प्रश्नांच्या उत्तरात टोळी
तेजोमयी, कल्याणी, बंटी , अरुण बबलू, सोनू, सुरेश, विनय, श्रीकांत या टोळीला नेहमी खूप प्रश्न पडत असत. प्रश्न पडायलाच हवेत, असं एकदा त्यांना, विज्ञानाच्या सरांनी सांगितलं होतं. प्रश्न जेव्हा पडतात, तेव्हा त्याची उत्तरं शोधण्याची प्रेरणा मिळते, उर्जा मिळते, असंही ते म्हणाले.
विज्ञानसरांचे लाडके विद्यार्थी असल्याने या सर्वांनी, ठरवलं की यापुढे आपणास, हा प्रश्न नाही तर तो प्रश्न असे, सतत प्रश्न पडू द्यायचे. ज्या दिवशी प्रश्न पडला नाही, त्यादिवशी समजायचं की, कुछ तो गडबड है.
असं काहीसं तेजोमयी कल्याणीला म्हणाली.
अगं, पण दररोज प्रश्न पडायला आपण काही सफरचंदाचं झाड नाही ना. की हलवलं नि पडला सफरचंद खाली. कल्याणी म्हणाली.
सफरचंद जर पडला नसता तर, न्युटन सरांना प्रश्न पडला असता का ? सफरचंद झाडावरुन पडला, पण तो वर नाही गेला, तो खाली आला. तो तसा कां आला ? यावर न्युटन सर डोके खाजवत बसले. म्हणून त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तेजोमयी, रवीकडे बघत म्हणाली.
याचा अर्थ असा की, जसं तुम्ही हसायलाच पाहिजे, तसच तुम्हाला प्रश्न सुध्दा पडायला पाहिजे. बंटी म्हणाला.
सतत प्रश्न पडण्याच्या आणि पाडण्याच्या कल्पनेनं भारावून गेलेल्या या टोळीने मग आई-बाबा, शेजारचे काका-काकू, दादा-ताई, आजी-आजोबा, शाळेतील सर-मॅडम यांना प्रश्न विचारण्याचा सपाटाच लावला.
या टोळीच्या प्रश्नप्रेमाने प्रारंभी प्रारंभी भारावून गेलेले आईबाबा ते विज्ञानाचे सर, नंतरच्या काळात भांबावून गेले. या टोळीचे प्रश्न थांबले नाही तर आपणास नक्कीच वेड लागेल, असं विज्ञानाच्या सरांना एके दिवशी, वाटता वाटता राहिलं. त्यांना तसं पूर्ण वाटलं नाही, कारण त्यावेळी ते प्रयोगशाळेत होते. या टोळीच्या प्रश्नांचा मार्ग वेडेपणाकडे नेणारा असल्याचं त्यांना वाटत असताना प्रयोगशाळेच्या भिंतीवर टांगलेल्या न्यूटन, गॅलिलिओ, एडिसन आणि बहुतेक जगदिशचंद्र बोस (कारण या प्रतिमेचे रंग उडून गेले होते.) यांच्या प्रतिमेतून, हे चारही शास्त्रज्ञ बाहेर येतील आणि आपला मेंदू पळवून नेतील अशी भीती त्यांना वाटली. या भीतिने ते थिजून गेले. इकडे आड आणि तिकडे विहीर, या म्हणीचा खरा- नेमका अर्थ त्यांना इतक्या वर्षात पहिल्यांदाच कळला होता.
आई- बाबा, शेजारी पाजारी यांना तर या टोळींचे प्रश्न समोर येताच एखादे अग्निबाण किंवा क्षेपणास्त्र अंगावर आदळल्यासारखे वाटत असे. टोळीतील एका पालकाने तर सिक्सरच मारला. टोळीतील एकाने त्याच्या बाबांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी, आधी उत्तर तुम्हीच सांगा आणि नंतर प्रश्न विचारा असा सल्ला दिला तेव्हा हसावं, रडावं की प्रश्नच पाडणं सोडावं असं त्याला आणि टोळीतील इतर सर्वांना वाटून गेलं. पण काहीही झालं तरी म्हणजेच सूर्याने पश्चिम दिशेकडून उगवायला सुरुवात केली किंवा कोकिळेऐवजी कावळ्याने गायला सुरुवात केली तरी प्रश्न विचारायचं सोडायचच नाही, असा निर्धार टोळीने केला होता.
या निर्धारामुळे ही टोळी कॉलनीतील सर्वांना आणि शाळेत शिक्षकांना एखाद्या टेररिस्ट म्हणजेच दहशतवाद्यांसारखी भासू लागू लागली. ही टोळी दिसली की सर मंडळी आणि कॉलनीत वडीलधारी ते दादा-ताई श्रेणीतील मंडळींपैकी कुणी तोंड फिरवायला लागली तर कुणी तोंड वाकडं करायला लागली. तर काही जणांनी, चला इथून तोंड काळं करा, एवढच म्हणण्याचं शिल्लक ठेवलं
असं कां बरं करतात रे ही मंडळी, रवीनं अरुणला विचारलं.
अरे, यांना प्रश्नांची भीती वाटत असली पाहिजे. अरुण म्हणाला.
अरे, प्रश्न म्हणजे काही भूत किंवा राक्षस किंवा मग दैत्य नव्हे ना..
अरे, यांना आपल्या प्रश्नात नक्कीच भूत दिसत असावा म्हणूनच आपण दिसलो की भागो भूत आया, अशी त्यांची अवस्था होत असावी..
हा…हा…हा
यात हसण्यासारखं काय आहे, बुवा…
अरे, यांना खरोखरच भूत दिसला तर..
तर काय…
जाऊ दे पुढचं बोलू नकोस, समझदारोंके लिए इशाराही काफी है..
मला हे कळत नाही की यांना जर प्रश्नांची इतकी भीती वाटत असेल तर यांनी परीक्षा कशा उत्तीर्ण केल्या असतील ?
ही सर्व मंडळी कॉपीबहाद्दर असली पाहिजेत…
काहीतरीच काय हे भलतं सलतं, आपले पालक आणि आपले सर, हे सज्जन आहेत. ते कॉफीप्रेमी आहेत. मात्र कॉपी म्हणजे काय हे त्यांना नक्कीच माहीत नसावं. तेजोमयी कल्याणीला म्हणाली. कॉपीचा मुद्दा हा सर्वांसाठी घातक असल्याचं टोळीच्या लक्षात आलं. तेव्हा विनय म्हणाला,
ही मंडळी परीक्षा पास झाली कारण, त्यांनी फक्त पाठांतर केलं, असावं…
म्हणजे घोकनपट्टीच ना…
अगदी बरोबर….
जी मंडळी घोकनपट्टी करतात त्यांना केवळ उत्तरं दिसतात. दिसलेली उत्तरं या मंडळींनी पेपरमध्ये उतरवली असावीत.
बर झालं बुवा, आपण कुणीच पाठ करत नाही ते. विनय म्हणाला..
आईनस्टाइन कुठे पाठ करत होते. तेजामयीनं माहिती पुरवली.
त्यामुळेच तर ते वर्गात मागे पडत. त्यांना गुणही फार मिळत नसे, असं मी कुठेतरी परवाच वाचलं, प्रदीपने सांगितलं.
एडिसन सुध्दा शाळेत असे-तसेच होते. पण त्यांना खूप प्रश्न पडायचे. या प्रश्न पडण्यापाडण्यातून त्यांनी शंभर शोध लावले. पिंकूनेही त्याच्या जवळची माहिती शेअर केली.
या सर्वांचा अर्थ असा की, आपण आईनस्टाईन आणि एडिसनसारखे पाठांतर करत नाही, शिवाय आपणास प्रश्नही पडतात, म्हणजेच आपणसुध्दा असंख्य शोध लावू शकतो….तेजोमयीनं तर्क मांडला..
शोध लावण्यासाठी बुध्दी लागते, मॅडम, ती आहे का तुमच्याकडे. कल्याणीने तेजोमयीला टोमणा मारत विचारलं.
शोध लावण्यासाठी लागते रे, पण प्रश्न विचारायला कुठे बुध्दी लागते. रवी हा हा हा करत बोलता झाला.
असं आपण आपसातच कशासाठी, तू तू मै मै करायला लागलो. थांबा आता. आपल्या प्रश्नांपासून दूर पळणाऱ्यांना आपण धडा शिकवला पाहिजे.
काय धडा शिकवणार रे ठोंब्या. अरे सरांना धडा शिकवायला गेलो तर ते शाळेतून हाकलून लावतील. घरच्यांना धडा शिकवायला गेलो तर आपली कोरी पाटी काळी करतील.
मग आता काय करायचं ? प्रश्न तर पडलेच पाहिजेत, प्रश्न तर विचारलेच पाहिजेत. ते थांबवून कसं चालेल.
आपण गुगल बाबांना शरण गेलो तर.. त्याला म्हणे सगळया प्रश्नांची उत्तरं ठाऊक असतात.
पण त्याने चुकीची उत्तरं दिली तर…
तो कशाला चुकीची उत्तर देईल...
कुणी सांगावं ? गुगलबाबा एक आहे का दोन आहे का तीन आहे, हे कुणाला माहिताय. गुगलत जाणं म्हणजे माहीत नसलेल्या पण आभासी रस्त्यावर धावणं नाही कां ?
ऐ भोंगाडया, असं फालतू, न समजणारं आणि डोक्यात न शिरणारं काही बोलू नकोस. असं बोललं की आपण तिस्मारखान होत नाही. कल्याणी विनयला म्हणाली.
कोण हा तिस्मारखान ? तेजोयमीनं प्रश्न विचारला.
चला म्हणजे, तेजूला प्रश्न पडून आपण पुन्हा मूळ मार्गावर आलो तर...बंटी म्हणाला,
प्रश्न असेच हवेत की त्यात अर्थ असेल. प्रश्नात अर्थ नसेल तर मग मजाच येणार नाही..
अरे, तू असं कोड्यात आणि आडवळणारं जाणारं बोलू नकोस ना यार, स्पष्ट स्पष्ट सांग. विनयनं विचारलं.
म्हणजे असं की, आपण विचारलेल्या प्रश्नासाठी, मिळणाऱ्या उत्तरानं आपलं ज्ञान वाढलं पाहिजे. नवं काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे. आपला वेळही फुकट गेला नाही पाहिजे. मेंदू तरतरीत झाला पाहिजे.
आपले प्रश्न तर असेच असतात ना. तरी सुध्दा सर-मंडळी आणि आपले आई-बाबा कां बरं त्यापासून पळ काढतात ?
आला का तोच प्रश्न पुन्हा..
आपण की नाही, या सर्व ज्येष्ठ मंडळींची यासाठी शिकवणीच घेतली पाहिजे. त्यांना प्रश्नांचं महत्व समजावून दिलं पाहिजे.
अरे, असं काहीबाही बोलू नकोस. म्हणे ज्येष्ठांची शिकवणी घेतली पाहिजे. सरांच्या हातच्या दोन छडया, बाबांचं कान पिरगाळणं आणि शेजारच्या काकूंच्या शिव्या वाटेला येईल तेव्हा कळेल..
होय गड्या, हे सारं सारं खरं, पण मग आपल्या मूळ प्रश्नाचं काय..
तो तर अनिर्णितच राहतो.
मित्रांनो, घाबरु नका, हिम्मत सोडू नका. निराश होऊ नका, कारण जिथे प्रश्न, तिथे उत्तर असणारच, असं कुणीतरी कुणालातरी नक्कीच म्हणालं असणार...श्रीकांत मस्तपैकी अभिनय करत म्हणाला..
शिक्या, नाटकीपणा पुरे झाला. तुला जर उत्तर ठाऊक असेल तर सांगून टाकना, कशाला सगळयांचा जीव टांगणीला लावतोस….
मला, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं वाटतं. पण मी ते आता नाही सांगणार..उद्या शाळेत गेल्यावरच, भर दुपारी सूर्यमहाराजांना साक्षी ठेऊन, मी तुमची उत्सुकता पूर्ण करायचं ठरवलय. श्रीकांत पुन्हा नाटकी अभिनय करत म्हणाला…
आँ.. एका सुरात टोळी उद्गारली…
होय होय, आज रात्रभर धीर धरा.. कारण धिरज का फल मिठाही होता है, असं आपण कालच नाही का हिंदीच्या वर्गात शिकलो. श्रीकांत पुन्हा तसच नाटकीपणाने म्हणाला. त्याला मनवणं कठीण असल्याचं टोळीत सर्वांना ठाऊक असल्यानं सारेच जण गप्प बसले…
०००
श्रीकांत उदया काय सांगणार, ही उत्कंठा घेऊन टोळी घरी परतली. दुसऱ्या दिवशी शाळेत टोळी जमा झाल्यावर सर्व मंडळींना घेऊन श्रीकांत, हेडमास्तरांकडे गेला. प्रश्न विचारणाऱ्या टोळीची कीर्ती त्यांच्यापर्यंत कधीचीच पोहचली होतीच. त्यामुळे टोळी दिसताच, त्यांचा चेहरा त्रासिक होता होता राहिला. त्यांनी स्वत:ला लगेच सावरलं. महामहोपाध्याय असं वागणं बरं नव्हे, असं, आपल्या खोलित टांगलेली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा आपल्याला म्हणेल, असं हेडमास्तरांना वाटलं आणि त्यांनी बळजबरीनं कसंबसं चेहऱ्यावर हसू आणलं…
हेडमास्तरांचा त्रासिक चेहरा ते कसबसं आणलेलं हसू हे श्रीकांत आणि टोळीतील इतर सदस्यांच्या बरोबर लक्षात लक्षात आलं. त्यामुळे सरांना काही बोलू देण्याच्या आतच श्रीकांत म्हणाला,
सर, ग्रंथ हे सर्वश्रेष्ठ गुरु असतात, असं आम्ही कुठंतरी वाचलं आणि ऐकलं सुध्दा आहे. ते खरं की खोटं. हे जाणून घ्यायला आम्ही आज तुमच्याकडे आलो आहोत.
हा प्रश्न ऐकून सर काही क्षण विचारात पडले. या मुलांचा हा प्रश्न साधा आणि सरळ रेषेसारखा नक्कीच नसून त्यात खूप आडवळणं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण आता काहीतरी सांगणं आवश्यकच होतं, त्यामुळे ते उत्तरले,
तुम्ही जे वाचलं किंवा तुम्ही जे ऐकलंय ते सार्वकालीक सत्य आहे. ग्रंथ, हे सर्वश्रेष्ठ गुरु असतात.
सर मग, आम्हास या सर्वश्रेष्ठ गुरुस भेटावयाचे आहे. श्रीकांत त्याचा चेहरा आणखी गंभीर करत म्हणाला. श्रीकांतनं आपल्याला हेडमास्तरांकडे कां आणलं हे आता टोळीच्या बऱ्यापैकी लक्षात आलं होतं. या सर्वांची घट्ट मैत्री असल्यानं, त्यांना एकमेकांच्या मनातलं पटकन ओळखता येत असे. त्यामुळ श्रीकांतनं हेडमास्तर सरांना जे काही विचारलं त्यावर आधारित टोळीतील प्रत्येक सदस्याने आपआपले प्रश्न मनात तयार करुन ठेवले.
हेडमास्तर श्रीकांतच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले,
मुलांनो, ग्रंथांची जागा ग्रंथालयात असते.
मग आपल्या शाळेत कां नाही बरं असं ग्रंथालय? विनयनं नम्रपणे हेडमास्तरांना विचारलं. या अनपेक्षित प्रश्नांची गुगली आपली विकेट घेणार असं हेडमास्तरांना वाटलं. पण त्यांनी ही गुगली कशीबशी खेळली. ते म्हणाले…
आपल्या शाळेत ग्रंथालय नाही, असं कुणी सांगितलं तुम्हास, मुलांनो ?
सर, आम्हास कुणीच सांगितलं नाही. पण आम्हास जसे अनेक प्रश्न पडतात ना, तसा हा प्रश्न आज पडला आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आम्ही तुमच्याकडे आलोत,तेजोमयी सौम्यपणे म्हणाली.
सर, मग दाखवाना ग्रंथालय..विनय लाडिकपणे म्हणाला…
टोळीच्या सापळयात आपण सापडल्याचं हेडमास्तरांच्या लक्षात आलं. टोळी आणि हेडमास्तरांचं संभाषण सुरु असताना इतर शिक्षक त्यांच्या खोलित आले होते. त्यातील काहीजणांना, हेडमास्तरांशी असं संभाषण करणं, हा टोळींचा चोंबडपणा वाटला तर काही जणांना आपल्या शाळेत ग्रंथालय कां नाही, हा प्रश्न पडला.
सर दाखवाना आपलं ग्रंथालय. कल्याणी तेजोमयीपेक्षा सौम्यपणे म्हणाली..
०००
सरांपुढे वेगळाच पेच पडला. शाळेत ग्रंथालय होतं. पण ते कित्येक महिने बंद होतं. या ग्रंथालयात शिक्षक कधीकधीच जायचे. विद्यार्थीसुध्दा अपवादानेच जायचे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी हेडमास्तरांनी ग्रंथालयाला कुलूप लावलं. नवी पुस्तकं आणि ग्रंथही विकत घेणं बंद केलं..
टोळीच्या प्रश्नाने हेडमास्तर गांगरले. या मुलांना काय सांगावं याचा विचार करु लागले. चेहऱ्यावर कृत्रिम हसू आणत ते म्हणाले,
मुलांनो, तुमचे किती म्हणून किती आभार मानायचे. तुम्ही आज मला ग्रंथालयाची आठवण करुन दिली, हे फार मोठं काम केलत तुम्ही. आजच्या विद्यार्थ्यांनासुध्दा ग्रंथ हवे असतात हे एकून माझा आनंद गगणात मावेनास झालाय. ग्रंथालय बंद ठेवण्याची चूक घडली. पण आता उद्यापासून ते पुन्हा सुरु करतो… पण तुम्ही सर्वांनी खरोखरच ग्रंथालयात जायला हवं. मी लक्ष ठेवीन बरं का. तुम्ही नाहीत गेला तर बघा… हेडमास्तर हसत हसत म्हणाले.
मुलांनो, तुम्हास अचानक आज ग्रंथालयाची आठवण कां बरं झाली… हेडमास्तरांच्या खोलित असलेल्या विज्ञानाच्या शिक्षकांनी विचारलं..
काय करणार सर, आमच्या प्रश्नांमुळे तुम्ही वैतागलात ना .. पण ग्रंथ नाही वैतागणार, याची आम्हास खात्री वाटते. श्रीकांत खाली मान घालून पुटपुटला..
अच्छा तर तुमच्या प्रश्नांनी तुम्हास ग्रंथालयाचा मार्ग दाखवला म्हणायचा… हा मार्ग शाळेच्या दुसऱ्या मजल्याकडे जातो बरं का… विज्ञान शिक्षकांकडे बघत हेडमास्तर म्हणाले. त्यांचा आणि हेडमास्तरांच्या खोलित जमलेल्या इतर शिक्षकांचा चेहरा पाहण्यासारखा झाला.
आपणास यातलं काही कळलं नाही, असा भाव चेहऱ्यावर उमटवत, टोळीनं तिथून हळूच पाय काढला….
०००
