आज सकाळी, उठल्याउठल्या तेजोमयीने घरातील पुस्तकांचं कपाट बघायला सुरुवात केली. एकएक पुस्तक काळजीपूर्वक बघून नेटकेपणानं जागेवर ठेवलं.
आज हिला कोणत्या पुस्तकाची गरज सकाळीच भासावी याचं कोडं आईबाबांना पडलं. आधी आईने येऊन विचारलं…
“काय गं, आज कोणतं पुस्तक हवं होतं तुला? बाबांना सांगितलं असतं तर शोधून दिलं असतं ना पटदिशी. तुझा वेळसुध्दा गेला नसता मग.”
आईकडे बघून तेजोमयी हसली.
“अगं, हसतेस कशाला?”बाबांनी विचारलं.
“तसं नाही हो बाबा, मला खात्री करुन घ्यायची होती.”
“कशाबद्दल?”
“आपल्या घरी “ते” पुस्तक आहे का याची!
“ते” पुस्तक म्हणजे?”आईने विचारलं.
“अगं, “ते” म्हणजे? भारताची राज्यघटना!”
“मिळालं का मग ते?”आईने पुन्हा विचारलं.
“नाही ना.”असं बोलून तेजोमयीनं बाबांकडे बघितलं.
“काय हो, हे पुस्तक आपल्या घरी नाही का?” आईने बाबांना प्रतिप्रश्न केला.
“नाही म्हणजे, तसं काही नाही पण…”
“अहो बाबा, सरळ सरळ नाही म्हणाना .”
“नाही तर नाही, यात काय एवढं आढवेढं घेण्यासारखं!” अशी प्रतिक्रिया देऊन आई दुसऱ्याखोलीत निघून गेली.
“अगं, तुला कशासाठी हवं होतं हे पुस्तक?” बाबांनी विचारलं.
“अहो बाबा, आज प्रजासत्ताक दिन नाही का?”
“आहे की…”
“तो आपण कां साजरा करतो ?”
“कारण आपण आज प्रजासत्ताक झालो.”
“म्हणजे काय झालं?”
“अहो टिचरबाई, या सगळया प्रश्नांची उत्तरं देऊन झालीत की मी शाळेत असताना.”
“मग आतासुध्दा द्याना.”
“आज, प्रजासत्ताक दिन साजरा करतो कारण आपल्या देशाची स्वतंत्र अशी घटना लागू झाली. आपल्या सर्वांना हक्क आणि अधिकार मिळाले. आपण सार्वभौम झालो.”
“हे ज्या राज्यघटनेमुळे झालं, त्या घटनेचं पुस्तक आपल्या घरी नको का बाबा मग? इतकी पुस्तकं आणि ग्रंथ तुम्ही विकत घेता. पण हे पुस्तक मात्र तुम्हास विकत घ्यावं वाटलं नाही.”
या प्रश्नानं बाबांना निरुत्तर केलं.
०००
“अहो चला चला, गप्पा नंतर करा. कॉलनीतल्या झेंडावंदनाची वेळ झालीय.”असा दुसऱ्याखोलीतून आईने आवाज दिला . त्यामुळे बाबांची सुटका झाली. पटपट तयारी करुन तिघेही खाली झेंडावंदनास गेले. झेंडावंदन झालं.
राष्ट्रगीतानंतर तेजोमयी सर्वांच्यासमोर जाऊन म्हणाली.
“आजच्या प्रजासत्ताक दिनी माझ्या बाबांनी एक स्पर्धा आयोजित केलीय”.
बाबांनी आईकडे आणि आईने बाबांकडे चमकून बघितलं. बाईसाहेबांमुळे एखादं नवं संकट आपल्यावर कोसळणार, याची बाबांना खात्री पटली. आईला तेजोमयीचा हा आगावूपणा वाटला. घरी गेल्यावर चांगलीच खडसावते, असं आईने मनोमन ठरवलं.
इकडे तेजोमयीचं बोलणं सुरुच होतं…
ती म्हणाली,”बक्षिसाची रक्कम १००० रुपये.”
“वा S व!” जमलेल्यापैकी पंकज जोरात म्हणाला.
“पण स्पर्धा काय?”सुवरे काकांनी विचारलं.
“आपल्या कॉलनीत ज्यांच्या घरी राज्यघटनेचं पुस्तक असेल, त्याला माझे बाबा एक हजार रुपये देतील.”
तेजोमयीच्या या घोषणेनंतर प्रत्येकजण एकमेकांकडे बघू लागला. एकानेही हात वर केला नाही.
“कुणाला आता आठवत नसेल तर घरी जाऊन पुस्तकाच्या कपाटात शोधा. अर्ध्या तासात सांगा.”
“तेजो, आमच्या घरी पुस्तकाचं कपाटच नाही.” समीर म्हणाला. बऱ्याच मुलांनी असंच सांगितलं. यावर जोरदार हशा उमटला. काहिंनी टाळया वाजवल्या.
झेंडावंदन कार्यक्रमाच्या गांभीर्यास गालबोट लागत असल्याचं बघून कॉलनीचे सचिव आंबेकरांनी सूत्रं हातात घेतली.
त्यांनी तेजोमयीस विचारलं…
“अगं, अशी स्पर्धा घोषित करण्यास, तुझ्या बाबांनी तुला सांगितलं का? की तुझाच स्वत:चा शहाणपणा!”
“माझाच शहाणपणा काका! अहो, आज प्रजासत्ताक दिन ज्या राज्यघटनेमुळे साजरा होतो, त्या राज्यघटनेचं पुस्तक आपल्या सर्वांच्या घरी नको का? ते सर्वांनी वाचायला नको का? निव्वळ झेंडावंदन करुन काय उपयोग? हा झेंडा ज्यामुळे सार्वभौम झाला, डौलात फडकू लागला, ती घटना नेमकी काय, हे तुम्ही समजून घ्यायला आणि आम्हा मुलांना समजून सांगायला नको का?” तेजोमयी धाडधाड बोलत राहिली. तिचा तो त्वेष बघून आंबेकरकाका आणि इतर जमलेले सर्व काकाकाकू थक्क झाले. मुलांना तिचं म्हणणं पटलं.
‘तेजोमयी जिंदाबाद’, असा नारा विनयने, दिला. तेजोमयीच्या बाबांनी या नाऱ्याला प्रतिसाद दिला. ते सर्वांसमोर येऊन म्हणाले…
“तेजो, आगावूपणा करतेय असं मला वाटलं होतं. पण तिने आपल्या सर्वांच्या डोळयात चांगलच अंजन घातलय. आपण ही चूक लगेच दुरुस्त केली पाहिजे. मी स्वत: दोन दिवसात कॉलनितल्या प्रत्येकाच्या घरी राज्यघटनेचं पुस्तक माझ्या वतीने भेट देईन.
“वा वा बाबा…यू आर ग्रेट!” असं बोलून तेजोमयीने बाबांना मिठी मारली.
०००