(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज भासत असते. त्याचबरोबर या उद्योगासाठी इतर घटकांतील कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ही गरज भागवण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या, इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन या संस्थांनी काही अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

अशा काही संस्था आणि अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत.

(१) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन – दिल्ली येथे असणारी, इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन ही संस्था १९६२ साली भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालायामार्फत स्थापन करण्यात आली. आतिथ्यसेवा उद्योगाला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या गरजांची पूर्तता करण्याचा हेतू ही संस्था स्थापन करण्यामागे होता. गेल्या ६० वर्षात या संस्थेने या क्षेत्रातील शिक्षण – प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी आपल्या देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.

अभ्यासक्रम

 (१) डिप्लोमा इन बेकरी ॲण्ड कन्फेक्शनरी- हा दीड वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. बेकरी उत्पादनाशी संबंधित विषयाचे सखोल ज्ञान या अभ्यासक्रमात दिले जाते. याममध्ये ब्रेडची निर्मिती, पॅस्ट्रीची निर्मिती, केक डेकोरेशन, चॉकलेट डेकोरेशन या विषय घटकांचा समावेश आहे. शिवाय व्यवसाय/स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, संगणकीय ज्ञान प्रदान केले जाते. दीड वर्षांपैकी एक वर्षे संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गासाठी उच्चतम वयोमर्यादा २५ वर्षे तर राखीव संवर्गातील उमेदवरांसाठी ही वयोमर्यादा २८ वर्षे आहे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमासाठी चाळणी परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना बेकर्स, पॅस्ट्री शेफ, चॉकलेटिअर्स, डेझर्ट स्पेशॅलिस्ट अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

 (२) डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हेरेजेस सर्व्हिस – दीड वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमात अन्नपदार्थ आणि खाद्य-पेये सेवा क्षेत्रासाठी लागणारे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये अन्नपदार्थ सेवा, विविध पेय सेवा, अन्न आणि पेये नियंत्रण, स्वच्छता आणि आरोग्य, व्यवसाय संवादसंप्रेषण, रेस्टॉरेंट व्यवस्थापन, बार व्यवस्थापन आणि कार्यान्वयन या विषय घटकांचा समावेश आहे. दीड वर्षांपैकी एक वर्षं संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला ७० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गासाठी उच्चतम वयोमर्यादा २५ वर्षे तर राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा २८ वर्षे आहे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या उमेदवाराने १२वीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेला असावा. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो.अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.

संपर्क –  इंस्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लायब्ररी अव्हेन्यू, पुसा कॉम्पलेक्स, नवी दिल्ली 110012, दूरध्वनी-  011- 25841411, फॅक्स-25840147 संकेतस्थळ- www.ihmpusa.net, ईमेल- ihmpusa@rediffmail.com

०००