(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कितीही रात्र झाली तरी चद्रांवर उतरणाऱ्या चंद्रयानाचं थेट प्रक्षेपण बघणारच असं, सुमीतनं सहा सप्टेंबरला सकाळी-सकाळीच घरी सांगितलं. त्याच्या आईबाबांनाही यानाचं चंद्रावर उतरणं बघण्याची उत्सुकता होती. त्यामुळे रात्री साडे-अकरा नंतर आईबाबा आणि सुमीत टीव्हीसमोर ठाण मांडून बसले.

  चंद्रयान अगदी ठरलेल्या गणितानुसार चंद्राच्या दिशेनं योग्यपध्दतीनं जात होतं. या यानाचं नियंत्रण थिरुवनंतपूरम येथील इस्त्रोच्या मुख्यालयातून होत होतं. तेथील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची हुरहूर, उत्सुकता टीव्हीच्या पडद्यावरुन बघायला मिळत होती. भारताचे प्रधानमंत्रीसुध्दा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी सर्व शास्त्रज्ञांसह तिथे उपस्थित होते.

  चंद्रयान चद्रांच्या पृष्ठभागापासून आता केवळ दोन किलोमीटरवर आलं होतं. चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर जगातील कोणत्याही देशाचं यान पहिल्यांदा उतरण्याचा क्षण अगदी समीप आला होता. समीरच्या छातीचे ठोके वाढू लागले. मन उत्साहानं भरुन आलं . अंगावर रोमांच उभे राहत होते. पुढच्या काही मिनिटांमध्ये हे दोन किलोमीटरचं अंतर कापून चंद्रयान (विक्रम लँडर) ठरलेल्या जागी उतरणार होतं. पण अचानक चंद्रयानाचा संपर्क खंडीत झाला. ते शास्त्रज्ञांच्या नजरेपासून दूर झालं. प्रधानमंत्र्यांसह सर्वांच्या ह्रदयाचे ठोके चुकले.

  सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे चेहरे पडले. चूक कोणाचीच नव्हती. तरी काही शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील अपराधीपणाची भावना लपून राहिली नाही. टीव्हीवरुन ते सारं काही स्पष्टपणे दिसत होतं. समीरलाही वाईट वाटलं. मात्र, प्रधानमंत्र्यांनी जेव्हा सर्व शास्त्रज्ञांना सांगितलं, ‘की तुम्ही अयशस्वी नाही आहात. विज्ञानात कधी कुणाला अपयश येत नाही. तिथे प्रयोग होतात. प्रत्येक प्रयोगात अधिकाअधिक सुधारणा करावयाची असते. प्रत्येक प्रयोगातून नवं शिकायला मिळतं. प्रत्येक प्रयोग आपणास अधिक अचुकतेनं  कार्य करण्याची प्रेरणा देतो.’ तेव्हा या संवादानं समीर प्रभावित झाला.

  चंद्रयान चंद्रावर उतरु शकलं नाही, याचं झालेलं दु:ख त्याने बाजूला सारलं. पहाटेचे तीन वाजले होते. आता त्याच्या डोळयावर झोप दाटून आली. काही क्षणातच सुमीत गाढ झोपी गेला…

०००

  दुसऱ्या दिवशी तो उठला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होतं. त्याचं ते लोभसवाणं रुप बघून आईने त्याला जवळ घेऊन त्याचे लाड केले.

  “काय मग, रात्री झापेत तू चंद्रावर जाऊन आलास की चांदोबाच तुझ्या स्वप्नात येऊन तुला  गोष्टी सांगून गेला?” बाबांनी त्याचा गाल ओढत विचारलं.

  सकाळचं असं हलकं-फुलकं वातावरण बघून आपणही थोडा खेळकरपणा करायला हवं असं समीरला वाटलं. बाबांच्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला,

  “चांदोबा, खरंच माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला, सम्या आता शिक्षण पुरं झालं.”

“असं म्हणाला तो! चांगलं झाडूने झोडपून काढायला हवं त्याला.” बाबा लटक्या रागानं म्हणाले.

  “त्याचं काय करायचं ते पुढे ठरवू. आधी माझं म्हणणं तर पूर्ण करु द्या ना.”

  “बोला महाराज,” बाबा उद्गारले.

  “आता शिक्षण पुरे, असं जेव्हा मला चंद्र म्हणाला, तेव्हा मीही त्याला रागावलो.”

  “मग काय झालं?”

   तो पुन्हा म्हणाला, “तू शिकू नकोस, पण प्रयोगशाळेत जा.”

  “पण तिथेही शिकावचं लागतं.”

  “मीसुध्दा असच विचारलं त्याला. तर तो म्हणाला, “प्रयोगशाळेतलं शिक्षण हे खरं शिक्षण. कागदावर जे असतं ते तिथे प्रत्यक्ष घडवून आणता येतं.”

  “म्हणजे काल रात्री प्रधानमंत्री जसं बोलले, त्याच आशयाचं हे त्याचं सांगणं होतं तर…”

  “अगदी बरोबर बाबा. तेव्हाच मी ठरवलं की आता शिकायचं नाही तर थेट प्रयोगशाळेतच जायचं.”

“ग्रेट आयडिया आहे ही!”आई म्हणाली.

  “ही कसली ग्रेट आयडिया! आधी शिकून मग प्रयोगशाळेत जा म्हणावं.” बाबा किंचित रागावून म्हणाले.

  “बाबा काहीही म्हणत असले तरी तू मात्र प्रयोगशाळेतच जास्त रम हं,असं आईनं सुमीतला जवळ घेत सांगितलं. समीरने आईकडे कौतुकानं बघितलं.

०००

  आईची परवानगी मिळाल्यानं सुमीत खूप खुष आहे.

समीर सध्या नवव्या वर्गात शिकतो. विज्ञानाचे काही प्रयोग नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांना करावे लागतात. शाळेची बऱ्यापैकी प्रयोगशाळा आहे. विज्ञान शिक्षक जेवढे प्रयोग करायला शिकवतात, ते तर तो आवडीनं करतोच. शिवाय त्याच्या अभ्यासक्रमातील विज्ञानाच्या पुस्तकातील जे प्रयोग करुन बघा, असा गृहपाठ असतो, तेही करण्यासाठी शिक्षकांकडे आग्रही असतो. आम्ही करवून घेतो, एवढे प्रयोग परीक्षेसाठी पुरेसे आहेत, असं ते रागावून म्हणतात. पण सुमीत काही त्यांचा पिच्छा सोडत नाही. त्याचा पाठपुरावा बघून विज्ञान शिक्षक त्याला आता प्रयोग करण्यासाठी मदत करतात.

०००

  सुमीचे मामा पुण्याला राहतात. आईसोबत तो रक्षाबंधनाच्या दिवशी तो पुण्याला गेला असताना त्याच्या आईने मामाला, सुमीतच्या  विज्ञान प्रयोगप्रेमाची ओढ सांगितली. हे ऐकून मामाला आनंद झाला. त्याने दुसऱ्या दिवशी पुण्यातील पाषाण भागात असणाऱ्या,’ इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च म्हणजेच आयसर’, ही संस्था बघायला त्याला नेलं. तेथील एक प्राध्यापक मामाच्या ओळखीचे आहेत. त्यांच्या मदतीने मामाने ही संस्था सुमीतला दाखवली.

  विज्ञानाच्या प्रयोगांवरच भर देणाऱ्या या संस्थेतील भव्य प्रयोगशाळा बघून तो मोहरुन गेला. आता यापुढे शिकायचं तर याच संस्थेत असं त्यानं मनोमन ठरवून टाकलय.

मामाच्या प्राध्यापक मित्राने त्याला माहिती दिली की १२  वी नंतर विज्ञानशाखेतील मुलांना या संस्थेत प्रवेश मिळतो. पहिल्या काही दिवसांपासूनच मुलांना प्रयोग करण्याची संधी दिली जाते. इथे प्रयोगांवरच अधिक भर दिला जातो. चांदोबाच्याआडून सुमीतने जे काही आईबाबांना सांगितलं होतं, ते प्रत्यक्ष साकारणारी ही संस्था असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

०००