(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बाप्पा आणि तेजोमयीची मस्त गट्टी आहे.संधी मिळताच ते फिरायला जातात.मस्त इकडे तिकडे बागडतात.धम्माल करतात.कट्टयावर बसून बराच वेळ ते गप्पा टप्पा करतात..बाप्पा तिला देवलोकातल्या गोष्टी सांगतात.तेजोमयीही त्यांना शाळेतल्या गमती जमती सांगते..बाप्पा तिच्यासाठी हमखास उकडीचे मोदक घेऊन येतात.तेजोमयी त्यांना कॅडबरी देते.दीड दोन तास मनसोक्त गप्पा झाल्यावर बाप्पा तेजोमयीचा निरोप घेतात…तर असच परवा बाप्पा तेजोमयीला भेटायला आले.

    त्यांनी तेजोमयीला हाय केलं.

   हॅल्लो,बाप्पा तुम्ही किती दिवसानंंतर आलात हो.तुमची खूप खूप आठवण येते मला.. तेजोमयी आनंदून म्हणाली.

   दोघांच्या गप्पा सुरु झाल्या.

   अगं तेजू कसा चाललाय तुझा अभ्यास.

   मस्त..झक्कास बाप्पा.आज तुम्ही माझ्या अभ्यासाची विचारपूस करण्यासाठी आला आहात..वंडरफूल.

   ते तर कारण आहेच म्हणा.शिवाय..

   शिवाय काय?

   आज सकाळी मी तुझं गणपतीअथर्वशीर्ष काळजीपूर्वक एैकलं.

   कसं वाटलं?मस्त म्हणते ना मी..

   हा मोदक घे आधी,मग मी तुला सांगतो.असं म्हणून बाप्पांनी तेजोमयीला मोदक दिला.तेजोमयीने तो खाल्ला.

   मोदक एकदम फंटास्टिक हं बाप्पा.कुठून आणता हो इतके चवदार मोदक..तेजोमयीनं विचारलं.

   अगं,माझी आईच करते ना..तिच्यासारखे मोदक आख्ख्या देवलोकात कुण्णीसुध्दा बनवत नाही..ते जाऊ दे मी आणेलेले मोदक फंटास्टिक असतात असं तू म्हणालीस..त्याबद्यल तुझा आभारी आहे पण तुझं अथर्वशीर्ष मात्र फंटास्टिक नसतं हं तेजू.

   काय झालं?तेजोमयीनं घाबरुन विचारलं.

   अगं,तू हे स्तोत्र तोंडातल्या तोंडात पुटपुटतेस.त्यामुळे काही ओळी आणि बऱ्याच ओळीतले शब्दही खाऊन टाकतेस,,उच्चार सुध्दा शुध्द नसतात.अथर्वशीर्ष म्हणण्यास गुण द्यायचे असते तर मी तुला शंभरपैकी पस्तीस गुण दिले असते,म्हणजे तू अगदी काठावर पास झाली असतीस.बाप्पा म्हणाले.

   खरं की काय बाप्पा..तेजोमयी म्हणाली.

   होय तेजू..अगं बाप्पा काय किंवा महादेव काय,भगवान विष्णू काय,बजरंगबली काय,सरस्वती देवी काय,दुर्गामाता काय ,,कोणताही देव किंवा देवी तुम्हाला प्रार्थना करा,नमस्कार करा,पोथी वाचा हे सांगतात का?

   नाही.

   मग,तुम्ही जी काही प्रार्थना करता,श्लोक म्हणता,ते काळजीपूर्वक स्वच्छ वाणिने,अचुक म्हणायला हवं की नाह?आई बाबा सांगतात वा आग्रह धरतात म्हणून कंटाळा करत ,काहीतरी उपचार म्हणून कां बरं म्हणायचं?ंकरायचं ते मनापासून आणि आनंदानं.. अचुक आणि स्पष्ट गणपती अथर्वशीर्ष म्हण.तुला किती आनंद मिळतो ते बघ..करशील ना असं?

   होय बाप्पा.तेजोयमयी म्हणाली.बाप्पांनी तिला आणखी एक मोदक दिला नि ते अंतर्धान पावले.

000

   दुसऱ्या दिवशी सकाळी तेजोमयी देवघरात गेली.त्यावेळी तिला बाप्पांनी गणपती अथर्वशीर्ष म्हणतानाची चूक लक्षात आणून दिली हे आठवलं.त्याचं तिला तेव्हढं वाईट वाटलं नाही.पण बाप्पा आपल्याला रागावले याचं मात्र तिला खूप वाईट वाटलं. मीच कां?..तिने थेट बाप्पांच्या डोळयांना डोळा भिडवत विचारलं..बाप्पांनी डोळे मिटले.बाप्पांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही..

   000

   देवघरातली तेजोमयीची बडबड एैकून तिची मम्मी देवघरात आली.देवाची पूजा  करताना असं कुणाशीही बोलत जाऊ नकोस असं हज्जारदा सांगितलं गधडीला,पण एैकेल तेव्हा नाअसं मम्मी मनात म्हणाली.तिला तेजोमयीला चांगलच रागवायच होतं.पण देवघरात तर तिच्याशिवाय कुणीच नव्हतं.

    काय गं,कुणाशी बोलत होतीस तू..थोड्या चढ्या आवाजात मम्मीने विचारलं.

   कुणाशीच नाही.तेजोमयी म्हणाली.

   मग मला बोलण्याचा आवाज कसा आला?

   कारण ती माझ्यासोबत बोलत होती.देवघरातले बाप्पा म्हणाले.

   म्हणजे बाप्पा तुम्ही?.तेजोमयीच्या आईनं आश्चर्यानं विचारलं.

   होय मीच.तेजोमयीशी बऱ्याच वेळेला गप्पाटप्पा करत असतो .

   मला हे ठाऊकच नव्हतं बाप्पा..मम्मी म्हणाली.

   आता तेजोमयीचं बोलणं एैकून तुम्ही आल्यात ते बरं झालं.बाप्पा मम्मीला म्हणाले. .

   कां बरं काय झालं बाप्पा ,तेजोमयीचं काही चुकलं का?तसं काही असेल तर मी क्षमा मागते हं बाप्पा तिच्या वतिनं.मम्मी म्हणाली.

   तिच्या सर्व चुका मी लक्षात आणल्या आणि तिला मी रागावलो सुध्दा. तिने क्षमाही मागितली.

   बरं केलत हं बाप्पा तुम्ही.सध्या ती कुणाचच एैकत नाही.लक्षच नसतं तिचं घरात.अभ्यासात.कुणीतरी कान पिरगाळयलाच हवे होते तिचे..

   तुमचं तरी कुठं लक्ष असतं तेजोमयीकडे.. बाप्पा म्हणाले.

   क..क..काय म्हणता बाप्पा..मम्मी चमकलीच.तेजोमयीलाही आश्चर्य वाटलं.

   होयतुमचं कुठं लक्ष असतं ,सांगा बरं..तुम्हाला वाटलं आपण तेजूला अथर्वशीर्ष म्हणायला शिकवलं,प्रार्थना शिकवल्या,देवाला कसा नमस्कार करायचा हे शिकवलंउदबत्ती ,दिवा लावायला शिकवलं,काही वेळा हे सारं आपल्या समोर करुन घेतलं.संपली आपली जबाबदारी.

   नाही म्हणजे बाप्पा तस म्हणजे..मम्मी त त प प करायला लागली हे बघून तेजोमयीला हसू फुटत होतं.पण तिने ते मोठ्या मुश्किलने दाबून ठेवलं.

   अहो असं त त प प करु नका..तेजोमयी नीट प्रार्थना म्हणते की नाही,अथर्वशीर्ष म्हणताना तिचं ध्यान जागेवर असतं का,शब्दोच्चार बरोबर करते का?हे बघितलं का कधी.एकदा सांगितलं.. दुसऱ्यांदा लक्ष दिलं की तुम्हाला वाटलं संपल आपलं काम..

   नाही म्हणजे..

   म्हणजे होच असं तुम्हाला म्हणायच..आपली चूक कबूल करण्यानं नुकसान होत नसतं.तुम्ही लक्ष दिलं असतं तर आता तेजोमयी प्रार्थना म्हणताना ज्या चुका करते,त्या झाल्या नसत्या नि मी तिला रागावलो नसतो..बरोबर की नाही..

   बरोबर..मग सांगा चूक कुणाची..

   म म माझी..मम्मी म्हणाली..

   तेजू तू विचारलस ना मघा  मीच काम्हणून..तूच नाही तर आता मम्मीसुध्दा..

   झाली ना फिट्टमफाट.

   बाप्पांचं आभार मानावे असं तेजोमयीला वाटलं पण मम्मी आपल्याला रागवेल म्हणून ती गप्प बसली.तिने फक्त थँक्स असं म्हणत ओठ हलवले.मम्मीला बाप्पा रागावले याचा तिला थोडा फार आनंद झाला होता.बाप्पांनी ते बरोबर ओळखलं.

   एवढं काही आनंदून जायची गरज नाही..मम्मीची कितीही चूक असली तरी खरी जबाबदारी तुझीच.आता तू चुकलीस,कंटाळा केलास तर तुला पोपट नाहीतर कावळाच करीन हं..बाप्पा म्हणाले आणि त्यांनी डोळे मिटले..

सुरेश वांदिले