पर्यटन आणि आतिथ्यशीलता या दोन क्षेत्रांनी गेल्या दीड वर्षात मोठी झेप घेतलीय. पर्यटक मोठ्या संख्येने सर्वकाळ बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे करोना काळात मान खाली टाकलेले हे क्षेत्र नवी उर्जा अनुभवायला लागले आहे. मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या पानपानभर जाहिराती या क्षेत्रातील चैतन्याचे निर्दशक ठरत आहेत. छोट्या ट्रॅव्हल कंपन्याही यामध्ये मागे नाहीत.
पर्यटनाचे विविध प्रकार आता रुजू होत आहेत. तुम्हाला पाहिजे तसा आणि पाहिजे तेव्हा टूर म्हणजे तुम्हीच डिझाइन केलेला किंवा कस्टमाइज्ड टूर (सेवा) सुध्दा या कंपन्या देऊ लागल्या आहेत. नवी ठिकाणं शोधून त्या ठिकाणी पर्यटकांना नेलं जातं. विमान प्रवास, क्रुझ (लक्झरी बोट) प्रवास, हेलिकॉप्टर प्रवास, बाईक प्रवास, ट्रेन प्रवास, कॅब प्रवास, महिन्याभराचा प्रवास अशी विविध आकर्षणं पर्यटकांच्या समोर आहेत. वीकएन्ड म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांचं पर्यटन सुपर हिट झालय. पर्यटन क्षेत्रातील वाढलेल्या या गतिविधींमुळे पुन्हा एकदा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज या क्षेत्राला भासू लागलीय. या क्षेत्रासाठी आवश्यक असणारं कौशल्य आणि तंत्र शिकवणारे शिक्षण दर्जेदार संस्थामधून घेतल्यास पर्यटन (टूर ऑपरेटर्स) कंपन्यामध्ये प्लेसमेंटच्या संधी सहजतेनं उपलब्ध होऊ शकतात.
अशा काही संस्था आणि अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत-
(१) जय हिंद कॉलेज, मुंबई-
गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिध्द असलेल्या या संस्थेस स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेत, बॅचलर ऑफ व्होकशन इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, हा अभ्यासक्रम करता येतो.
नवीन शैक्षणिक धोरण आणि नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नुसार या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. पहिल्या वर्षानंतर पदविका, दुसऱ्या वर्षानंतर प्रगत पदविका प्रमाणपत्र दिलं जातं. विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रमाणपत्रप्राप्तीनंतर अभ्यासक्रम सोडण्याची सुविधा आहे. तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रदान केली जाते.
प्लेसमेंट
(१) पगमार्क, (२) कुओनी ट्रँव्हल्स, (३) केसरी, (४) वीणा वर्ल्ड, (४) थॉमस कूक, (५) टी टू जीव्हीके, (६) स्टर्लिंग हॉलिडेज, (७) वंडरलस्ट, (८) मर्क्युरी ट्रॅव्हल्स, (९) युनिव्हर्सल ट्रॅव्हल, (१०) एसओटीसी, (११) व्हॅकेशनवाला, (१२) खाकी, (१३) एमटीडीसी या सारख्या बऱ्याच संस्थांनी प्लेसमेंट आणि इंटर्नशीपसाठी सहकार्य केलं आहे.
संपर्क- जयहिंद कॉलेज, ॲडमिशन ऑफिस, ए रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०, दूरध्वनी-०२०-२२०४१०९४, संकेतस्थळ- https://www.jaihindcollege.com
(२) टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस, स्कील व्होकेशनल एज्युकेशन-
या संस्थेमार्फत, बॅचलर इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम हा अभ्यासक्रम चालवण्यात येतो. कालावधी तीन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. पर्यटन, प्रवास आणि यात्रा क्षेत्रातील कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या कौशल्याने युक्त मनुष्यबळाची निर्मिती या अभ्यासक्रमाव्दारे केली जाते.
संपर्क- टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस, स्कील व्होकेशनल एज्युकेशन, व्ही. एन. पुरव मार्ग, देवनार, मुंबई- ४०००८८, दूरध्वनी-०२२-२५५२५६२१, संकेतस्थळ- https://sve.tiss.edu/TISS, ईमेल-feedback@sve.tiss.edu
(३) गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट (मुंबई विद्यापीठ)
या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स (बीएमएस) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. चाळणी परीक्षा आणि मुलाखतीव्दारे प्रवेश दिला जातो.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात (१) यात्रा/ प्रवास आणि पर्यटन आढावा, (२) भारतीय संस्कृती आणि पर्यटन, (३) पर्यटन भुगोल आणि कार्यप्रणाली, (४) इंग्रजी संवादकौशल्य, (५) आंतरराष्ट्रीय पर्यटन, (६) पर्यटन सेवा आणि उत्पादने, (७) हवाई वाहतूक शुल्क आकारणी आणि तिकिटे, (८) आतिथ्य सेवा व्यवस्थापन, (९) पर्यटन तंत्रज्ञान आणि जागतिक वितरण कार्यप्रणाली, (१०) देशी आणि परदेशी पर्यटनाचं नियोजन, (११) हवाई वाहतूक व्यवस्थापन, (१२) पर्यटन नियोजन आणि विकास, (१३) पर्यटनातील सध्याचे प्रवाह, (१४) अकौंटन्सीची मूलभूत तत्वे, (१५) पर्यटनाचे विपणन (मार्केटिंग), (१७) पर्यटन कार्यान्वित करण्याचे व्यवस्थापन आदी विषय घटकांचा समावेश आहे.
संपर्क- विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००९८, दूरध्वनी- ९७०२१४२१९१, ईमेल- gicedenqury@giced.mu.ac.in, संकेतस्थळ- giced.co.in
(३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट
पर्यटन आणि यात्रा व्यवस्थापन या विषयातील शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील सर्वात महत्वाची आणि दर्जेदार संस्था म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयआयटीएम) या संस्थेने ख्यातीप्राप्त केली आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था असून या संस्थेचे ग्वाल्हेर, नॉयडा, भूवनेश्वर , गोवा आणि नेल्लोर या ठिकाणी कॅम्पस आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या संस्थेचे अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी, दिल्लीशी संलग्नित करण्यात आले आहेत.
संस्थेच्या वतिने (१) बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल, (२) मास्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल हे दोन अभ्यासक्रम चालवण्यात येतात. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या संस्थेचे अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी, दिल्लीशी संलग्नित करण्यात आले आहेत.
बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल- कालावधी तीन वर्षे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. खुल्या सवंर्गातील उमेदवारास ५० टक्के आणि राखीव संवर्गातील उमेदवारांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील जागा रिक्त राहिल्यास त्या जागा, याच संवर्गातील ज्या उमेदवारांनी चाळणी परीक्षा दिली असेल, त्यांच्यामधून भरल्या जातात.
प्रवेश प्रकिया- या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो. (१) सीयुइटी- युजी २०२४ (सेंट्रल युनिर्व्हसिटी एन्ट्रस टेस्ट- अंडर ग्रॅज्युएट)
किंवा (२) आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट– ही परीक्षा ग्वाल्हेर, भुवनेश्वर, गोवा, नॉयडा आणि इतर काही केंद्रावर घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत विशिष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावण्यात येईल. तिनही घटकांच्या कामगिरीवर आधारित अंतिम निवड केली जाईल. त्यासाठी या प्रवेश परीक्षेतील किंवा सीयुइटी परीक्षेतील कामगिरीला ७० टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी १५ टक्के वेटज दिलं जातं.
अशी असते परीक्षा
ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची आहे. एकूण गुण १००. या पेपरमध्ये सामान्य अध्ययनाचे ५० प्रश्न, भाषिक कौशल्याचे २५ प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे २५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. पेपरचा दर्जा १२वी परीक्षेचा असतो. या अभ्यासक्रमाच्या एकूण ३७५ जागा आहेत.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमामध्ये (१) व्यवस्थापनाची तत्वे आणि संकल्पना, (२) पर्यटनाची तोंडओळख, (३) भारतीय इतिहास, (४) इंग्रजीतून संवाद कौशल्य, (५) लेखाविषयक मुलभूत तत्वे, (६) आतिथ्यसेवेची तोंडओळख, (७) भुगोलाची तत्वे, (८) व्यवसायाचे अर्थकारण, (८) विपणन व्यवस्थापन, (९) पर्यटनासाठी माहिती तंत्रज्ञान, (१०) यात्रा/ प्रवास/ पर्यटनाचे आयोजन, (११) वाहतूक व्यवस्था, (१२) पर्यटन संसाधने, (१३) परदेशी भाषा (फ्रेंच किंवा जर्मन), (१४) पर्यटनाच्या कायदेशीर चौकटी, (१५) भारतीय संस्कृती आणि परंपरा, (१६) सांख्यिकी शास्त्राची तोंडओळख, (१७) हवाई वाहतुकीची तिकिटे आणि मूल्य निर्धारण, (१८) हवाईवाहतूक व्यवस्थापन, (१९) कार्यान्वयन व्यवस्थापन, (२०) पर्यटन छायाचित्रण, (२१) मनुष्यबळ व्यवस्थापन, (२२) साहस पर्यटन, (२३) योग आणि सुदृढ आरोग्य, (२४) इव्हेंट व्यवस्थापन या विषय घटकांचा समावेश आहे.
शिष्यवृत्ती
भारत सरकारच्या वेगवेगळया संस्थांमार्फत विविध संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिवाय अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत शैक्षणिक शुल्काचा परतावा दिला जातो. साधारणत: १५० विद्यार्थ्यांना यांचा लाभ मिळतो.
सुरेश वांदिले