
प्लॅस्टिक उद्योगाचे तंत्रज्ञ
भारत सरकारच्या रासायनिक आणि पेट्रोरासायनिक मंत्रालयाने, सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअिरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली आहे. प्लॉस्टिक तंत्रज्ञान विषयातील शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी ही महत्वाची संस्था आहे. या संस्थेमार्फत, (१) प्लॅस्टिक प्रक्रिया, (२) प्लॅस्टिक वस्तू किंवा उत्पादनांचे संगणकाच्या सहाय्याने डिझाइन, (३) प्लॅस्टिकच्या विविध वस्तू/उत्पादने निर्मितीसाठी लागणाऱ्या साच्यांची निर्मिती, (४) या साच्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची देखभाल, दुरुस्ती आदी विषय शिकवले जातात. या उद्योगासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती या अभ्यासक्रमांद्वारे होते.
स्टीलनंतर जगात सर्वाधिक वापरले जाणारे साहित्य, प्लॅस्टिक आहे. मानवी उपयोगाच्या विविध वस्तू प्लॅस्टिक पासून तयार केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळास चांगल्या करिअर संधी मिळू शकतात. प्लॅस्टिक उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रकौशल्याची गरज लक्षात घेऊन, भारत सरकारने, या संस्थेची स्थापना केली. प्लॅस्टिक उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, संस्थेच्या अभ्यासक्रमात सातत्याने बदल करण्यात येतात. अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांचा अधिकाधिक समावेश करण्यात आल्याने, संबंधित उद्योजक या संस्थेतील विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतात.
शिक्षण – प्रशिक्षणासोबतच संस्थेमार्फत, नावीन्यपूर्ण वस्तू/ उत्पादनांची निर्मिती आणि डिझाइनसाठी संशोधन व विकासास प्रोत्साहन दिले जाते. ही संस्था, इंस्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, सेंटर फॉर स्किलिंग ॲण्ड टेक्निकल सपोर्ट आणि स्कूल फॅार ॲडव्हान्स्ड रिसर्च इन पॉलिमर्स, या तीन पातळीवर कार्यरत आहे.
अभ्यासक्रम – या संस्थेमार्फत अभियांत्रिकी शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, अभ्यासक्रम चालवले जातात. कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे पदविका अभ्यासक्रमही या संस्थेने सुरु केले आहेत.
पदवी अभ्यासक्रम (१) बी.टेक इन प्लॅस्टिक इंजिनीअरिंग, अर्हता – १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरीने ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे. (२) बी.टेक इन मॅन्युफॅक्चुरिंग इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी. अर्हता – १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरीने ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी – चार वर्षे.
हे अभ्यासक्रम संस्थेच्या भूवनेश्वर, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ, रायपूर, जयपूर, मुरथल येथील कॅम्पसमध्ये चालवले जातात. हे अभ्यासक्रम वेगवेगळया विद्यापीठांशी संलग्नित करण्यात आले आहेत. त्यामुळे, प्रत्येक विद्यापीठाच्या प्रवेश प्रकियेनुसार प्रवेश दिला जातो. प्रत्येक कॅम्पस कोणत्या विद्यापीठाशी संलग्नित आहे, याची माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
प्लेसमेंट– विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार वेगवेगळया कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, वेलस्पन फ्लोरिंग, कॉस्मो फिल्म्स, लोहिया कॉर्पोरेशन, तोशिबा मशिन, बजाज सूपर पॅक्स, जिंदाल पॉली फिल्म्स, वामन इंजिनीअर्स, विकास इकोटेक लिमिटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम-
एम. टेक इन– (१) प्लॅस्टिक इंजिनीअरिंग, (२) पॉलिमर नॅनोटेक्नॉलॉजी. दोन्ही एम.टेक साठी अर्हता – बी.टेक इन प्लॅस्टिक इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा प्रॉडक्शन इंजिनीअरिंग किंवा केमिकल इंजिनीअरिंग किंवा मॅन्युफॅक्चुरिग इंजिनीअरिंग किंवा पॉलिमर इंजिनीअरिंग किंवा मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंग किंवा मटेरिअल्स सायन्स इंजिनीअरिंग किंवा रबर ॲण्ड प्लॅस्टिक्स इंजिनीअरिंग किंवा किंवा एम.एस्सी इन पॉलिमर सायन्स /पॉलिमर केमिस्ट्री/ बायोपोलिमर सायन्स/केमिस्ट्री/ॲप्लाइड केमिस्ट्री.
भूवनेश्वर, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ येथे हे अभ्यासक्रम करता येतात.
पदविका अभ्यसक्रम
(१) डिप्लोमा इन प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी – अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. १० वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतात. या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, गणित, उपयोजित रसायनशास्त्र उपयोजित भौतिकशास्त्र, मेकॅनिक्स, अभियांत्रिकी चित्रकला, डिझाइन ऑफ डाइज, मोल्ड्स आणि प्लॅस्टिक प्रकिया तंत्रज्ञान इत्यादी विषय शिकवले जातात.
(२) डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी– १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. संगणकाच्या सहाय्याने प्लॅस्टिकच्या विविधांगी वस्तू/उत्पादकांच्या डिझाइनचे साचे बनविण्याचे तंत्रकौशल्य या अभ्यासक्रमात शिकवले जाते. कालावधी- तीन वर्षे.
(३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लॅस्टिक प्रोसेसिंग ॲण्ड टेस्टिंग. कालावधी- दोन वर्षे. कोणत्याही बी.एस्सी विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. प्लॅस्टिक प्रक्रिया आणि प्लॅस्टिकच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याचे तंत्र, या अभ्यासक्रमात शिकवले जाते. हे अभ्यासक्रम बलसोरे (ओडिशा), भोपाळ, अमृतसर आणि अहमदाबाद या केंद्रासोबत महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे करता येतात.
(४) पोस्ट डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड डिझाइन वुइथ कॉम्प्युटर एडेड डिझाइन (कॅड)/कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चर(कॅम)- या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षे. अर्हता- अभियांत्रिकी पदविका (मेकॅनिकल/ प्लॅस्टिक/ पॉलिमर/ टूल ॲण्ड डाय मेकिंग/ प्रॉडक्शन/ मेकॅट्रॉनिक्स/ ऑटोमोबाइल/ पेट्रोकेमिकल्स/ इंडस्ट्रियल/ इंस्ट्रुमेंटेशन). प्लॅस्टिक उत्पादनांचा विकास आणि निर्मिती प्रकियेत येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने यांचा सामना करण्याचे कौशल्य, अभ्यासक्रमाव्दारे प्राप्त करुन दिले जाते. या अभ्यासक्रमात, प्लॅस्टिक्स प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक प्रॉडक्ट डिझाइन, मोल्ड डिझाइन, आदी विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे.
पदविका आणि पदव्युत्तर पदविका, अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, सिपेट प्रवेश परीक्षा(सिपेट ॲडमिशन टेस्ट- कॅट) ८ जून २०२५ रोजी घेतली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२५ आहे.
संपर्क- सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, हेड ऑफिस, टीव्हीके, इंडस्ट्रिअल इस्टेट गिंडी, चेन्नई- ६०००३२, ईमेल-academics@ cipet.gov.in, संकेतस्थळ-www.cipet.gov.in, दूरध्वनी- ०४०- २२२५४५१४
छ.संभाजीनगर कॅम्पस
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) केंद्रामध्ये, काही लघुमुदतीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. या अभ्यासक्रमांना, नॅशनल स्किल डेव्हलमेंट कॉर्पोरेशनने, मान्यता प्रदान केली आहे. यातील काही अभ्यासक्रम उद्योगांच्या, गरजेनुसार तयार करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणासोबत उद्योजकता विकास कार्यक्रम राबवला जातो.
कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम- (१) मशिन ऑपरेटर इंजेक्शन मोल्डिंग, (२) मशिन ऑपरेटर-ब्लो मोल्डिंग, (३) मशिन ऑपरेटर-प्लॅस्टिक एक्सट्रुजन, (४) मशिन ऑपरेटर असिस्टंट- प्लॅस्टिक प्रोसेसिंग, (५) मशिन ऑपरेटर- प्लॅस्टिक प्रोसेसिंग, (६) मशिन ऑपरेटर असिस्टंट – इंजेक्शन मोल्डिंग, (७) मशिन ऑपरेटर असिस्टंट – ब्लो मोल्डिंग,(८) मशिन ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रमर-सीएनसी मिलिंग ,(९) मशिन ऑपरेटर -सीएनसी मिलिंग,(१०) मशिन ऑपरेटर -सीएनसी लेथ , (११) मशिन ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रमर – सीएनसी लेथ, (१२) मेंटनन्स ऑफ मशिनरी. यातील बहुतेक सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी सहा महिने असा आहे. ८ वी ते १० वी उत्तीर्ण आणि १८ वर्षावरील मुलांना हे अभ्यासक्रम करता येतात.
संपर्क -सीआयपीइटी, सेंटर फॉर स्किलिंग ॲण्ड टेक्निकल सपोर्ट – सीएसटीएस जे-३/२,एमआयडीसी ,इंडस्ट्रिअल एरिआ ,चिखलठाणा – औरंगाबाद- ४३१००६, संकेतस्थळ- https://www.cipet.gov.in/centres/cipet-aurangabad,
०००
१० वीनंतरची कौशल्य संधी
छत्रपती संभाजीनगर येथे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाने, टेक्नॉलॉजी सेंटरची स्थापना केली आहे. या सेंटरच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या, इंडो-जर्मन टूल रुम, या संस्थेमार्फत विविध कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम चालवले जातात. हे अभ्यासक्रम रोजगारक्षम आहेत. ते केलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअर संधी उपलब्ध होतात. या संस्थेने, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ,तंत्रकौशल्य निर्मितीस उपयुक्त ठरतील असे, पुढील दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग- या अभ्यासक्रमाला, १० वीमध्ये ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. राखीव संवर्गासाठी ५० टक्के गुण. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे.
(२) सर्टिफिकेट कोर्स इन मशिनिस्ट- अर्हता- १० वीमध्ये ६० टक्के गुण. राखीव संवर्गासाठी ५० टक्के गुण. कालावधी- दोन वर्षे.
या दोन्ही अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.
थेट प्रवेश
सर्टिफिकेट कोर्स इन मशिन टूल ऑपरेशन ॲण्ड वेल्डिंग ऑपरेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन मशिन टूल मेंटनन्स ॲण्ड वेल्डिंग ऑपरेशन- या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी एक वर्षे. अर्हता- १० वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमांना, प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्रवेश या तत्वावर प्रवेश दिला जातो.
संपर्क- इंडो-जर्मन टूल रुम, पी-३१, एमआयडीसी, इंडस्ट्रिअल एरिआ, चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर- ४३१००६, दूरध्वनी-०२०-२६१०१००, संकेतस्थळ- ईमेल-gm@igtr-aur.org
सुरेश वांदिले