बाप्पा जरा चिंतेत दिसले. तेजोमयीनं ते ओळखलं.
बाप्पा कसली काळजी करता तुम्ही, तेजोमयीनं विचारलं.
तुला काहीच काळजी वाटत नाही.
कशाची बाप्पा. तेजोमयीनं उलट प्रश्न केला.
मी काल टीव्हीत बघितलं.
काय ते..
अगं पाण्याचं..
पाण्याचं काय,
आपल्यासाठी जे नळातून पाणी येतय ना.. त्या तलावात यंदा खूप कमी पाणी शिल्लक उरलय..
मग.. त्यामुळे आपल्याला कमी पाणी मिळणार..
हो का..
अगं असं टीव्हीवाल्यानं सांगितलय ना..
मला माहीतच नाही हो बाप्पा…
म्हणूनच मला चिंता वाटतेय..अगं आता पुढचा पावसाळा येईपर्यंत पाणी असचं मिळत राहणार. त्यामुळे पाण्याचा वापर सुध्दा काळजीपूर्वक करावा लागणार.. आपल्या घरी पाण्याचा मुक्त वापर दिसतो मला. सकाळी उठल्यावर चूळ भरायची म्हंटल तरी फूल्ल नळ लावतो नि दोन मिनटं तसच पाणी वाहून जातं..बरोबर की नाही..
होय बाप्पा..
तुझे बाबा तर दाढी करण्याच्या वेळेला फूल्ल नळ सुरु ठेवतात. मी अनेकदा बघितलय..बरोबर की नाही..
बरोबर बाप्पा..
अगं या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. पण यामुळे दररोज किती पाणी वाया जातं हे तुमच्या लक्षात येतच नाही. तलावातलं पाणी संपलं तर मग आणायचं कुठून..म्हणून पाण्याचा जपून वापर करायला आता तरी शिकायला हवं बाळ तुम्ही.. तुम्हाला या सा-या गोष्टी माहीत असूनही त्या कळत नाही ना ,याचीच मला चिंता वाटते. बाप्पा म्हणाले.
बाप्पांच्या सांगण्यात तथ्य असल्याने तेजोमयीला काहीच बोलता आलं नाही.
000
सकाळची सातची वेळ. तेजोमयीच्या घरी सकाळची लगबग सुरु झालेली. बाबा पेपर वाचत बसलेले. अभ्यास आता सुरु करावा की नंतर या विचारात तेजोमयी गढलेली. नळाचं पाणी ड्रममध्ये भरण्यात आई गुंग झालेली. बाप्पाचं लक्ष या सर्व हालचालींकडे.
आईचा ड्रम भरुन झाला. नळ लवकर जाणार म्हणून आईने घरातील दोन-तीन छोटे ड्रम भरुन घेतले. बाथरुममधील सर्व बादल्या भरुन घेतल्या. पाणी साठवण्याचे सर्व भांडी भरल्यामुळे आईचा चेहरा समाधानाने आनंदून गेला.
बाबांची आंघोळीची वेळ झाली. आईने पाणी गरम केलं होतं. बाबा बाथरुममध्ये बादली आणायला गेले. सर्व बादल्या पाण्याने पूर्ण भरलेल्या. काय करायचं आता, बाबांना प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तर बाबांना पटकन सापडलं. त्यांनी बादलीतल पूर्ण पाणी खाली ओतलं. बाप्पाचं लक्ष याकडे होतचं..आंघोळ झाल्यावर बाबांनी बादली नळाच्या पाण्याने भरुन ठेवली.
बाबानतंर तेजोमयीची आंघोळीची पाळी होती. बाबांनी जे थोड्यावेळापूर्वी केलं तेच तेजोमयीनं केलं. भरलेली बादली खाली ओतली. आंघोळ झाल्यावर पुन्हा भरुन ठेवली.. तेजोमयी आणि बाबांची ही कृती बघून बाप्पांनी कप्पाळावर हात मारुन घेतला.
000
मनुष्य प्राणी अजबच म्हणायचा. बाप्पा स्वत:लाच म्हणाले. आपण इतकं समजावलं तरीही तेजोमयी आणि तिच्या बाबांना पाण्याचं महत्व पटलं नाही. किती सहजतेनं बादलीभर पाणी दोघांनीही उबडलं.
घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे तेजोमयीच्या कॉलनीत सर्वत्र असचं घडत असणार. म्हणजे याचा अर्थ दररोज किती पाणी वाया जात असेल, बाप्पांनी स्वत:लाच प्रश्न केला.
मनुष्य प्राणी असा कां विचित्र वागतो. पाऊस कमी पडला म्हणून तलावात पाणी कमी साठलं, हे खरं असलं तरी या समस्येचा जनक हा मानवच नाही का?प्रदूषण वाढवलं.झाडांची वारेमाप कत्तल केली. समुद्राला हटवलं.नद्या दूषित केल्या.इतर पशुपक्ष्यांचा जीव धोक्यात आणला.
आकाशात खूप उपग्रह सोडले. पृथ्वीचं तापमान वाढत चाललं. या सर्वांचा एकत्रित परिणाम पाऊस कमी पडण्यात झाला.
हे मानवाला कळत कसं नाही. मुळचा हुषार ना. तरीही तो असा कां विचित्र वागतो.
पाण्याचं संकट स्वत:च निर्माण केलय..त्यावर मात करायचं सोडून ते संकट आणखी वाढेल असंच तो वागतोय..मानवाची त-हाच न्यारी .. बाप्पा मनात म्हणाले.
त्यांनी विचार करणं सोडून दिलं आणि डोळे मिटून घेतले.
सुरेश वांदिले