरखुद्द बाप्पांचं आगमन झालं होतं घरी.
बाप्पांना बघताच तेजोमयी आणि बाबांना खूप आनंद झाला. आई, लगबगीने स्वयंपाकखोलीतून बाहेर आली. बाप्पांना बघून ती गहिवरुन गेल्याने त्यांना दंडवत घालायची विसरली. आई दररोज बाप्पाच्या मूर्तीला नमस्कार घालते हे अलेक्झांडर बघत असे. आज बाप्पा, समोर दिसत असताना ती बाप्पांना दंडवत कां घालत नसावी, असे आश्चर्ययुक्त भाव त्याच्या डोळयात उमटले. त्याने त्याच्या पध्दतीने खाणाखुणा करुन, तसं सुचवायचा प्रयत्न केला, तरी आईच्या लक्षात आलं नाही. मग, अलेक्झांडरच बाप्पांच्या पाया पडला. तेव्हा कुठे आईबाबा आणि तेजोमयीस कळलं. तिघांनीही बाप्पांना दंडवत घातला. बाप्पांनी सर्वांना आशीर्वाद दिला. बाप्पा आसनस्थ झाले.
बाप्पांसोबत आलेला मूषकस्वामी हा थोराघरचा असल्याचं अलेक्झांडरनं लगेच ओळखलं. त्यामुळे त्याने मूषकस्वामींसोबत लगेच सलगी केली. ते दोघेही तिथेच खेळत बसले.
“बाप्पा, तुम्ही आमच्याकडे येत असताना म्हणालात की,
“पृथ्वी प्रदक्षिणेचा धडा किती दिवस सांगणार म्हणून? याचा अर्थ काय?” तेजोमयीनं विचारलं.
बाप्पा असं कां म्हणाले असतील याचं आश्चर्य आईबाबांनांही वाटलं होतं, त्यामुळे ते बाप्पा काय सांगतात, याकडे कान देऊन ऐकू लागले.
बाप्पा सांगू लागले.
“अहो आईबाबा, काही गोष्टी प्रतिकात्मक असतात. मात्र ती प्रतिके किती दिवस मिरवत बसायची आपण.
“म्हणजे हो काय बाप्पा?” बाबांनी विचारलं.
“अहो बाबा, आता माझंच बघाना. दादा आणि मला पृथ्वी प्रदक्षिणा कोण आधी घालू शकतो हे सांगितलं गेलं, तेव्हा मी पार्वतीमातेस प्रदक्षिणा घालून बाजी मारली. आईचं प्रतीक पृथ्वी आणि पृथ्वीचं प्रतीक आई असल्यानं मी स्पर्धा जिंकली. पण पुढे सारा घोटाळाच झाला ना.”
“कसला घोटाळा बाप्पा?” आईनं उत्सुकतेनं विचारलं.
“अहो, आमच्या वार्षिक परीक्षेत पृथ्वीवरील पाच मुख्य थंड हवेच्या ठिकाणांची माहिती विचारली गेली. पृथ्वीवरच्या महासागारावर निबंध लिहिण्याचा एक प्रश्न होता. समुद्रातील जलचरांचे चित्र काढण्याचाही प्रश्न होता.
मग काय झालं.तुम्हाला तर सगळंच येतं. तुमच्या सारखे हुषार आणि स्मार्ट दुसरं कुणीच नाही ना.तेजोमयी कौतुकाने म्हणाली.
अगं ते बोलायला ठीक पण, हुषार होण्यासाठी अभ्यास तर करावाच लागतो ना. मी पृथ्वी प्रदक्षिणेला गेलोच नसल्याने मला एकाही थंडहेवच्या ठिकाणाचं वर्णन करता आलं नाही. निबंध लिहिता आला नाही. समुद्रातील जलचर काळे असतात का निळे हेच माहिती नसल्याने त्यांचे चित्रही काढता आले नाही. मात्र कार्तीकेय दादास तिनही प्रश्न उत्तम रितिने सोडवता आले.त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले.या प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेस माझी दांडी उडाली. फे फे उडाली. इथे कोणतंही प्रतीक माझ्या कामी आलं नाही.”
“पार्वती मातेने चमत्कार कां नाही केला, तुम्हाला या संकटातून सोडवण्यासाठी?” तेजोमयीनं निरागसपणे विचारलं.
“अगं बाळ, चमत्काराने कधीच परीक्षेत उत्तीर्ण होता येत नाही. तसं करणं म्हणजे स्वत:चीच फसवणूक नाही का? पार्वतीमातेला तर कदापी मान्य झालं नसतं. मलासुध्दा असं काही करुन परीक्षेत उत्तीर्ण होण्यात अजिबातच रस नाही. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ज्ञान लागतं. त्यासाठी परिश्रम करावे लागतात.आईला प्रदक्षिणा घालून मी स्मार्टपणा दाखवला.पण कार्तीकेय दादाने परीश्रमपूर्वक पृथ्वी प्रदक्षिणा केल्याने त्याच्या ज्ञानात भर पडली नि त्याचा फायदा त्याला वार्षिक परीक्षेत झाला. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की प्रतीकं त्याच्या जागी ठीक असतात. पण प्रत्यक्ष कार्याच्या वेळी ती फारशी किंबहुना काहीच कामाची नसतात, हा धडा मी तेव्हा शिकलो. हाच धडा आताच्याही मुलांना द्यायला नको का?”
“बरोबर आहे बाप्पा तुमचं. “आमचे डोळे उघडल्याबद्दल तुमचे किती आभार माणावे तेच कळत नाही.“ आई म्हणाली.
“आभार माणायचेच असतील तर तुम्ही माझ्यासाठी उकडीचे मोदक बनवाना आई.” बाप्पांनी फर्माइश केली. आई आनंदाने तत्काळ उकडीचे मोदक बनवण्याच्या तयारीला लागली.
आईचे मोदक होईस्तोव बाप्पांसोबत बाबा आणि तेजोमयीच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. खेळूनखेळून कंटाळा आल्याने मूषकस्वामी आणि अलेक्झांडरही त्यांच्याजवळ येऊन बसले.
आईचे मोदक तयार झाले. ती जेव्हा बाहेर मोदक घेऊन आली तर बाप्पा तिथे नव्हतेच.
बाबा आणि तेजोमयी, बाल गणेश मालिका पाहण्यात गुंग झाले होते. अलेक्झांडरही जिभ लांब करत तन्मयतेने मान डुलवत होता.
“अहो, बाप्पा गेले कुठे? आईनं विचारलं.
“ते तर देवघरातच आहेत, ते इथे कुठे आले होते? बाबा म्हणाले.
“आँ!”
“तुला भास झाला की काय?” तेजोमयीनं विचारलं.
“नाही गं, त्यांनीच तर हे उकडीचे मोदक बनवायला सांगितलं ना!” मोदकांकडे बोट दाखवत आई म्हणाली.
“अगं आई, तू दरवर्षीच त्यांच्यासाठी मोदक नाही का करत. नवं काय त्यात.“
“त्यांना आवडतात म्हणून करते.”
“ते आवडण्याचं प्रतीक आहे आई. बाप्पांसाठी प्रेमानं काहीही केलं तरी चालतं. बरोबर ना बाबा!”
“हो अगदी बरोबर.“
“म्हणजे मी उभ्याउभ्या स्वप्न बघत होते की काय?” आई म्हणाली. तिने मग स्वप्नात काय बघितलं ते सांगितलं.
“तर, बाळ या स्वप्नाचा अर्थ काय बरं लावायचा?” बाबांनी तेजोमयीस विचारलं.
“प्रतिकापेक्षा प्रत्यक्ष कार्य करणं महत्वाचं. प्रतीकं तात्पुरती असतात. काम मात्र कायमस्वरुपी राहतं. बरोबर ना रे अलेक्झू?” त्याच्याकडे बघत तेजोमयी म्हणाली.
‘तुमचं तुम्ही बघा‘, असे भाव चेहऱ्यावर आणत त्याने आईकडून बळजबरीने मोदक मिळवून त्यावर ताव मारु लागला.
सध्यातरी मोदकच महत्वाचं हे ध्यानात आल्यानं तिघांनीही मोदकाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.
सुरेश वांदिले
००००