(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

प्रल्हादरावांची अट

आज रात्री प्रल्हादराव, कॉलनीत येणार असल्याचं सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीने, आई-बाबांना सांगितलं. कोण हा प्रल्हादराव, आईबाबांना काही आठवेना.

काय गं, हे प्रल्हादराव रात्रीच कां येणारेय, सकाळी कां नाही? आईनं विचारलं.

प्रल्हादरावांना कसं विचारणार?ते तर हिरण्यकश्यपूचे चिरंजीव. तेजोमयी नाटकी सुरात म्हणाली.

आँ! आईबाबांनी एकाचवेळी प्रतिक्रिया दिली. दोघांचाही भलामोठा आँ, कानावरुन जाताच अलेक्झांडरने कान टवकारले. तिघांमध्ये काहीतरी वेगळं चाललय हे त्याच्या लक्षात आलं. स्वारी  जीभ लांब करुन बाबांच्या जवळ येऊन बसली.चालू द्या तुमचं, आपल्याला त्यात रस नाही,असे भाव चेहऱ्यावर आणून, तो अर्धवट डोळे मिटून, तिघांच्या हालचाली  न्याहळत बसला. त्याचं असं वागणं हे परिचयाचं असल्याने तिघेही त्याच्याकडे बघून हसले.आपली चोरी पकडली गेल्याचं लक्षात येताच स्वारी उडी मारुन बाबांच्या मांडीवर जाऊन बसली.

आता कसा, शहाणा सारखा वागलास रे तू…थेट बघायचं नि थेट ऐकायचं…अध्येमध्ये काही नाही.. अलेक्झांडरचा कान प्रेमाने हलकेच पिरगाळत आई म्हणाली. त्याने आज्ञाधारकपणे मान हलवली.

तुला माहीताय का हे प्रल्हादराव कोण ते? बाबांनी हसून अलेक्झांडरला विचारलं.तो ढिम्म.

त्याला कसं कळणार? प्रल्हादराव आणि हिरण्यकश्यपूविषयी.आई हसत म्हणाली.

कां कळणार नाही, प्रल्हादरावांच्या काळातसुध्दा अलेक्झांडरचे पूर्वज होतेच की.

अगं, जरा आम्हाला कळणारं बोल बरं. प्रल्हादराव काय, हिरण्यकश्यपू काय, अलेक्झांडरचे पूर्वज काय, तू शुध्दीवर आहेस ना की पहाटेच्या गोड स्वप्नातच रममाण आहेस अजून, बाबांनी विचारलं.

अगदी बरोबर बाबा,प्रल्हादराव मला स्वप्नातच भेटले.

अच्छा,वेडाबाई, प्रल्हादराव कशासाठी येणार,आपल्या कॉलनित.आईने मिश्किलपणे विचारलं.

आजची होळी त्यांना बघायचीय. त्यांच्या बाबांना-हिरण्यकश्यपूंना, भगवान विष्णूंची पूजा करणं, नामस्मरण करणं आवडायचं नाही. त्यामुळे चिडून त्यांनी होलिका राक्षसीणला सांगितलं की,तू प्रल्हादला घेऊन आगीत बसं.तसं तिने केलं. पण भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने प्रल्हादरावांना काहीच झालं नाही.दुष्ट होलिका जळून खाक झाली.

ही तर होळीची गोष्ट.दुष्ट होलिका म्हणजे दुष्ट विचार,वाईट सवयी,गर्व,अहंकार, हे जाळायचं असतात,होळीच्या दिवशी.बाबा म्हणाले.

आज तुम्ही तसं करताय की नाही हेच बघायचंय प्रल्हादरावांना..

हे प्रल्हादराव म्हणजे भक्त प्रल्हाद म्हणायचे. होळी पेटली की पुरणपोळी खायला घेऊन येऊ आपण घरी,त्यांना. आई तेजोमयीचा गालगुच्चा घेत म्हणाली.

मी दिलय निमंत्रण त्यांना पुरणपोळीचं.

मग येणार ना ते आपल्या घरी.                      

त्यांची एक अट आहे आई.

कोणती गं?

करोनाच्या नावानं होलिका राक्षसीण,सध्या धुमाकूळ घालतेय असं प्रल्हादरावांना कळलय.करोना रुपी होलिका कां बरं नष्ट होत नाहीय हे त्यांना बघायचय.

करोनाची कीर्ती त्यांच्यापर्यंत गेली म्हणायची. बाबा हसत म्हणाले.

हसता काय बाबा. प्रत्येकानं प्रल्हाद झालं तर आगित न बसताही करोनारुपी होलिका नष्ट होऊ शकते,असं प्रल्हादरावानी सांगितलय.

म्हणजे गं काय?

अगं, तेव्हाच्या प्रल्हादरावांकडे विष्णूंचा आशीर्वाद होता.आताच्या प्रल्हादांकडे मास्क,स्वच्छतेसाठी सॅनिटायझर आहेत. विष्णूंनी आशीर्वाद देऊन पाठवलेली ही शस्त्रेच जणू. त्याचा वापर केला तर करोना रुपी होलिका जळून खाक होईल…नाहीतर होळी आली आणि गेली करोना मात्र जागच्या जागी. राहील….बरोबरना रे अलेक्झू,तेजोमयी अलेक्झांडरकडे बघत म्हणाली.आपल्याकडे वळून तेजोमयी बोलली की होकारार्थी मान हलवायची असते, हे समजलं असल्यानं अलेक्झांडरने मान हलवून आईकडे बघितलं.

अच्छा, तर तू प्रल्हादरावांसोबत स्वप्नात गप्पा करताना,अलेक्झांडर महाशय तिथे होते म्हणायचे...आई हसत म्हणाली.बाबांनीही स्मित केलं.

सुरेश वांदिले