कोणत्याही मोठ्या रस्त्यावरुन जात असताना सर्वाधिक दुकानं कपड्यांची असतात. खाण्यापिण्याच्या दुकानानंतर किंवा तेवढीच गर्दी या दुकानांमध्ये असते. आजकाल नव्या कपड्यांचा हंगाम सर्वकाळ असतो. त्यामुळे दर महिन्या-दोन महिन्याला नवी वस्त्रे मार्केटमध्ये येतात. या सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षित मनुष्यबळ संबंधित कंपन्या, उद्योग, स्टार्टअप यांना लागते.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी(एनआयएफटी) मधील असे काही अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत. सर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व साहाय्य केले जाते. या अभ्यासक्रमांना थेट प्रवेश दिला जातो. अर्ज केलेल्या उमेदवारांची सामान्य स्वरुपाची कलचाचणी अथवा मुलाखत घेतली जाते किंवा यापैकी काहीही न घेता प्रवेश दिला जाऊ शकतो.
अभ्यासक्रम आणि संस्था
(१) सर्टिफिकेट इन ॲथिलेश्युअर विअर– खेळाडूंसाठी असलेल्या वस्त्रप्रावरणांच्या डिझाइन (अभिकल्प), पॅटर्न (साचा) तयार करणे, निर्मिती आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा-३५.
(२) सर्टिफिकेट इन क्रिएटिव्ह टेक्सटाइल डिझाइन– प्रिंटिंग, डायिंग, एम्ब्रॉयडरी, नमूना विकास (सॅम्पल डेव्हलपमेंट),आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा- ३५.
(३) सर्टिफिकेट इन क्लोदिंग प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी- निर्मिती नियोजन आणि नियंत्रण, टेक्सटाइल सायन्स, वस्त्रप्रावरणे यंत्रसामग्री, पॅटर्न डिझाइन, गुणवत्ता नियंत्रण आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी कोलकता येथे करता येतो. एकूण जागा-३५.
(४) सर्टिफिकेट इन क्रिएटिव्ह थिंकिंग ॲण्ड डिझाइन डेव्हलपमेंट- डिझाइन कौशल्य आणि विकास, फॅशन चित्रांकन, पॅटर्न डेव्हलपमेंट, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा- ४०.
(५) सर्टिफिकेट इन कंटेम्प्ररी टेक्निक इन कंस्ट्रक्शन डिझाइन- कॉम्प्युटर एडेड डिझाइन आणि डिजिटल डिझाइनचे तंत्र, आदी बाबींचे प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी वाराणसी येथे करता येतो. एकूण जागा-३५.
(६) सर्टिफिकेट इन बुटिक ॲपेरल ॲण्ड ॲक्सेसरी- फॅशन रेखांकने (इलुस्ट्रशेन), बुटिक व्यवस्थापन, डिझाइनचा विकास, वस्त्र निर्मिती, पृष्ठभागावरील सखोल नक्षीकाम/शिवणकाम, एम्ब्रॉयडरी, मूल्यनिर्धारण, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी कोलकता (जागा-३५) आणि दिल्ली (जागा-४०) येथे करता येतो.
(७) सर्टिफिकेट इन डिझाइन डेव्हलपमेंट फॉर एथनिक विअर-भारतीय पारंपरिक वस्त्रप्रावरणे, एम्ब्रॉयडरी आणि पृष्ठभागावरील डिझाइनचे तंत्र, रेखांकने, धाग्यांचे ज्ञान आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी चेन्नई येथे करता येतो. एकूण जागा- ३०.
(८) सर्टिफिकेट इन डिझाइन इनोव्हेशन इन फॅशन ॲण्ड टेक्सटाइल– डिजिटल माध्यमांचा उपयोग करुन घर, जागा, आणि फॅशन क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण, कल्पक आणि हटके, टेक्सटाइल डिझाइनचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा- ३०.
(९) सर्टिफिकेट इन डिझायनिंग ॲण्ड स्टायलिंग फॉर इंडियन फॅशन- फॅशन छायाचित्रण, फॅशन रेखांकने, स्टायलिंग, मेकअप, पॅटर्न निर्मिती, व्यवसाय संकल्पना, डिझाइन प्रकिया आदी बाबींचे प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा- ४०.
(१०) सर्टिफिकेट इन फॅशन ॲपरेल्स ॲण्ड ॲक्सेसरी डिझाइन- चामडीपासून आणि चामडीशिवाय तयार करण्यात येणाऱ्या फॅशनेबल वस्तू, या क्षेत्रातील उद्योगाची स्थिती, धागे आणि चामडींपासून वस्त्रप्रावरणे किंवा वस्तू निर्मितीचे तंत्र, कट वर्क, पॅच वर्क आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी कोलकता येथे करता येतो. एकूण जागा- ३५.
(११) सर्टिफिकेट इन फॅशन क्लोदिंग टेक्नॉलॉजी – फॅशन रेखांकने आणि तांत्रिक चित्रांकन, पॅटर्न विकास आणि शिवण कौशल्य, पाश्चिमात्य आणि इंडो-वेस्टर्न पोषाख, बाजार सर्वेक्षण, टेक्सटाइल विज्ञान, संसाधने, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी बेंगळुरु, हैदराबाद, मुंबई, वाराणसी या कॅम्पसमध्ये करता येतो. या सर्व कॅम्पसमध्ये प्रत्येकी ३० जागा. दिल्ली (एकूण जागा – ४०) आणि कोलकता (एकूण जागा-३५.)
(१२) सर्टिफिकेट इन फॅशन इंटिग्रेशन फॉर टेक्सटाइल- डिझाइन प्रकिया, वस्त्रप्रावरणांच्या निर्मितीसाठी ग्रॅफिक आणि डिजिटल डिझाइनचे सॉफ्टवेअर, निर्यात व्यवस्थापन आणि व्यापार, धागे आणि वस्त्रांच्या किमती, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि मार्केट विकास, या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी बेंगळुरु येथे करता येतो. एकूण जागा- ३०.
(१३) सर्टिफिकेट इन फॅशन निटवेअर ॲण्ड प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी- पॅटर्न तयार करणे, शिवणकाम, अंतर्वस्त्र निर्मिती आणि नियोजन, मूल्यनिर्धारण, व्यापार, गुणवत्ता, विपणन या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी कोलकता (एकूण जागा-३५) आणि चेन्नई (एकूण जागा-३०) येथे करता येतो.
(१४) सर्टिफिकेट इन फॅशन रिटेल मॅनेजमेंट– फॅशन विपणन, किरकोळ खरेदी, व्यापार, ग्राहक संबंधाचे व्यवस्थापन, नाममुद्रा (ब्रँड) व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी बेंगळुरु (एकूण जागा-३०), मुंबई (एकूण जागा-१५), दिल्ली (एकूण जागा-४०) येथे करता येतो.
(१५) सर्टिफिकेट इन ग्रॅफिक डिझाइन ॲण्ड कम्युनिकेशन- विविध प्रकारचे डिझाइन, ग्रॅफिक्स, संहिता लेखन, टायपोग्रॅफी, कॉर्पोरेट ग्रॅफिक्स, पोस्टर आणि घडिपत्रिका डिझाइन, छपाईचे तंत्र, सादरीकरणाचे तंत्र, वेब ग्रॅफिक, डिजिटल पोर्ट फोलिओ, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा-३०.
(१६) सर्टिफिकेट इन गार्मेट प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲपेरल डिझाइन- व्यापार, निर्यात, फॅशनेबल वस्त्रप्रावरणांसाठी लागणारे साहित्य, वस्त्र निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण, आंतरराष्ट्रीय व्यापार पध्दती, प्रकिया आणि व्यवस्थापन आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी गांधीनगर येथे करता येतो. एकूण जागा-३०.
(१७) सर्टिफिकेट इन इंटेरिअर डिझाइन ॲण्ड स्पेस प्लॅनिंग- डिझाइन थिंकिंग, तांत्रिक आणि प्रात्यक्षिक कौशल्ये, डिझाइन प्रकिया, नवे प्रवाह, वस्तू, साधने आणि साहित्याचे ज्ञान, चित्रांकन आणि रेखांकनाचे कौशल्य, तांत्रिक चित्रांकन, सादरीकरणाचे तंत्र, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा-३५.
(१८) सर्टिफिकेट इन गार्मेंट एक्स्पोर्ट मर्कंडायजिंग मॅनेजमेंट-
व्यापार, निर्यात, फॅशनेबल वस्त्रप्रावरणांसाठी लागणारे साहित्य, वस्त्र निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण, आंतरराष्ट्रीय व्यापार पध्दती, प्रकिया आणि व्यवस्थापन आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा-३०.
(१९) सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट ऑफ फॅशन बिझिनेस- निर्मिती व्यवस्थापन, किरकोळ व्यवस्थापन ,संस्थात्मक कार्याचं कौशल्य, धाग्यांचे ज्ञान, फॅशन प्रकियेचे ज्ञान आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा- ३५.
(२०) सर्टिफिकेट इन व्हिज्युअल मर्कंडायजिंग ॲण्ड डिजिटल डिझाइन- फॅशन आणि नव्या प्रवाहांचे चक्र, फॅशनेबल वस्त्रप्रावरणांच्या दुकानांचा अभ्यास, अशा दुकानांसाठी डिझाइनचे महत्व, ब्रँडेड कपडयांसाठीचे खास विंडो (खिडकी) डिझाइन, ग्राहक आणि बाजाराच्या गरजा, फॅशनेबल वस्त्रप्रावरणांसाठी लागणारे साहित्य, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा-२५.
संपर्क- www.nift.ac.in. या संकेतस्थळावरील, ॲकेडेमिक्स- “कंटिन्युईंग एज्युकेशन प्रोग्रॅम” या बटनवर क्लिक केल्यावर प्रवेश प्रकियेची विस्तृत माहिती मिळते.( www.nift.ac.in/cep)
सुरेश वांदिले