(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या सर्वच संवर्गातील विद्यार्थींनींना या योजनेंतर्गत दरवर्षी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. यामधून शिक्षण शुल्क, संगणक खरेदी, पुस्तके, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर अशा सारख्या बाबींचा खर्च भागवता येऊ शकतो. या खर्चाचा कोणताही पुरावा देण्याची आवश्यकता नसते. हे अर्थसहाय्य पदवी अभ्यासक्रमासाठी चार वर्षे आणि पदविका अभ्यासक्रमासाठी तीन वर्षे दिले जाते. ही योजना अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची आहे. प्रत्येक राज्यासाठी शिष्यवृत्तींची संख्या ठरविण्यात येते. त्याअनुषंगाने पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या ५५३ आणि पदविका अभ्यासक्रम मिळालेल्या ६२४ महाराष्ट्रातील विद्यार्थींनींना याचा लाभ दिला जातो.  संबंधित विद्यार्थीनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील केवळ दोन मुलींनाच या  शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. या शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी पात्रता परीक्षेमधील (सीटी/जेइइ) गुण ग्राह्य धरले जातात. त्यासाठी १२वी किंवा समकक्ष परीक्षेतील गुणांच्या टक्केवारींचा आधार घेतला जातो.

(संपर्क संकेतस्थळ – www.aicte-india.org  आणि संकेतस्थळ- www.scholarships.gov.in )

०००

 सक्षम शिष्यवृत्ती योजना

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मंजूरी असलेल्या अधिकृत संस्थेत पदविका आणि पदवी तांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विशेष सक्षम (दिव्यांग) विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जातो. कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न  रुपये  ८ लाखापर्यंत असावे. दिव्यांगाचे प्रमाण ४० किंवा त्यापेक्षा अधिक असावे.  या योजनेंतर्गत पदवी व पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

(संपर्क संकेतस्थळ – www.aicte-india.org  आणि संकेतस्थळ- www.scholarships.gov.in )

०००

 स्वनाथ शिष्यवृत्ती योजना

तांत्रिक  विषयाच्या पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांसाठी अधिकृत संस्थेत शिकणाऱ्या अनाथ किंवा ज्या विद्यार्थ्याचे आई वडील दोघेही किंवा दोघांपैकी एक कोव्हिड-१९ ने मृत्यू पावले, किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक सशस्त्र दल आणि केंद्रिय निमलष्करी दलांच्या कारवाईमध्ये शहीद झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. कुटुंबाचे सर्व स्त्रोतांमार्फत मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये लाखापर्यंत असावे.

या योजनेंतर्गत पदवी व पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या प्रत्येकी एक हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी ५० हजार रुपयांचं अर्थसाहाय्य केले जाते.

(संपर्क संकेतस्थळ – www.aicte-india.org  आणि संकेतस्थळ- www.scholarships.gov.in )

००००

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजना

वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा सारख्या  व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेताना गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजा भागवणे बऱ्याचदा कठीण जाते. त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी  , प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजना सुरु करण्यात आली. ही योजना केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत राबवली जाते. शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी १२ वीमध्ये मिळालेल्या गुणांचा आधार घेतला जातो. एकूण शिष्यवृत्तीच्या संख्येपैकी ५० टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहेत. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयांच्या मर्यादेत असावे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती वार्षिक १२ हजार रुपये असून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी २० हजार रुपये आहे.  पाच वर्षे कालावधीच्या व्यावसायिक किंवा इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षी २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. बी.टेक आणि बी.ई अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षी २० हजार रुंची शिष्यवृत्ती दिली जाते.

संपर्क- सेक्शन ऑफिसर, नॅशनल स्कॉलरशीप डिव्हिजन डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, वेस्ट ब्लॉक १, दुसरा माळा, विंग सहा, आर. के. पूरम, सेक्टर १, नवी दिल्ली- ११००६६, दूरध्वनी- ०११-२०८६२३६०, संकेतस्थळ -www.scholarships.gov.in

सुरेश वांदिले