धो धो पाऊस पडला, की शहरात सगळीकडे पाणी साचतं. मैदानाचा तलाव होतो. रेल्वे रुळावरुन पाणी वाहू लागतं. रस्त्यावर खड्डे पडतात. या खड्ड्यात वाहनं अडकतात. अपघात होतात. घराच्या छतातून पाणी गळू लागतं. खिडकीतून पाणी येतं. असा अवचित पाऊस येतो नि सगळं कसं छान चाललेलं जनजीवन एका क्षणात विस्कटून जातं. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसतो तेव्हा तर भीती मी म्हणते. असा भीतीदायक पाऊस काय कामाचा? रवी स्वत:शीच बडबड होता.
पाऊस येऊच नये असं, नेहमीच त्याला वाटे. आपण राजा असतो किंवा सम्राट असतो तर पावसाचं यूंव केलं असतं नि त्यूंव केलं असतं असा कल्पनाविस्तारसुध्दा त्याने करुन बघितला. तो निरर्थक असल्याचं लक्षात आल्यावर, हलकसं हसून त्याने डोळे मिटून घेतले.
पाऊस सुरु झाला की, रविला काही सुचत नसे. पावसात घराबाहेर पडायचच नाही, असं कितीही ठरवलं तरी त्याला शाळेत जावचं लागायचं. तेव्हा त्याला आणखीनच भीत वाटे. शाळेतही त्याचा सगळा वेळ या भीतीच्या सावटाखालीच जायचा. यंदा तर त्याला युनिट टेस्टच्या एका पेपरमधील प्रश्नांची उत्तरं येत असूनही, लिहिण्यासाठी त्याचा हातच चालेना. त्या पेपरमध्ये त्याला शून्य गुण मिळाले. अर्थातच त्या दिवशी घरी त्याची चांगलीच कानउघडणी झाली. न जेवताच रवी झोपायला गेला. पण त्याचा डोळा काही लागेना. तेव्हढ्यात ढगांचा गडगडाट नि विजेचा कडकडाट सुरु झाला. वीज गेली. मुळसधार पाऊस सुरु झाला. रविने गच्च डोळे मिटून घेतले. तो थरथर कापू लागला. त्याच्या घशाला कोरड पडली. हा धो धो पाऊस आपल्या गिळून टाकणार असं त्याला वाटू लागलं.
अरे तू, बहादूर आहेस ना, मग घाबरतोस कशाला? कुणीतरी पुटपुटल्याचा आवाज आला. रविने भीतभीत डोळे उघडले. पाहतो तो काय, त्याच्यासमोर एक सुंदर पिटुकलं फुलपाखरु उभं होतं नि त्याच्याशी बोलत होतं.
मी नाहीय बहादूर फहादूर, रवी कसाबसा बोलला. त्याला खरंतर फुलपाखराचा रागच आला होता. हा चोंबडेपणा करायला त्याला सांगितलं कुणी? असं त्याला म्हणावसं वाटलं. पण रवी इतका थरथर कापत होता की, त्याला बोलताच येईना.
मात्र, फुलपाखराने त्याच्या मनातलं ओळखलं, तो म्हणाला,
अरे मी, काही चोंबडेपणा करत नाहीय. तुझ्या आईसाठी तू फुलपाखरुसारखाच आहेस की नाही. मग एक फुलपाखरु दुसऱ्या फुलपाखराची ख्याली खुशालीसाठी येणं, याला चोंबडेपणा म्हणत नाही.
बरं बरं, तुझी ख्यालीखुशाली विचारुन झाली असेल तर, मग चल फूट इथून, रवी फुलपाखरावर बरसला.
जातो की ,तू येतोस का माझ्यासोबत?
कुठे?
चल तर… म्हणजे तुला आमची वेगळी मस्त गमंत कळेल.
या असल्या भीतीदायक पावसात तुम्ही गमंत जम्मत खेळता? हे तर स्वत:च आगित उडी मारण्यासारखं झालं. मला नाही यायचं तुझ्यासोबत. रवी दुसरीकडे मान वळवित म्हणाला.
अरे, चल तू. आमच्यासोबत आलास तर पावसाबद्दलची तुझी भीती कुठल्या कुठे पळून जाईल. फुलपाखरु रविला म्हणाले. पण रवी काही तयार होईना. तेव्हा त्या फुलपाखरानं मंत्र म्हणून रविलाच फुलपाखरु केलं. नंतर ते फुलपाखरु खिडकितून बाहेर पडलं. फुलपाखराच्या रुपातला रवी त्याच्या पाठीमागे उडू लागला.
उडत उडत ते फुलपाखरांच्या राज्यात आले. त्या राज्यातील लाखो फुलपाखरु बाहेर जाण्याच्या पूर्ण तयारीनीशी दिसले. आपण व्यायाम करताना जसा हातपाय हलवून वार्मअप करतो, तसं फुलपाखरांचं, पंख फडफडवून वार्मअप सुरु असल्यासारखं वाटत होतं. ते कुणाची तरी वाट बघत असल्याचं जाणवत होतं.
हे चाललय तरी काय? फुलपाखरु रुपी रविने, त्याला तिथे आणलेल्या फुलपाखराला विचारलं.
तू फक्त गंमत बघ…
एकाएकी आभाळ भरुन आलं. विजा चमकू लागल्या. ढग एकमेकांवर आदळू लागले नि काही क्षणातच धोधो पावसाच्या धारा पडू लागल्या. या पावसाच्या धारांमध्ये हे लाखो फुलपाखरु मरुन जाणार किंवा वाहून जाणार असं फुलपाखराच्या रुपातल्या रविला वाटलं. त्याची भीतिने गाळण उडाली. डाळे मिटून तो रामरक्षा म्हणू लागला.
काही क्षण असेच गेले. रविच्या कानावर, हम होंगे कामयाबचा नारा पडला. रविने डोळे किलकिले केले. तिथे फुलपाखरांचा राजा सर्वांच्या समोर येऊन म्हणत होता, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब…असं म्हणत म्हणत त्याने पंख पसरवून उड्डाण भरले. सर्व फुलपाखरं याच क्षणाची वाट बघत होती. सर्वांनी आपल्या राजाचा जयजयकार केला. हम होंगे कामयाबचा गजर करत लाखो फुलपाखरु आकाशात झेपावले. आभाळातून पाऊस कोसळतोय की फुलपाखरं, हे कळेनासं झालं. सगळे फुलपाखरु पूर्ण ताकदीनिशी उडू लागले.
रवीसोबत असलेला फुलपाखरुही उडू लागला. भीतिने पूर्णपणे गाळण झालेला फुलपाखरुरुपी रवी मोठ्या कष्टाने उडू लागला. फुलपाखरांनी एक दिशा पकडली नि ते मोठ्या धिराने नि धैर्याने पुढे पुढे जाऊ लागले.
हे लाखो फुलपाखरं असे एकाएकी कुठे निघालेत? रविने, उडता उडता त्याच्या सोबतच्या फुलपाखरास विचारलं,
अरे, या भागात प्रचंड दाबाने पाऊस पडतो. तो आम्ही अजिबात सहन करु शकत नाही. पण आम्ही मुळूमुळू रडत बसत नाही. पाऊस सुरु झाला की आम्ही तडक स्थलांतरासाठी तयार होतो. जिकडे कमी पाऊस पडतो अशा म्हैसूरकडे जातो मग कृष्णगिरी प्रदेशात जातो. जिथे जिथे पाऊस अल्प असतो तिथे आम्ही जातो.
पण तुम्हाला इतकं अंतर कापण्याची भीती वाटत नाही का? रविने विचारलं.
भीती वाटली असती तर आम्ही हे साहसच केलं नसतं ना ! हे साहस करतो म्हणून आम्ही जिवंत राहतो मित्रा, फुलपाखरु रवीस म्हणाले.
रवी विचारात पडला. काही क्षण असेच गेले. थोडा वेळ थांबू या का? रविने फुलपाखरास विनंती केली. ते दोघे वाटेतील एका झाडावर बसले. रवी अजूनही कसल्यातरी विचारातच होता.
काय रे, काय चाललय तुझ्या डोक्यात? फुलपाखराने विचारलं.
पावसात सगळीकडचे फुलपाखरं असंच इकडे तिकडे उडून जातात का? रविने त्याच्या मनातील प्रश्न विचारला.
हो हो, अरे, आमच्यातले काही फुलपाखरं पावसाच्या सुरुवातीला झाडांवर अंडी घालतात. मग त्यातून निघालेली पिल्लं झाडाची पानं फस्त करतात. या पिल्लांचं रुपांतर मोठ्या फुलपाखरात होईपर्यंत झाडाची पानं संपून जातात. त्यामुळे मग त्यांना त्यांच्या अन्नाच्या शोधात दुसऱ्या सुरक्षित जागेचा शोध घ्यावा लागतो. मग असे हजारो फुलपाखरं स्थलांतर करतात. हिमालय आणि खूप थंडी असलेल्या युरोपातील फुलपाखरं, उत्तम हवामान येईपर्यंत स्वत:ला अळी किंवा सुरवंटाच्या रुपात गोठवून ठेवतात. याचा अर्थ कळतोय का तुला? फुलपाखरानं विचारलं.
तुम्हा सगळयांकडे जादू आहे किंवा तुम्ही चेटूक करता असचं ना! रवी उत्तरला.
अरे मूर्खा, मी तुला जे काही सांगितलं याचा, हा अर्थ नाही. तर आम्ही फुलपाखरं, धो धो पाऊस पडतो, तेव्हा घाबरत नाही. शेकडो मैल प्रवास करुन सुरक्षित जागी जातो. हिमालयाच्या वर उडतो. वाऱ्याच्या विरुध्द दिशेने उडतो. आमच्यासाठी अत्यंत कठीण असलेला प्रदेशही ओलांडतो. तुझ्या सारखं भीती भीती करत राहिलो असतो तर आम्ही कधीचेच नष्ट झालो असतो.
पण पाऊस तर एखाद्या राक्षसासारखा किंवा दैत्यासारखा येतो नि घरच्या घरं ,जंगलाच्या जंगलं वाहून नेतो. सगळं जनजीवन ठप्प करतो. रवी म्हणाला.
फुलपाखरास आता रविचा खूपच राग आला होता. रागावलेल्या स्वरात तो म्हणाला,
गधड्या, यात पावसाचा दोष नाही. तुम्ही मानव मंडळी नाल्या बुजवता, त्यावर बांधकाम करता, प्लॅस्टिकचा कचरा ओतता, नद्यांचे प्रवाहच बदलवून टाकता. सतत जंगलतोड करता, यामुळे तुला जे वाटतं ते भीतीदायक घडतं. उगाच पावसाला नाव बोटं ठेवू नकोस. असं बोलून फुलपाखराने रागारागाने रविला ढकलून दिलं.
रविने खाडदिशी डोळे उघडले. त्याला किंचित डोळा लागला तेव्हा तेव्हा फुलपाखरु त्याच्या स्वप्नात आलं होतं. स्वप्नात जे बघितलं ते खरंय का? हे बघण्यासाठी त्याने टॅब उघडला आणि गुगल बाबांना प्रश्न विचारत राहिला.
स्वप्नातल्या फुलपाखरानं जे काही सांगितलं, ते सगळं खरं होतं. इवलासा नाजूक जीव, मात्र तो न घाबरता पावसाला तोंड देतो नि आपण सुरक्षित वातावरणात राहूनही भीतो, याची त्याला लाज वाटली. तो अंथरुणातून उठला. नुकतीच पहाट झाली होती. पाऊस अद्याापही पडतच होता. तो गॅलरित आला. कितीतरी वेळ पडणाऱ्या पावसाकडे बघत राहिला…