परवा तेजोमयी आणि अलेक्झांडरसोबत बाबा भाजीपाल्याच्या बाजारात गेले होते . रस्त्यावरुन जात असताना, कडेला बसलेल्या कोळंबी विकणाऱ्या एका मावशीने, बाबांना हाक मारली. तेजोमयी आणि अलेक्झांडर थांबले. पण बाबांनी मावशीला प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे बघितलही नाही. तिने पुन्हा हाक मारली. पण बाबांनी पुन्हा दुर्लक्ष केलं नि ते पुढे जाऊ लागले. त्यांच्या मागे असलेल्या अलेक्झांडरने, मान वर करुन, ‘हे बाबांचं काय चाललय? ते मावशीकडे लक्ष कां देत नाही?’ अशा आशयाचे भाव चेहऱ्यावर आणून तेजोमयीकडे बघितलं. “काय माहीत?”, असं त्याच्याकडे बघत तेजोयमीने प्रतिक्रिया दिली. तिलाही बाबांचं हे वागणं खटकलच होतं.
बाबांच नेहमी सांगणं असायचं की, एखाद्या विक्रेत्याने बाजारात आपल्याला हाक मारली, माल बघण्याची विनंती केली, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नसतं. आपल्याजवळचा माल घ्यावा, अशी जरी दुकानदाराची अपेक्षा असली तरी, तो माल घेतलाच पाहिजे, याची काही जबरदस्ती करु शकत नाही. पटलं तर घ्यायचं. नाहीतर पुढे जायचं. पण दुकानदारांच्या हाकेकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना वाईट वाटू शकतं. हे छोटेछोटे विक्रेते श्रीमंत नसतात. त्यांचा चरितार्थ दिवसभराच्या विक्रीतून चालतो. त्यांच्या हाकेला दुर्लक्षून पुढे जाणं हा चांगला गुण नाही.
बाबांचं असं सांगणं त्याक्षणी तेजोमयीला आठवलं. तिला बाबांच्या वागण्याचं हसू आलं नि वाईटही वाटलं. ‘ही मोठी मंडळी सांगतात एक नि करतात दुसरं!’ असं ती मनात म्हणाली.
बाजारातील खरेदी झाल्यावर तिघेही घरी आले. घरात पाऊल टाकताच, तेजोमयीने बाबांना टोकलं…
“बाबा, तुम्ही आज नापास झालात? ”
“काय झालं? कोणती परीक्षा दिली होती त्यांनी. मला कसं माहीत नाही.” आईने विचारलं.
“मी नापास झालो म्हणजे काय झालं?” बाबांनी आश्चर्यचकित होत विचारलं.
“सांगरे अलेक्झू.” तेजोमयी अलेक्झांडरकडे वळून म्हणाली.
“म्हणजे ठोंब्यालाही तुम्ही नापास झाल्याचं ठाऊकाय म्हणायचं. माझ्यापासून कां बरं लपवून ठेवलित ही परीक्षा.” आई त्राग्याने म्हणाली.
“अगं कसली परीक्षाबिरीक्षा. तेजो काहीही बोलते.” बाबा नाराजी व्यक्त करत म्हणाले.
“अलेक्झू तूच सांग बघू.”तेजोमयी पुन्हा अलेक्झांडरला म्हणाली.
“तो काय सांगणार गधड्या.”
अलेक्झांडरला गधड्या म्हणताच आईचा पारा चढला. तिच्याशिवाय, अलेक्झांडरला कुणीही असं काही बोलू शकतं नव्हतं.
“अहो, त्याला कशाला गधड्या म्हणता. तेजो दोन दोनदा त्याची साक्ष काढते, याचा अर्थ, बाजारातच काहीतरी घडलं असलं पाहिजे.” आई नाराजी व्यक्त करत म्हणाली.
“अगं, पण बाजारात कुठली आलीय परीक्षा?”
“तेजो, तूच सांगबाई काय झालं ते.”
मग तेजोमयीने सगळा घटनाक्रम सांगितला.
“बाबा माझ्याकडून अपेक्षा करतात, स्वत: मात्र तसं वागत नाही. म्हणून परीक्षेत नापास झाल्याचं मी म्हणाले.”
आपण खूपच चुकिचं वागल्याचं बाबांच्या तत्काळ लक्षात आलं. ते खजिल झाले. काहीही न बोलता ते पुन्हा तडक बाजाराकडे निघाले. मात्र रस्त्याच्या कडेला बसलेल्या मघाच्या मावशीबाई काही त्यांना दिसल्या नाहीत. सगळया कोळंब्या नि पापलेट विक्री झाल्यामुळे त्या निघून गेल्या होत्या.
बाबांना दु:ख झालं. या दु:खातच ते घरी आले. त्यांचा पडलेला चेहरा बघून आईने विचारलं,
“भेटली का मावशी?” बाबांनी काय घडलं ते सांगितलं.
“अहो, मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणजे, बोलाचा भात नि बोलाची कढी नसते. आधी आपण तसं वागलं पाहिजे, तरच त्यांना त्याचं महत्व कळेलना. नाहीतर परीक्षेत नापास होण्याची पाळी अशीच वरेचवर येत राहणार.” आईनं बाबांना समजावलं.
तेजोमयी आणि अलेक्झांडरच्या डोक्यावर हात ठेऊन यापुढे संस्काराच्या परीक्षेत कधीच नापास होणार नाही, अशी शपथच बाबांनी घेतली. तेजोमयीच्या चेहऱ्यावर हसू आलं. हे बघून अलेक्झांडरनेही उड्या मारत त्याचा आनंद व्यक्त केला.
सुरेश वांदिले