(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

फॅशन-डिझाईन आणि तंत्रकौशल्य

१२ वीमध्ये कोणतीही ज्ञानशाखा घेतलेल्या सर्वसाधारण बुध्दिमत्तेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीस उत्तम करिअरची संधी मिळवून देणारा विषय म्हणजे फॅशन डिझायनिंग आणि तंत्रज्ञान. हा विषय कौशल्यप्राप्तिशी संबंधित असल्याने, ही कला मनापासून हस्तगत करता आली तर रोजगार ते स्वयंरोजगार असा प्रवास करणे सुलभ होते. या कलेमध्ये जितके प्रावीण्य मिळवू तितके यशही मिळू शकते.

फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम मात्र कोणत्याही संस्थेतून केल्यास प्रगतिच्या वाटेवर काटे पदोपदी रुतू शकतात. हा अभ्यासक्रम चालवणाऱ्या बऱ्याच संस्था मोठ्या शहरांमध्ये निघाल्या आहेत. अशा संस्थांमध्ये अनुभवी प्राध्यापकांची वानवा असते. प्रात्यक्षिकांसाठी यंत्रसामग्रीही नसते.

काटेकोर चौकशीची गरज

फॅशन डिझायनिंगची कला केवळ सिध्दांत समजून हस्तगत करता येत नाही. जे शिकवले जाते, त्याचे प्रात्यक्षिकही करता यायला हवे. त्यामुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही आकर्षणास बळी न पडता, कोटेकोर चौकशी करायला हवी. ही चौकशी प्रत्यक्ष संस्थेत जाऊन सुध्दा करता येणे शक्य आहे. या चौकशीमध्ये उपरोक्त नमूद बाबींसोबतच अभ्यासक्रमाच्या कालावधीत इंटर्नशीपची तरतूद, प्लेसमेंटसाठी येणाऱ्या विविध कंपन्या, गेल्या तीनचार वर्षात संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळालेली पदे (पोझिशन) व वेतन (पॅकेज) ही माहिती आवर्जून विचारावी.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग

आपल्या देशात फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात गेल्या ३ दशकात सर्वोत्कृष्ट ठरलेली संस्था म्हणजे, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. 1986 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था. या संस्थेत देशातील १७ शहरांमध्ये कॅम्पस आहेत.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवायचे असल्यास, या संस्थेला पर्याय नाही. या संस्थेने पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अशा तीन स्तरावर अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

१२वीनंतरची संधी

पदवी अभ्यासक्रम हे चार वर्षे कालावधीचे आहेत. १२ वीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी संस्थेच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यास पात्र ठरतात. संस्थेचे अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगार देण्यासाठी उपयुक्त ठरत असूनही महाराष्ट्रीय विद्यार्थी मोठ्या संख्येने या संस्थेमध्ये निवडली जात नाहीत.

पालक आणि विद्यार्थ्यांचेही लक्ष हे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखांवरच केंद्रित झाले असल्याने या ज्ञानशाखेच्या प्रवेश प्रक्रियेकडे वेळवर लक्ष दिले जात नाही.

घरोघरी ११ वीनंतर अभियांत्रिकी की वैद्यकीय अशी चर्चा होते, तेव्हा फॅशन डिझायनिंग वा इतरही ज्ञानशाखांचा विचार होत नाही. तो तसा होत नसल्याने, या संस्थेची प्रवेश प्रकिया कधी सुरु होते, परीक्षा कधी होते, मुलाखती कधी होतात याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. कुणी निदर्शनास आणले तर बघू नंतर म्हणून सांगणाऱ्याची बोळवण केली जाते.

यंदा म्हणजे २०२२ मध्ये विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश मिळवायचा असल्यास सबंधिताने डिसेंबर २०२१ मध्ये संस्थेच्या प्रवेश प्रकियेच्या जाहिरातीनुसार अर्ज भरणे आवश्यक होते. ज्या विद्यार्थ्यांनी असे अर्ज भरले असतील, तेच प्रवेश परीक्षेला बसू शकतील. (ही चाळणी परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आली.) त्यात गुणवत्ता यादित आल्यास जुलै/ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून त्यांचे शिक्षण सुरु होईल.

यंदा ज्या विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली असेल त्यांना आता नोव्हेंबर/डिसेंबर २०२२ पर्यंत वाट बघावी लागेल. कारण तेव्हा २०२३ च्या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल. ही बाब यंदा १२ वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थी व पालकांनीही लक्ष ठेवावी. म्हणजे विद्यार्थ्यांना २०२३ शैक्षणिक सत्रापासून हा अभ्यासक्रम करता येणे सुलभ जाईल.

विविध अभ्यासक्रम

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइन या संस्थेमध्ये बॅचलर  ऑफ डिझाइन इन () फॅशन डिझाइन,() ॲक्सेसरी डिझाइन, () लेदर डिझाइन, () फॅशन कम्युनिकेशन, () फॅशन टेक्नॉलॉजी, () नीटवेअर डिझाइन या विषयांमध्ये पदवी घेता येते.

फॅशन डिझाइन- या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा. हा या संस्थेचा फ्लॅगशिप म्हणजेच सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. भारतीय फॅशन उद्योगाला वेगळया उंचिवर नेण्याची कामगिरी गेल्या ३५ वर्षात, हा अभ्यासक्रम केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. सतत नावीन्याचा ध्यास घेतलेल्या या क्षेत्रासाठी बहुआयामी सर्जनशीलता असलेल्या मनुष्यबळाचा पुरवठा गेली तीन दशके करणे या अभ्यासक्रमामुळे शक्य झाले आहे. हा अभ्यासक्रम केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी देशासोबतच परदेशातही मोठे नाव कमावले आहे.

सध्याचे फॅशन प्रवाह आणि त्याअनुषंगाने भविष्यातील विविधांगी जागतिक फॅशन कल, प्रवाह आणि शक्यतांचा सर्जनशील विचार करण्याची क्षमता या अभ्यासक्रमातील विषय घटकांव्दारे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी अभ्यासक्रमात सातत्याने बदल, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि या क्षेत्रातील उद्योगांसोबत सहकार्य या तीन बाबींचा अवलंब करण्यात येतो. सध्याचे फॅशन कल आणि प्रवाह, आयात निर्यात आणि उद्योगाच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन विषय घटक निर्धारित केले जातात.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात डिझाइन ॲण्ड इलुस्ट्रेशन, ॲपेरल डेव्हलपमेंट वुईथ पॅटर्न मेकिंग, ड्रेपिंग ॲण्ड गार्मेंट कंस्ट्रक्शन या मुख्य विषयांचा समावेश आहे. याशिवाय फॅशनचा इतिहास आणि समकालीन फॅशन, समकालीन सांस्कृतिक सामाजिक विषयांचा फॅशन प्रवाहावर पडणारा परिणाम, उद्योगांच्या विविध गरजा आदी विषय घटकांचाही समावेश केला जातो. विविध स्तरातील ग्राहकांच्या गरजेनुसार फॅशन डिझाइन करता येणे शक्य व्हावे यासाठी तंत्रकुशलता वाढवली जाते. प्रात्यक्षिकांसाठी खास असे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार करण्यात आले असून त्यामुळे सर्जनशील कल्पनांचा विस्तार करणे आणि सादरीकरणाचे तंत्र हस्तगत करणे शक्य होते.

पॅटर्न मेकिंग, ड्रेपिंग आणि गार्मेंट कंस्ट्रक्शन या विषयांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज अशा प्रयोगशाळांची सुविधा आहे. अंतिम सत्रात उद्योगांशी संबंधित व त्यांनी प्रायोजित केलेल्या प्रकल्पावर काम करावे लागते किंवा स्वत:च्या सर्जनशीलतेने विविध डिझाइनची निर्मिती करावी लागते. वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात पदवीधरांच्या डिझाइन्स ठळरित्या प्रदर्शित केल्या जातात.

या अभ्यासक्रमांतर्गत १) डिझाइन ॲण्ड कौच्युरे (ग्राहकांच्या विशिष्ट मागणी आणि गरजेनुसार फॅशनेबल वस्त्रांचे डिझाइन व निर्मिती) आणि २) इमेज क्रिएशन ॲण्ड स्टायलिंग या दोन विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. या दोनपैकी कोणताही एक विषय निवडू विद्यार्थी शकतो.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना डिझाइन डायरेक्टर, फॅशन डायरेक्टर, स्टाइल ॲडव्हायजर, फॅशन बायर, डिझाइन मॅनेजर, फॅशन क्युरेटर, डिझाइन कंसलटंट, फॅशन ब्लॉगर, फॅशन क्रिटिक, फॅशन इलुस्ट्रेटर अशा सारखा रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

कोणत्या उद्योगात संधी मिळेल-

 () रिटेल क्षेत्र- रिलायन्स रिटेल, रेमंड्स, तनैरा, टीसीएनएस, पँटलून्स, ब्लॅक बेरी, लँडमार्क, गूडअर्थ, आदित्य बिर्ला फॅशन ॲण्ड रिटेल, () टेक्स्टाईल मिल- अरविंद, रेमंडस, कलाकुसर क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था () ई कॉमर्स क्षेत्र- ॲमेझान, मायंत्रा, एजिओ, फर्स्ट सिटी, टाटा क्लिक() फॅशन प्रवाह भविष्यवेत्या कंपन्या- डब्ल्यूजीएसएन, पॅटर्न बँक, () फॅशन डिझायनर्स- रोहीत बाल, गौरव गुप्ता, सब्यासाची मुखर्जी, राजेश प्रताप सिंग, रितू बेरी, तरुण तहलियानी, संदीप खोसला, मनीष मल्होत्रा, अमित अग्रवाल, सुकेतू धीर, राहूल मिश्रा, अनिता डोंगरे, अबू जानी () आयात निर्यात कंपनी- ओरिएंट क्रॅफ्ट, स्पॅन इंडिया, मॉडेलाम एक्स्पोर्टस, ली ॲण्ड फंग, टायबर्ग ॲण्ड इम्पल्स,

उद्योजकतेला प्रोत्साहन

हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची कास धरावी यासाठी संस्थेमार्फत प्रोत्साहन दिले जाते. हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी, स्वत:च्या फॅशन बँड विकसित करुन, व्यवसायात उतरु शकतात. चित्रपटातील नट/नट्या, मोठे उद्योजक, इतर क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती (सेलिब्रिटिज), इव्हेंट्स, फॅशन शोज आदीसांठी फॅशन स्टायलिस्ट म्हणून स्वतंत्ररीत्या काम करण्याची संधी मिळू शकते. नाटक/ चित्रपट/ टीव्ही कार्यक्रम यातील शेकडो पात्रांसाठी लागणाऱ्या पोषांखाचे डिझाइन करण्याची फार मोठी संधी  गेल्या काही वर्षात निर्माण झाली आहे. ऐेतिहासिक/धार्मिक कार्यक्रमांच्या संख्येत वाढ झाल्याने यातील पात्रांसाठी बहुढंगी/बहुरंगी पोषांखाची मागणीही वाढली आहे.

सुरेश वांदिले