(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फॅशन सांगण्याची कला-फॅशन कम्युनिकेशन

   संवादसंप्रेषणाचे सारे कौशल्य पणाला लावून फॅशन कम्युनिकेटर एखाद्या कंपनीत तयार झालेल्या पोषाखांना  आकर्षकरीत्या विविध माध्यमातून वाचक किंवा दर्शक/प्रेक्षकासमोर आणतात. संभाव्य ग्राहकाला खिळवतात. यापैकी काहीजण निश्चितपणे त्या विशिष्ट ब्रँडचे पोषाख घेण्यासाठी दुकांनाकडे वळतात.

आपल्या देशात रिटेल क्रांतीनंतर ब्रँडेड कपडयांचे पँटालून सारखे मोठे स्टोअर्स रिटेल दुकांनाच्या परिसरात उभे राहिले आणि ग्राहकांना आकर्षित करते झाले. असे आकर्षण निर्माण करण्यात फॅशन कम्युनिकेटर्सनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.

. फॅशन उद्योगाची वाढ आणि विस्तार वेगाने होत आहे. या क्षेत्रात नव्या कंपन्या, ब्रँड्स आणि जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्या मार्केटमध्ये आक्रमकपणे उतरत आहेत. भारतीय बाजारपेठचा आकार आणि मध्यवर्गीयांची संख्या ही या क्षेत्रातील उद्योजकांसाठी आकर्षणाचे ठरत आहे. त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फॅशन कम्युनिकेटर्सच्या सेवा घेतल्या जातात.

    करीअर संधी

    फॅशन कम्युनिकेशन  हे करीअरचे नवे उदयोन्मुख क्षेत्र आहे. फॅशन कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम केल्यावर संबधित उमेदवारास फॅशन व्यवसाय, रिटेल विक्री, वृत्तपत्रे, मासिके आणि टीव्ही कार्यक्रमांसाठी फॅशन पत्रकारिता, नव्या ब्रँडच्या प्रचार आणि प्रसार इव्हेंट्स अशा क्षेत्रामध्ये करियरची संधी मिळू शकते. नव्या ब्रँड्सचा मार्केटमधील प्रवेश, विविध मॉल्स मधील प्रचार इव्हेन्ट्स, कॅटवॉक शोज, टीव्ही वरील कार्यक्रम,प्रदर्शनी यामध्ये फॅशन कम्युनिकेटर्सना मुख्य भूमिका बजावी लागू शकते. दृष्यसंकल्पना, संदेश, माहिती आणि डिझायनिंग असे बहुआयामी काम फॅशन कम्युनिकेटरला करावे लागते.

    या अभ्यासक्रमाद्वारे संबंधित विद्यार्थ्यांना विक्रीचे मूलभूत तत्वे, डिझायनिंगची मूलभूत तत्वे, तांत्रिक चित्रांकन, फॅशन सिध्दांत, फॅशन स्टायलिंग, फॅशन पत्रकारिता आणि पोर्टफोलिओ निर्मिती अशा घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी लागणारे संपूर्ण कौशल्य या अभ्यासक्रमामधून संबधित उमेदवारास मिळावे यादृष्टिने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

फॅशन व्यवसायात वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्या आणि प्रश्नांच्या निराकरणासाठीची निर्णयक्षमता सुध्दा हा अभ्यासक्रम केल्यावर निर्माण होते. सृजनशील व्यक्तिमत्वास माध्यमे आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती आणि विकासाच्या विविध संधी हा अभ्यासक्रम केल्यावर उपलब्ध होऊ शकतात.