(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

बाप्पांच्या हाती बॅट

बाप्पांच्या हाती बॅट बघून तेजोमीस आश्चर्य वाटलं.

बाप्पा तुम्ही आणि बॅट..तेजोमयीनं विचारलं.

कां बरं,मला क्रिकेट खेळता येणार नाही,असं वाटतं की काय तुला?बाप्पांनी विचारलं.

तसं नाही हो बाप्पा..क्रिकेटची बॅट सचीन तेंडुलकरच्या हाती शोभून दिसते ना..

तशी माझ्या हाती शोभत नाही,असं तुला म्हणायच तर नाही ना..

तसं नाही हो बाप्पा,पण..सूर्य एकच असतो. असंच काहीसं मला सांगायचय..

अगं, बाळ आपण सूर्याची पूजा करतो की नाही…

होय करतो ना..

तशी सचीनची करायची..

म्हणजे त्याची आरतीबिरती ओवाळायची का बाप्पा..

अगं भवाने,मला माहीत होतं तू मला शब्दात पकडशील म्हणून..

चुकलं असेल तर सॉरी बाप्पा..

अगं बाई,सचिनची पूजा करणं त्याचा आदर्श ठेवणं,

अगदी बरोबर..

काय बरोबर ,ते सांग बघू..

सातत्यानं परीश्रम करणं, एकाग्रता, धेय्याच्या प्रति निष्ठा, अजिबात कंटाळा न करणं, सराव आणि सराव करणं, सतत शिकत राहणं, चुकाच होऊ न देणं, झालेली चूक दुरुस्त करणं, पुन्हा त्या चुकीची पुनरावृत्ती न करणं, नम्रता, वडिलधाऱ्यांचा आदर आणि सन्मान, गर्वानं फुलून न जाणं, अपयशानं निराश न होणं,यशानं हुरळून न जाणं, सर्वांना मदत करणं,हे सारे गुण सचिन तेंडुलकरमध्ये आढळतात.

अगदी बरोबर बाळ, सचिन तेंडुलकर हा तुमच्यासारखाच.पण त्याने अव्दितीय यश मिळवलं. असं यश तुम्हालाही मिळवता येऊ शकतं. बाप्पांनी तेजोमयीस समजावून सांगितलं

पण बाप्पा, सचिन तुमची मनोभावे पूजा करतो म्हणून तुम्ही त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला यशस्वी केलं ना..

अगं बाई, तो माझी पूजा करतो म्हणून मी त्याच्यावर प्रसन्न होतो हे जरी खरं असलं तरी एवढ्यानं काही यश मिळत नाही. तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवता.

म्हणजे हो काय बाप्पा..

सचिन तेंडुलकर यशाच्या शिखरावर विराजमान झाल्याचं तुम्हाला दिसतं. पण,त्यासाठी त्याने २५ वर्षे मेहनत घेतली. अखंड परीश्रम केले, याकडे लक्ष द्याल की नाही..परीश्रम आणि निष्ठेला जेव्हा पूजेची जोड मिळते तेव्हा कुठे यश मिळतं. केवळ मंदिरात जाऊन, मला नारळ ओवाळून, दुर्वा वाहून नाही,घरी दहा दिवस माझी स्थापना करुन नव्हे, बरं का?

कळलं बरं का बाप्पा मला, तुम्हाला काय सांगायचय ते..तेजोमयी म्हणाली…

सुरेश वांदिले