(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

बाप्पांच्या गायब होण्याचं रहस्य !

तेजोमयीच्या कॉलनीतले बाप्पा गायब झाले नि सगळीकडे खळबळ उडाली. बाप्पा यंदा धुमडाक्यात आले नसले तरी कॉलनीतल्या लोकांचा उत्साह गेल्यावर्षी सारखाच होता. मग बाप्पा असे अचानक कां बरे गायब झाले असावेत, असा सगळयांनाच प्रश्न पडला. ते गायब झाले की त्यांना कुणी पळवून नेलं की ते मुंबई दर्शनाला गेले नि रस्ताच चुकले, अशी चर्चा कॉलनीत सुरु झाली. तेजोमयी आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी याचा छडा लावायचा असं ठरवलं.

पण आपण कसं शोधणार बाप्पांना. समीर म्हणाला…

पोलिसात जाऊयात का, कल्याणी म्हणाली.

पोलीस बाप्पांना हसले तर.

ते कां हसतील.

बाप्पा एवढे शक्तिमान, मग त्यांना कोण पळवून नेणार.

पळवून नेणाऱ्याचा ते कपाळमोक्षच नाही का करणार.

ते सुध्दा बरोबरच आहे म्हणा…

समजा ते मुंबई दर्शनाला गेले असतील तरह ते रस्ता चुकूच शकत नाही. ते मुषक स्वामींवर स्वार होऊन भ्रंमती करतील. मुषक स्वामींचे नातेवाईक अत्र-तत्र-सर्वत्र आहेत. ते मूकष स्वामीला रस्ता चुकूच देणार नाहीत.

म्हणजे या मुद्द्यावरसुध्दा पोलीस काका आपल्याला हसणार.

इकडे आड तिकडे विहीर यालाच तर म्हणत नसावे ना रे...विनोद म्हणाला.

बाप्पा, आडात जाऊ दे नाही तर विहिरीत, आपण त्यांना शोधून काढायचं म्हणजे काढायचच.

वेड्यांनो, आपण पुन्हा मूळपदावरच आलो. एखाद्याला शोधण्यासाठी काहीतरी धागादोरा हवा की नाही…

तेजोमयी आणि तिच्या मित्र-मैत्रिणींची अशी चर्चा खूप वेळ सुरु होती. पण कुणालाच काही सुचत नव्हत. बाप्पा मंडपात नसल्याने मंडप ओकाबोका वाटत होता.

हे बघा असं हवालदील होऊन सुध्दा चालायचं नाही. प्रयत्नांती बाप्पा म्हणून आपण बाप्पांचा शोध घेऊ या. तेजोमयी म्हणाली.

प्रत्येकाच्या मनात एक गुप्तहेर असतो, असं जेम्स बाँड म्हणाल्याचं मी कुठेतरी वाचल होतं. एखादं काही हरवलं तर ते शोधण्यासाठी पहिला प्रयत्न हा जवळपासच्या परिसरात करायचा, हा जेम्स बाँडचा पहिला नियम. या नियमानुसार आपण आधी इथेच बाप्पांचा शोध घेऊ. कल्याणी म्हणाली. तेजोमयीने तिला दुजोरा दिला.

चला तर मग आधी आपण या मंडपास एक फेरी मारु. तिघांनी डावीकडून फेरी मारा आणि चौघांनी उजवीकडून मारा. एक-दोन चक्कर झाल्या की काहीतरी आपल्या हाती नक्कीच गवसेल, समीर म्हणाला.

असं ठरलं आणि त्याप्रमाणे तेजोमयी, कल्याणी, वैष्णवी डावीकडून उजीवकडे आणि विनोद, समिर, टिल्लू,प्रदीप यांनी उजवीकडून डावीकडे मंडपास फेरी मारण्याचे ठरले. विनोद धावत धावत घरी गेला आणि त्याने भिंग आणला. वैष्णवी टॉर्च घेऊन आली. दोन्ही टोळ्या अगदी हलक्या पावलांनी मंडपाभोवती फेरी मारु लागल्या. तीन वेळा फेरी मारुनही कोणताही धागादोरा किंवा एखादी लहानशीही खूण मिळाली नाही. मंडपाच्या पाठीमागे जराशीही फट दिसत नव्हती.

दोन्ही टोळयांच्या हाती काहीच गवसले नाही. अखेरीस कंटाळून त्या पुन्हा मंडपाच्या दर्शनी भागात ठेवलेल्या बाकड्यावर येऊन बसल्या. काहीक्षण कुणीच काही बोललं नाही. इकडे तिकडे मान वळवून बघत असताना तेजोमयीचं लक्ष मुषकस्वामींकडे गेलं आणि ती जोराने ओरडली.

अरे हे बघा मूषकस्वामी इथेच आहेत.

मघाशी ते नव्हते का, कल्याणीनं विचारलं.

आपण त्याकडे लक्ष दिलंच नाही.

यालाच म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा..विनोद म्हणाला.

अरे, बस झालं तुझं म्हणींचं आणि वाक्प्रचारांचं महाज्ञान. समीर चिडून म्हणाला.

मूषकस्वामी इथेच आहेत याचा अर्थ तुम्हाला कळतोय का दोस्तांनो, बाप्पासुध्दा इथेच कुठेतरी आहेत, तेजोमयी म्हणाली.

खरच की रे, आपल्या लक्षातच आलं नाही हे. मुषकस्वामींशिवाय बाप्पा गायब होऊ शकत नाही. कल्याणी म्हणाली.

कां गायब होऊ शकत नाही. असा आवाज मंडपात घुमला त्याबरोबर सर्वांनी एकमेकांकडे चमकून बघितलं.

असं कोण म्हणालं. प्रत्येकानं विचारलं. आपण तर नाही बुवा, प्रत्येकजण एकमेकांना म्हणाला.

आँ..मग कोण म्हणालं.

मूषकस्वामी तर नाही ना? आपल्याशिवाय तेच इथे आहेत.

मुलांनो तुम्ही बरोबर ओळखलत. मूषकस्वामी म्हणाले. सगळयांनी मूषक स्वामीकडे मोर्चा वळवला.

तुम्हास बोलता पण येतं. वैष्णवीनं विचारलं.

अगं हे काय विचारणं झालां. बाप्पांच्या मूषकस्वामीस काहीच अशक्य नाही. विनोद म्हणाला.

यावर मूषकस्वामी खोखो हसले. त्यांची अणुचिकदार दंतपंक्ती बघून समीर घाबरला तर त्यांची हलणारी मिशी बघून विनोदला हसू आलं. तेजोमयी आणि कल्याणी लगबगीने मूषकस्वामींजवळ पोहचल्या.

स्वामी स्वामी, बाप्पा कुठाय तुम्हाला ठाऊकाय आहे? कल्याणीनं विचारलं.

नक्कीच ठाऊकाय.

मग आम्हाला सांगाना लवकर. सगळे कसे घाबरुन गेले आहेत.

तुम्हाला घाबरायला सुध्दा होतं, मूषकस्वामींनी आश्चर्यानं विचारलं.

म्हणजे हो काय मूषकस्वामी.

तुम्ही कोरोनाला घाबरत नाही ना, म्हणून विचारलं.

तुम्हाला कुणी सांगितलं असं..

सांगायला कशाला हवं…तुमच्या एकाच्याही चेहऱ्यावर मुखपट्टी नाही. मूषक स्वामी म्हणाले. तेव्हा सर्वांनी चमकून आपल्या तोंडाकडे हात नेला. एमकेकांकडे बघितलं. एकानेही मुखपट्टी लावली नव्हती. घराबाहेर पडताना एकाच्याही आईबाबांनी त्यांना याविषयी जरासुध्दा टोकलं नव्हतं. मूषकस्वामींच्या बोलण्यावर सर्वांची मान खाली गेली.

आता कां बरं अशी मान खाली घालता. मूषकस्वामींनी विचारलं..

तुमची वडीलधारी मंडळीही अशीच वागतात. बाप्पांजवळचा पूजारी काल मुखपट्टी न लावता जोरजोरात आरती म्हणत होता. त्याच्या तोंडातून इकडेतिकडे थुंकी उडत होती. मंडपात तुम्ही सर्वांनी नाही नाही म्हणता गर्दी केलीच. काहींनी बरोबर मुखपट्टी लावली होती. काहींची मुखपट्टी नाकखाली होती. काहींची फक्त गळयात अडकली होती. कुणी कुठेही हात लावत होतं, बोटं लावत होतं. एखाद दुसऱ्याला शिंक आली तरी त्याला तोंडावर हात अथवा रुमाल ठेवावा वाटला नाही…बरोबर की मी चुकीचं बोलतोय. मूषकस्वामी कल्याणीकडे वळत म्हणाले.

मूषकस्वामींनी जे काही सांगितलं ते खरच होतं. पण त्याचा आणि बाप्पांचा गायब होण्याचा काय संबंध असावा, असा प्रश्न तेजोमयीच्या मनात आला. हे ती विचारणार तोच मूषक स्वामीच म्हणाले,

 मला कळलय तुला काय विचारायचय ते. या  सर्वांचा बाप्पांशी काय संबंध,असच ना. सांगतो..तुमचं असं वागणं बघून बाप्पा घाबरले..

काय सांगता..विनोद आ वासून बोलला.

खरच सांगतो. घाबरुन ते तडक आपल्या मातोश्रींकडे गेले…

आँ..

होय ते गेले…

कशासाठी हे तुला सांगितलं असेलच

ते त्यांच्याआईकडून दहा बारा मुखपट्या घेऊन येणार आहेत माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी.

आँ..

खरच सांगतोय…अद्याप काही पूर्णपणे करोना नाही ना गेलाय. त्यांना नाही पडायचय कोरोनाला बळी. पुढच्यावर्षी सुध्दा माझ्यासह आनंदानं, उत्साहान यायचना. तुम्हाला त्यांची काळजी नसली म्हणून काय झालं.स्वत:ची काळजी स्वत:च घ्यायची असते..हे त्यांना लगेच कळलं नि म्हणून ते आईकडे गेले, मुखपट्टी आणायला…एव्हाना येतील सुध्दा..

ऑ…

मूषक स्वामींच्या रुपाने सोनारानं कान टोचल्यासारखं झालं. आपली आणि आपल्या वडिलधाऱ्यांची काय चूक होतेय हे तेजोमयीच्या आणि तिच्या मित्रमैत्रिणींच्या लक्षात आलं. ही चूक दुरुस्त करण्याचं आश्वासन त्यांनी मूषकस्वामीला दिलं आणि त्यांना दंडवत घातला…

सुरेश वांदिले

०००