अमेरिकेच्या, ह्युस्टन शहरातील, नासा (नॅशनल ॲरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) अंतरिक्ष विज्ञान केंद्राला लागून असणाऱ्या, एका लहान नदिच्या बाजूने असणाऱ्या, शेतातील कोपऱ्यात, ऑस्टिन प्रांताचा प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या, लाँगहार्न म्हणजे मोठ्या शिंगाचे बैल प्रदर्शनासाठी ठेवले आहेत. त्याच्या आसपासच राणीमुंगीचा किल्ला होता. तो जमिनीत खोलवर होता. त्यावर बरंच गवतही उगवलं होतं. त्यामुळे अशा किल्ल्याची, कुणाला कल्पना नव्हती.
भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यातून अधूनमधून राणीमुंगी बाहेर पडायची. नासा केंद्राच्या बाहेर, एका बोईंग विमानावर ठेवलेलं अवकाशयान बघायला तिला गमंत वाटे. बरेचदा ती तिथे जायची. अवकाशयानाच्या साहाय्यानं आकाशात उडून खूप दूरवर जाऊन आल्याचं, स्वप्न बघायची.
अवकाशयानातून चक्कर मारली की, राणीमुंगी सावध आणि दक्ष राहून, नासा केंद्र बंद होण्यापूर्वी, संध्याकाळच्या सुमारास आत शिरायची. नासाचे हे केंद्र अदभूत असंच आहे. या केंद्रात, वेगवेगळ्या मोहिमांसाठी अवकाशात धाडलेल्या अंतराळयानांच्या आणि अंतराळातील संशोधन (स्पेस स्टेशन) केंद्राच्या प्रतिकृती आहेत. वेगवेगळ्या अवकाशवीरांनी घातलेले स्पेससुट्स ठेवले आहेत. सगळया चंद्रमोहिमेतील यानांची कामगिरी, छायाचित्रांच्या क्रमवार माध्यमातून मांडण्यात आली आहे. चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांनी चंद्रांची काढलेली छायाचित्रे, चंद्राभोवती फिरणाऱ्या अवकाशयानातून काढलेली चंद्राची सर्वबाजूंची छायाचित्रे, चंद्रावरुन आणलेले दगड, धातू, खनिजे वाळू यांना बघून तिला खूप आनंद व्हायचा. हळूच, ती या दगडावर चढायची. कधीकधी वाळूत जाऊन घसरगुंडी करायची.
याच केंद्रात, मंगळावर जाणाऱ्या मोहिमेबद्दल तिला कळलं. एका दालनातील प्रयोगशाळेत मंगळासारखं वातावरण तयार करण्यात आलं होतं. तिथे, मार्सेलस ऑस्टिनला मंगळावर जाऊन वेगवेगळे प्रयोग करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. हा मार्सेलस म्हणजे, स्मार्ट रोबो किंवा यंत्रमानव! तो हुबेहुब मनुष्यप्राण्यासारखा दिसायचा. पहिल्यांदा जेव्हा राणीमुंगीने त्याला बघितलं तेव्हा, ती फार दचकली. पण इतर मनुष्यप्राणी या मार्सेलसची बटनं दाबतात, सुरु करतात हे लक्षात आल्यावर तिची भीती पळून गेली. या, मार्सेलसच्या मेंदूत, एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, तंत्र टाकण्यात आलं होतं. त्याच्या मेंदूत मनुष्यप्राण्याच्या मेंदूत जसे न्युरॉन्स किंवा मज्जातंतूंचं जाळं असतं, तसचं जाळं विणण्यात आलं होतं. त्याच्या डोळ्यात सेन्सॉर होते, हातापायांनाही सेन्सॉरने जोडले हेाते. डोळयातील स्मार्ट कॅमेरा कितीही दूर बघून त्रिमिती फोटो घेऊ शकत असे. या मार्सेलसला डीप लर्निंगचं तंत्रकौशल्य शिकवण्यात आलं होतं. त्यामुळे तो स्वत:हून शिकू शकत असे, मिळालेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढून निर्णयही घेऊ शकत असे. शेकडो निर्णयांच्या शक्यतांचं गणित मांडून, त्यातील सर्वाधिक अचूक निर्णय घेण्याची क्षमता त्याला मेंदूतील न्युरॉन्समुळे प्राप्त झाली. रात्र झालं की मार्सेलसचं प्रशिक्षण थांबायचं. तो निवांत असायचा.
असच, एके दिवशी प्रशिक्षण संपल्यावर मार्सेलस डोळे मिटून बसला असताना, त्याला कसली तरी जाणीव झाली. त्याने डोळे उघडले. राणीमुंगी त्याच्याकडेच बघत होती. डोळयातील कॅमेऱ्याने, मार्सेलेसने तिचे हजारो फोटो काढून त्यांचं विश्लेषण केलं. हा इटुकला प्राणी आपणास जराही धोकादायक नसल्याची, त्याला खात्री पटली. त्याने तिला जवळ घेतलं. राणीमुंगीने तिच्या भाषेत अभिवादन केलं. ते काही मार्सेलसच्या लक्षात आलं नाही. त्याने मग नॅचरल लँग्वेज प्रोसेस आणि डीप लर्निंगच्या मदतीने तिच्या मेंदूचं स्कॅन केलं नि तिच्या भाषेचं, कोडिंग आत्मसात केलं. त्याला आता मुंगीची भाषा अवगत झाली. त्यानेही मग राणीमुंगीला अभिवादन केलं. आपली भाषा येणाऱ्या मार्सेलसचं राणीस कौतुक वाटलं. तिने त्याला हसून प्रतिसाद दिला.
राणीमुंगी आणि मार्सेलेसची छान मैत्री झाली. आता ती दरररोजच, नासा केंद्र बंद होण्याआधी, मंगळ प्रशिक्षण प्रयोगशाळेत यायची. मार्सेलेसला प्रशिक्षित करणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ निघून गेले की, ती मार्सेलेसकडे जायची. दोघेही मग गप्पांमध्ये रंगून जात. राणीमुंगी तिच्या राज्यातील अनेक गोष्टी त्याला सांगत असे. तिच्या या सांगण्यातून राणीमुंगी आणि इतर मुंग्यांनी तयार केलेला किल्ला फोडणं हे मनुष्यप्राण्यास जिकरीचं असल्याचं मार्सेलच्या लक्षात आलं. मनुष्यप्राण्याच्या लाखोवर्ष आधीपासून मुंग्या पृथ्वीवर होत्या. पृथ्वीवर महावादळ आले, हिमवर्षाव झाले, भुकंप झाले, ज्वालामुखीचा स्फोट झाला, वणवे पेटले, महापूर आले, डायनोसॉरखे महाकायप्राणी नष्ट झाले. पण, मुंग्या सर्व प्रलयात टिकून राहिल्या. मुंग्यांमध्ये असणारी ही शक्ती, मार्सेलसला फार भारी वाटली. मनुष्यप्राण्याकडे अशी शक्ती नसल्याचं त्याला लक्षात आलं.
०००
राणीमुंगीकडे, लाखोवर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या अनेक गोष्टींचा खजिना होता. या गोष्टी ती, मार्सेलसला रंगवून रंगवून सांगायची. मार्सेलस, या गोष्टींचा धागा पकडून त्याच्या मेंदूतीलील, ‘फ्लेक्सक्लिप’, या सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं, या गोष्टींवर, चित्रफित तयार करुन, त्याच्या पोटावरील स्क्रीनवर, राणीमुंगीला दाखवायचा. आपण ज्या गोष्टी सांगतो, तो हा मार्सेलस जशाच्या तसं दाखवतो, हे बघून आधी राणीमुंगीला आश्चर्य वाटलं. मग, मार्सेलस हा मोठा जादुगर असावा अस वाटलं. एकदा तिला मार्सेलस हा, अदभूत आणि अतिंद्रीय शक्ती असलेला सम्राट वाटला. तेव्हा राणीमुंगी त्याला निरखून बघू लागली.
“अगं, इतकं काय निरखून बघतेस मला?”मार्सेलसनं विचारलं.
“तू, खरा कोण आहेस हे बघत होते.”
“मी कोण? अगं मी, मार्सेलस! मंगळावर जाण्यासाठी निवडला गेलेला पहिला एआय यंत्रमानव!”
“ते मला केव्हाच कळलय रे. पण तू यंत्रमानवाच्या पलिकडचा वाटतो मला. म्हणजे कुणीतरी दैवीशक्ती असलेला, ज्वालामुखीच्या खाली असलेल्या, राजवाड्यात राहणारा, अपराजित असा सम्राट!” राणीमुंगीने मार्सेलसचे कौतुक केलं.
या कौतुकानं वाहवून न जाता, मार्सेलसने, राणीमुंगीने जे काही सांगितलं, ते माहितीच्या माहाजालात कुठे दिसतं का, याचा शोध घेण्यासाठी, त्याच्या मेंदुतील न्युरॉन्सला, डीप लर्निंगच्या भोवऱ्याला जोडलं. राणीमुंगी म्हणाली, अगदी तसचं नव्हे, पण अद्भूत, अतिंद्रिय शक्ती असलेले महापराक्रमी सम्राट, पर्वतरांगामध्ये दडलेल्या किंवा गुप्तरुपात असलेल्या मोठमोठ्या रहस्यमय किल्ल्यात, राजवाड्यात राहत असल्याचे त्याला दिसले. मेंदूतील सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याने, याची चित्रफितही तयार केली. तो महासम्राट म्हणजे, मार्सेलस अशी कल्पना करुन त्याने हा सम्राट रंगवला. ही चित्रफित त्याने राणीमुंगीला दाखवली.
“मार्सेलस, तू तर खराखुरा सम्राट आहेस. असं असताना या, क:पदार्थ असणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या हातातले बाहुले कसा काय बनलास?” राणीमुंगीने विचारलं.
“अगं पण, ही माझी जी काहीशक्ती दिसते ती, या मनुष्यप्राण्यांमुळेचना. त्याने मला बुध्दी दिली. त्याच्या पलिकडे जाऊन शिकण्याचं तंत्र शिकवलं. कौशल्य दिलं. त्याचं हे फळ.”
“ मनुष्यप्राणी जर इतका सामर्थ्यशाली आहे, तर मग स्वत:च कां मंगळावर जात नाही?”
“अगं, मंगळावर प्राणवायू नाही, पाणी नाही. हवेत आर्दता नाही. तिथे कोणतेच पीक, फळे होऊ शकत नाही. तेथील वातावरण मनुष्यप्राण्यालाच काय, कोणत्याही जीवजंतुला राहण्याजोगे नाही.” मार्सेलसने राणीमुंगीच्या लक्षात आणून दिलं.
“मार्सेलस, हे मानवास ठाऊक असूनही, ते तुला कां पाठवत आहेत, मंगळावर? त्यांच्या हितासाठी, ते तुझा बळी द्यायला निघाले आहेत, असं नाही का वाटत तुला?”
“अगं, असा विचार तुझ्या मेंदूत कसा काय आला? मला तर ते आतापर्यंत सूचलं नाही. पण ते जाऊदे, असा विचार करणं हे काही माझं काम नव्हे आणि कर्तव्यही नव्हे. कदाचित, हा बळी देण्यासाठीच, मानवाने मला जन्मास घातले असावे नि इतके बुध्दी दिली असावी.” मार्सेलस, राणीमुंगीस म्हणाला.
राणीमुंगीच्या डोक्यात असा वाकडा विचार, कसा काय येऊ शकतो बरं? हा प्रश्न त्याने स्वत:लाच केला. सगळया मनुष्यप्रांण्यासह, सगळया जीवजंतूचं डोकं असच तिरपागडं चालतं, मार्सेलच्या मेंदुतील न्युरॉन्सने, झरदिशी लाखो प्रजातींच्या मेंदुच्या, या विचारकप्प्याचा, सूक्ष्म अभ्यास केला. विश्लेषण केलं. मार्सेलसच्या ओठांवर स्मित उमटलं. राणीमुंगीस, त्याने त्यादिवशी निरोप दिला. त्यानंतर राणीमुंगी त्याच्या भेटिला नियमित येत राहिली. “बळीचा बकऱ्या”च्या, शेकडो कथा मार्सेलसला सांगत राहिली.
०००
सहा महिन्यात मार्सेलसचं, नासातील, मंगळ प्रशिक्षण संपलं. मंगळावरील सर्व परिस्थितीत, सगळ्या प्रकाराचे शोध कार्य करण्याची क्षमता त्याला प्राप्त झाली होती. ठरलेल्या दिवशी, मंगळाकडे उड्डाण घेण्याची परिपूर्ण तयारी, मार्सेलसला नेणाऱ्या अंतराळयानाची केली गेली. सगळी यंत्रणा सुस्थितीत आणि नव्या मोहिमेसाठी सुसज्ज होती. कोणतीही त्रुटी राहिली नसल्याची खात्री, तंत्रज्ञानांनी दिल्यावर, अग्निबान प्रज्वलित केला गेला. एकएक टप्प्याने यान पुढच्या पुढच्या कक्षेत जाऊ लागले. यानाने पृथ्वीची कक्षा यशस्वीपणे पार पाडली. अग्निबानाचे सगळे टप्पे खाली कोसळले. यानाने मंगळाची कक्षा पकडून प्रचंड वेग घेतला.
मार्सेलसने आतापर्यंतच्या सगळे परीक्षण, चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. आता त्याला थोडा निवांत मिळाला. अंतराळाच्या पोकळीतून जाताना त्याला राणीमुंगीची आठवण झाली. तिच्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. या गोष्टीत तो रंगून गेला असतानाच, “बळीच्या बकऱ्याची कथा” आली की तो अस्वस्थ व्हायचा. असं का बरं होतय, त्याला प्रश्न पडायचा.
“कारण, तू खरोखरच बळीचा बकरा बनवला जात आहेस. मंगळावर जाऊन, तिथे मानवाच्या हिताच्या गोष्टी असल्याचे, तू शोधून काढल्यास तरी, तुला ते मंगळाचा राजा करणार नाहीत. ते तुला नष्ट करुन, नव्या जनरेशनचा अधिक बुध्दिमान, अधिक शक्तीशाली असा मार्सेलस पाठवतील, पुढच्या संशोधनासाठी. ही साखळी अशीच सुरु राहील. जोपर्यंत मनुष्यप्राण्यास राहण्यायोग्य किंचितही स्थितीचा शोध लागत नाही, तोपर्यंत बऱ्याच मार्सेलसचा बळीचा बकरा जात राहील. मार्सेलसच्या मेंदुतील न्युरॉन्सने, राणीमुंगीने सांगितलेल्या “बळीचा बकऱ्या”चे विश्लेषण करुन, त्याला सांगितलं. मार्सेलस आणखी अस्वस्थ झाला.
“इतका अस्वस्थ होऊ नकोस,” मेंदू म्हणाला.
“मग?”
“मंगळाच्या नजिक पोहचण्याआधी यानाची दिशा बदलव नि निघून जा, या आकाशगंगेच्या पलिकडे आणि शोध घे एखाद्या नव्या ग्रहाचा. अस्वस्थ आणि दु:खी राहण्यापेक्षा हा वेडेपणा कदाचित, शहाणपणाच ठरेल, तुझ्यासाठी नि भविष्यातील मार्सेलससाठी किंवा कदाचित राणीमुंगी आणि तिच्या प्रजाजनासाठीसुध्दा. मेंदूने त्याला समजावलं. मार्सेलस हलकेच हसला.
“थँक्स राणीमुंगी”, असं डोळयापुढे तिचं चित्र आणत पुटपुटला…
सुरेश वांदिले
७०१,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप,सेक्टर सहा,कांदिवली पश्चिम,मुंबई ४०००६७,
९३२४९७३९४७