(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एन्ट्रन्स टेस्ट(एनआययएफटी) ही, फॅशन डिझायनिंग,व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या विषयातील शिक्षण – प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास प्राधान्य देणारी आपल्या देशातील सर्वोच्च गुणवत्ताप्राप्त संस्था आहे. जागतिक पातळीवरही या संस्थेच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रम चालवले जातात. या संस्थेचे देशभरात २० ठिकाणी कॅम्पस आहेत. उत्तम आणि आणि उत्कृष्ट करिअर घडवण्यासाठी या संस्थेचे विविध अभ्यासक्रम उपयुक्त ठरतात. ही बाब लक्षात घेऊन मराठी पालक आणि शिक्षकांनी या संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुलांना प्रोत्साहित करायला हवे.

एनआयएफटीमधील शिक्षण आणि प्रशिक्षण हे सर्वोच्च दर्जाचे समजले जाते. या संस्थेने आपल्या अभ्यासक्रमात जगभरातील नवे प्रवाह आणि फॅशन तंत्रातील कल लक्षात घेऊन तातडिने बदल केले आहेत. यामध्ये अभ्यासक्रमांतर्गतच स्पेशलायझेशनचा विषय निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणखी विकसित करु शकतील अशा बऱ्याच वै‍कल्पिक (इलेक्टिव्ह) अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. आता या संस्थेत, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा लर्निंग या अत्याधुनिक विषयांना शिकवले जाते.

विद्यार्थ्यांचा चौफेर व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी वैकल्पिक विषयांच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या  वैकल्पिक विषयांव्दारे विद्यार्थ्यस त्याचे संवाद कौशल्य, सर्जनशील वैचारिक क्षमतेत कौशल्य वृध्दी, व्यावसायिक नितिमत्ता अशा गुण समुच्चयांना अंगी बाणवने शक्य होते. वर्गातील विविध प्रकल्प, इंटर्नशीप आणि औद्योगिक पर्यावरणाशी  प्रत्यक्ष संपर्क या तीन घटकांना अधिक महत्व दिले जाते. लघुक्षेत्रातील कारागिरांसोबत काम करण्याची वा प्रशिक्षण घेण्याचा भागही अभ्यासक्रमात सामील करण्यात आला आहे. प्रत्येक आठवडयात प्रत्यक्ष अध्यापनासाठी २५  तासाचे नियोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी अधिकाधिक वेळ स्टुडियोमध्ये घालवता येता किंवा स्वयं अध्ययनावर वेळ खर्ची घालता येतो.

नव्या प्रवाहांचा समावेश

नवे  आणि सध्या उदयास येत असलेल्या पुढील विषयांचा  अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये (१) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (२) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (३) डिझायनिंग एर्गोनॉमिक एन्व्हीरान्मेन्ट, (५) ॲडव्हान्स्ड ॲपरेल मॅन्युफॅक्चुरिंग मॅनेजमेंट, (५) बिग डेटा ॲण्ड बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (७) फॅशन थिंकिंग, (८) युझर एक्सपेरियन्स- सेन्सरी डिझाइन, (८) ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल एक्सपिरियंस डिझाइन, (९) हेड गिअर डिझाइन, (१०) कॉम्प्युटर एडेड डिझाइन, (११) थ्रीडी ॲण्ड कंटेम्प्ररी मॅन्युफॅक्चुरिंग, (१२) कौर्च्युर ज्वेलरी, (१३) ट्रॅव्हल ॲण्ड आऊटडोअर गिअर डिझाइन, (१४) डिझाइन फॉर सोसायटी, (१५) स्मार्ट ज्वेलरी, (१६) स्मार्ट टेक्सटाइल, (१७) ॲक्टिव्ह स्पोर्टस विअर, बिस्पोक मेन्स, विअरेबल, टेक्नालॉजी, (१८) शेपविअर ॲण्ड सिमलेस गार्मेंट्स ऑन कॉम्प्युटराइज्ड निटिंग, (१९) डिजिटल एम्ब्रॉयडरी, लेजर, थ्रीडी  प्रिंटिंग,(२०) डिझाइन स्ट्रॅटेजी

प्रवेश प्रकिया

फॅशन तंत्रज्ञान,डिझाइन,व्यवस्थापन या क्षेत्रातील देशातील देशातील सर्वोत्कृष्ट संस्था असणाऱ्या, या संस्थेच्या पदवी,पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एन्ट्रन्स टेस्ट (एनआययएफटीइइ)’ ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्याची  प्रकिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२६. चाळणी परीक्षा, नॅशनल टेस्टिंग एजंसीव्दारे, देशातील १०० शहरांमध्ये, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील, मुंबई/नवी मुंबई/ ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, पुणे, नागपूर,नासिक या शहरांचा समावेश आहे.

पदवीस्तरीय अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ डिझाइन (बी.डिझाइन)

या अभ्यासक्रमांतर्गत (१)फॅशन डिझाइन, (२) लेदर डिझाइन, (३) ॲक्सेसरी डिझाइन, (४)टेक्सटाइल डिझाइन, (५) निटवेअर डिझाइन, (६) फॅशन कम्युनिकेशन आणि (७)फॅशन इंटेरिअर अशा सात विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.

परीक्षा पध्दती

जनरल ॲबिलिटी टेस्ट (जीएटी-गॅट) आणि क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट (सीएटी-कॅट). गॅट परीक्षा, कॉम्प्युटरबेस्ड म्हणजेच संगणकाधारित आहे. कॅट परीक्षा ही पेन आणि पेपर या पध्दतीची आहे.

कॅट आणि गॅट या दोन्ही परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित मेरिट यादी तयार केली जाते. या विद्यार्थ्यांना सिच्युएशन टेस्ट, द्यावी लागते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते.

जनरल ॲबिलिटी टेस्टला  ३० टक्के वेटेज, क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्टला ५० टक्के वेटेज आणि सिच्युएशन टेस्टला २० टक्के वेटेज दिले जाते.

जनरल ॲबिलिटी टेस्ट (जीएटी)

    ही चाळणी बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीची (मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह) असते. अचूक उत्तराला एक गुण दिला जातो. निगेटिव्ह गुण नाहीत.

     या पेपरमध्ये क्वांटिटिव्ह ॲबिलिटी (संख्यात्मक कौशल्य) ,कम्युनिकेशन ॲबिलिटी (संवाद कौशल्य), इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन (इंग्रजी आकलन कौशल्य), ॲनॅलिटिकल ॲबिलिटी (पृथ्थ:करण कौशल्य), जनरल नॉलेज आणि करंट इव्हेन्ट्स( सामान्य ज्ञान चालू घडामोडी) या विषयांवर प्रश्न विचारले जातात.

   क्वांटिटिव्ह ॲबिलिटी टेस्ट मध्ये ॲडिशन (बेरिज), मल्टिप्लिकेशन (गुणाकार), डिव्हीजन (भागाकार), फ्रॅक्शन्स (अपूर्णांक), वर्क ॲण्ड टास्क (काम आणि कार्य), रेशो ॲण्ड प्रपोरशन (गुणोत्तर आणि हिस्सा), डिस्टंस (अंतर) ,प्रॉफिट  ॲण्ड  लॉस (नफा आणि तोटा), परसेंटेज (टक्केवारी), रेट ऑफ इंटरेस्ट (व्याजदर), अलजेब्रा (अंकगणित), जॉमेट्री (भूमिती) यांचा समावेश असतो. (एकूण प्रश्न -२०)

   कम्युनिकेशन ॲबिलिटी टेस्टमध्ये उमेदवाराच्या इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासले जाते. यामध्ये सिनोनिम्स (समानार्थी शब्द) , अँटोनिम्स (विरुधार्थी शब्द), शब्दांचे अर्थ, अचूक स्पेलिंग, एक वचनी-अनेक वचनी शब्द, वाक्प्रचार इत्यादींचा समावेश असतो. इंग्लिश क्राँप्रिहेंशन टेस्टमध्ये दिलेल्या उताऱ्यावर प्रश्न विचारले जातात. त्याद्वारे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासली जाते. (एकूण प्रश्न -४०)

   नॅलिटिकल ॲण्ड  लॉजिकल ॲबिलिटी टेस्टमध्ये दिलेल्या माहितीवरुन तार्किकभावाने (लॉजिकली) व समक्यपणे विचार आणि विश्लेषण करण्याची उमेदवारांची क्षमता तपासली जाते. (एकूण प्रश्न -१५)

   जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स टेस्टमध्ये उमेदवारांचे सामान्यज्ञान आणि चालू घडामोडीचे ज्ञान तपासले जाते. (एकूण प्रश्न-२५).

पेपरचा कालावधी दोन तास.

क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट

   या टेस्टमध्ये फॅशन डिझाइनच्या अनुषगांने उमेदवारांचा सर्जनशील कल तपासला जातो. यामध्ये त्याची विचार करण्याची क्षमता, रंगसंगतीबाबतचे आकलन, निरीक्षण, एखाद्या नाविन्यपूर्ण संकल्पनेची निर्मिती, रेखांकनाची क्षमता यासारख्या बाबींची चाचपणी केली जाते.

सिच्युएशन टेस्ट

   एखाद्या डिझाइनसाठी उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर संबधित उमेदवार कशा प्रकारच्या कौशल्याने करतो, ही बाब या चाळणीद्वारे तपासली जाते.  

परीक्षेचा पेपर इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत राहील. यापैकी कोणत्याही एका भाषेचा स्वीकार करावा लागतो.

अर्हता-  या संस्थेच्या अभ्यासक्रमांसाठी पुढीलप्रमाणे अर्हता आहेत- () वयोमर्यादा- इच्छूक उमेदवाराचे वय  १ ऑगस्ट रोजी कमाल २४ वर्षे असावे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग संवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट दिली जाते. () शैक्षणिक अर्हता – बॅचलर ऑफ डिझाइन इन (फॅशन/ लेदर/ ॲक्सेसरी/ टेक्सटाइल/ निटवेअर आणि फॅशन कम्युनिकेशन)-कला/ वाणिज्य/ विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण, किंवा केंद्रीय तंत्रशिक्षण मंडळाने अथवा राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेली ३ किंवा ४ वर्षे कालावधीची पदविका.

संपर्क- संकेतस्थळ- www.nta.ac.in आणि exam.nta.ac.in/NIFT ईमेल- nift@ nta.ac.in दूरध्वनी- ०११- ४०७५९०००

एनआयएफटी रँकिंग (क्रमवारी)

चाळणी परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला वेगवेगळया कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जातो. वेगवेगळ्या सर्वेक्षणानुसार एनआयएफटीचे रँकिंग पुढीलप्रमाणे समजले जाते.

टॉप टेन (सर्वोच्च दहा) एनआयएफटी- () एनआयएफटी- दिल्ली, () एनआयएफटी- मुंबई, () एनआयएफटी- बेंगळुरु, () एनआयएफटी- चेन्नई, () एनआयएफटी- पटणा, () एनआयएफटी- गांधीनगर, () एनआयएफटी- हैदराबाद, () एनआयएफटी- कोलकता, () एनआयएफटी- कानपूर, (१०) एनआयएफटी- भोपाळ.(क्रमश:)

सुरेश वांदिले