(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेकांना, बरेचदा गडचिरोली हे नाव  ठाऊक नसतं. कुरखेडा हे नाव तर त्यांना परग्रहावरचच वाटण्याची शक्यता अधिक. तर, गडचिरोली हा महाष्ट्रातील जिल्हा आणि त्यातील कुरखेडा, हे एका छोट्या तालुक्याचं गाव. अशा या कुरखेड्या तालुक्यातील चिरचाडी या अगदीच चिरकूट किंवा लहान गावात माझा जन्म झाला. ते साल होतं १९७८.

माझ्या घरी अठराविश्वे दारिद्र्य! म्हणजे किती?  

तर, दोन वेळेचं जेवणसुध्दा बरेचदा मिळणं अशक्य व्हायचं. माझ्या वडिलांकडे जमिनीचा एक छोटा तुकडा होता. त्यात ते भाताचं पीक घेत. ते पोटभरण्यासाठी पुरेसं नव्हतं. घरी आईबाबा आणि एक छोटा भाऊ. भाताचं पीक निघालं की माझे आईबाबा रोजगार हमी योजनेसारख्या वेगवेगळया शासकीय कामांवर जात. त्यातून जो काही मोबदला मिळे तो दररोजच्या गरजेच्या आवश्यक वस्तू घेण्यासाठी पुरेसा नसे. तीन-चार महिने आमच्या घरी कोणतच उत्पन्नाचं साधन नसायचं, कारण शासकीय काम हे मर्यादित काळापुरतं असायचं.

१९८० साली आम्हाला या गावात जीवन जगणं कठीण होऊन गेलं. तेव्हा माझ्या बाबांनी १०० किलोमीटर दूर असलेल्या एका गावी जाण्याचं ठरवलं. हे गाव होतं नक्सलग्रस्त एटापल्ली तालुक्यातील कसनसूर! नक्सलग्रस्त म्हणजे ज्या ठिकाणी, काही व्यक्ती सतत या ना त्या कारणांसाठी शासकीय यंत्रणा व नागरिक यांना वेठीस धरतात, ते गाव किंवा प्रदेश. प्रसंगी शासकीय कर्मचारी, पोलीस आणि अधिकारी यांना अशा ठिकाणी ठार केलं जातं. शासनाच्या म्हणजेच जनतेच्या मालमत्तेची नासधूस केली जाते.

अशा या सदैव धोकादायक आणि स्फोटक ठिकाणी असलेल्या आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणा किंवा आचाऱ्याची एक जागा निघाल्याचं माझ्या बाबांना, एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं. माझ्या बाबांकडे तेव्हा एक तोडकीमोडकी सायकल होती. १०० किलोमीटरचा प्रवास, या तोडक्यामोडक्या सायकलीवर बसून करणं शक्य नव्हतं. त्यावर बसून काही अंतर कापलं की या गंजून गेलेल्या सायकलीला चालवणं शक्य होत नसे. त्यामुळे बरेचदा पैदलच चालावं लागायचं. बाबांच्या खांद्यावर माझा दोन वर्षाचा भाऊ असायचा. पण, मी त्याच्यापेक्षा मोठा असल्याने, मला पायी चालण्यावाचून पर्याय नव्हता. अत्यंत खडतर असा प्रवास करुन, मी, आईबाबा आणि माझा लहान भाऊ असे, चौघेहीजण कसेतरी कसनसूरला पोहचलो.

इथे आम्हाला थोडा दिलासा मिळाला. आश्रमशाळेच्या परिसरात माझं शिक्षण सुरु झालं. या अत्यंत बिकट परिस्थितीत माझ्या बाबांनी, मला कायम समजावलं की, “जीवनात प्रगती करायची असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणासाठी प्रामाणिपणे अखंड परीश्रम केले पाहिजेत, ते तू कधीही विसरु नकोस”.  माझ्या बाबांचे हे बोल मी कायम लक्षात ठेवले. एका पाठोपाठ एक अशा अनंत अडचणी येत राहिल्या, पण मी, शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही.

कसनसूर येथील आश्रमशाळेत, माझं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर मला शिष्यवृत्ती मिळाली. पुढे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर गावात असणाऱ्या शासकीय शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर मी, ११ वी आणि १२ वीचं शिक्षण घेण्यासाठी गडचिरोली येथे आलो. तेव्हा गडचिरोली तालुक्याचं ठिकाण असूनही खूप मागास होतं. तिथे कोणत्याही सोईसुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या. दळणवळणाची साधनं नव्हती. मात्र या परिस्थितीचा बाऊ मी केला नाही.

अत्यंत खडतर परिस्थितीत मी माझं दहावी-बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर गडचिरोलीतील एका विज्ञान महाविद्यालयात मी बी.एस्सी (बॅचलर ऑफ सायंस) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य, हे बाबांचं सांगणं मी एकही क्षण विसरलो नाही. प्रत्येक क्षण नि क्षण, ज्ञानार्जनात घालवला. मला चांगल्या गुणांनी पदवी मिळाली.

आता माझी ज्ञानतृष्णा आणखी वाढली. याच काळात नागपूर शहरात पुढच्या शिक्षणाची सोय असल्याचं मला कळलं. नागपुरातील, इंस्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत मी, बी.एस्सीनंतर, रसायनशास्त्र या विषयात एम.एस्सी (मास्टर ऑफ सायंस)साठी प्रवेश घेतला. माझं जीवन बदलवून टाकणारा हा निर्णायक टप्पा ठरला. माझ्यासाठी नवं जग उघडलं गेलं. प्रगतीच्या वेगवेगळया संधी मला दिसू लागल्या. काही संधी माझ्याकडे स्वत:हून चालत येऊ लागल्या.

सगळया विषयांचा परिपूर्ण आणि सखोल अभ्यास, यापलिकडे मला काही सुचत नसे. त्यामुळे माझा विज्ञान विषयाचा पाया अधिकाधिक पक्का होत गेला. त्यातून माझा आत्मविश्वासही वाढला. यापेक्षाही अधिक ज्ञान प्राप्त करता येणं शक्य असल्याचं मला नागपुरात कळलं. त्यातूनच, माझ्या विषयाच्या अनुषंगाने अमेरिकेत प्रगत शिक्षणाच्या संधी असल्याचं कळत गेलं.

ही संधी सोडायची नाही, हा निर्धार मी केला. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षा देऊन, माझ्या आवडत्या विषयात संशोधन करण्यासाठी, मिशिगन टेक्नॉलॉजकिल युनिव्हर्सिटीत पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. इथे सुध्दा प्रत्येक क्षण नि क्षण मी संशोधन कार्यात आणि सखोल अभ्यासात झोकून दिला. मला उत्तम गुणांनी पीएचडी प्राप्त करता आली. आता या घटनेला दहा वर्षाहून अधिक काळ लोटलाय.

पीएचडी पदवी मिळाल्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. मला, अमेरिकेतील जर्मनटाऊन एमडी, या ठिकाणी असणाऱ्या सिरनॉमिक्स या आघाडीच्या जैविकऔषधनिर्मिती कंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. या संधीचं मी सोनं केलं. अत्यंत आधुनिक अशा तंत्रज्ञानावर मी हुकूमत मिळवली. बऱ्याच महत्वाच्या औषधींची निर्मिती ही कंपनी करते. त्यातील काही औषधींचा मूळ आराखडा माझ्याव्दारेच तयार केला जातो. काही औषध निर्मितीत माझा शब्द अखेरचा समजला जातो.

माझा जन्म आदिवासी समाजात झाला. माझ्या घरी अठराविश्वे दारिद्य होतं. पण, या परिस्थितीला मी कधीही दोष देत बसलो नाही आणि कठोर परीश्रमाशिवाय पर्याय नाही, या मंत्राला विसरलो नाही. त्यामुळेच आज या कंपनीत माझं स्वत:चं आगळवेगळं स्थान निर्माण करु शकलो.

माझं नाव भास्कर.

भास्कर म्हणजे सूर्य. सूर्याची किरणं आपल्या पृथ्वीला प्रकाशमान करतात. आपल्याला उर्जा देतात. अथक परीश्रम करण्याची उर्जा आपण घेतली पाहिजे आणि शिक्षणातूनच प्रगती साध्य होऊ शकते, हे कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. माझ्याशिवाय याचं दुसरं कोणतं बरं दुसरं उदाहरण राहू शकेल.

तर, मी डॉ. भास्कर हलामी.

हल्ली मुक्काम अमेरिका.

००००

( डॉ.भास्कर हलमा यांची ही गोष्ट सर्वांनाच प्रेरणादायी अशी. आपल्याकडे अमूक नाही, तमूक नाही, असं सतत कमरतेचं भांडवल करणाऱ्या आणि त्यामुळेच आपण मागे पडलो, यश मिळत नाही, काहीच जमत नाही असं सांगून स्वत:ला  फसवणाऱ्यांसाठी अधिकच प्रेरणादायी  आणि डोळयात अंजन घालणारी! )

सुरेश वांदिले