तिची आई गायत्री यांना स्वत:च्या बालपणापासूनच यक्षगाण या नृत्य-नाट्य प्रकारातील गाण्यांची आवड होती. ती जेव्हा गायत्रींजींच्या पोटात होती, तेव्हाही त्या यक्षगाण करायच्या. तिचा जन्म झाल्यावर न्हाऊ-खाऊ घालताना गायत्रीजी तिला यक्षगाणातील गाणं ऐकवू लागल्या. ती ३ महिन्यांची असतानापासून तिला यक्षगाणातील गाण्यांची गोडी निर्माण झाली असावी. कारण काही क्षणासाठी गायत्रीजींनीं गाणं थांबवल की ती रडायला लागयाची. गाणं सुरु केलं की तिची कळी खुलायची.
बाळाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात, गायत्रीजींच्या तेव्हाच लक्षात आलं की हिचे पाय यक्षगाणात दिसतात. झालेही तसेच. तीन वर्षाची असतानाच तिने यक्षगाणाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. इतक्या लहान वयात यक्षगाण सादर करणारी ती सर्वात लहान व्यक्ती ठरली. त्यानंतर तिने मागे वळून बघितलं नाही. आतापावेतो भारतात ८००पेक्षा अधिक कार्यक्रम तिने केले आहेत.
यशगाण हा ५०० वर्षापूर्वीचा नृत्यनाट्य प्रकार आहे. तो कोस्टल (किनारपट्टीवरील)कर्नाटक या भागात अधिक प्रचलित आहे. यामध्ये रामायण, महाभारत अशा प्राचीन ग्रंथातील कथा नृत्यशैलित सादर केल्या जातात. या कथा सादर करताना, खूप मोठे मेकअप आणि प्रसंगानुरुप कपडे घालावे लागतात. तिने अगदीच लहानपणी अभिमन्यू, अंगद, लोहितश्व, वृशासेना आदी अनेक बहुपदरी भुमिका केल्या.
यक्षगाण हा समुह नृत्यप्रकार असला तरी ती बरेचदा यक्षगाण एकटीच सादर करते. त्यामुळे कथानकातील पात्रानुसार तिला मेकअप आणि पोशाख यात बदल करावा लागतो. हे अवघड काम ती अगदी लिलया करते. तिच्यातील वेगळ्या वैशिष्ट्यामंळे, यक्षगाणातील श्रेष्ठ कलावंत कोलागी यशवंत हेगडे आणि विद्यावाचस्पती उमाकांत भट यांच्यासमेवत एकत्र यक्षगाण सादर करण्याची संधी लहानवयातच तिला मिळाली.
दक्षिण कोस्टल कर्नाटकात यक्षगणाचा तेनकुटीट्टू तर उत्तर भागात बाडगुटिट्टू हे प्रकार लोकप्रिय आहे. ती या दोन्ही प्रकारात नृत्य नाट्य सादर करते. हे दोन्ही नाट्यप्रकार रात्रभरत चालतात.पण तिने या प्रकारांना एका तासात सादर करण्याची कला आत्मसात केली आहे. तिला यक्षगाणातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल आतापावेतो ४० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
यक्षगाण नृत्य-नाट्य प्रकाराच्या माध्यमातून जागतिक शांती, सहकार्य यांचा संदेश देण्याचा तिचा प्रयत्न असतो. तिच्या या प्रयत्नांना सर्वत्र मोठी कौतुकाची थाप मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीसुध्दा कलेतून सामाजिक संदेश देण्याच्या तिच्या प्रयत्नाचं मनसोक्त कौतुक केलं आहे.
यक्षगाण शिवाय तिला संगीत, नाटक, शेती आणि दुग्ध व्यवसायातही रस आहे. विज्ञानावर आधारित राष्ट्रीय नाट्स्पर्धेत तिने चांगलं यश मिळवलय.
आपल्या यशायचं श्रेय ती आईबाबाब आणि शिक्षकांना देते. सराव आणि सततचे कार्यक्रम यामुळे तिला नियमितपणे वर्गाला उपस्थित राहता येत नाही. पण तिचे शिक्षक तिला अतिरिक्त शिकवणी देऊन ही कसर भरुन काढतात. भविष्यात यक्षगाणातच डॉक्टरेट करण्याचं तिचं स्वप्नं आहे.
अशी ही तुलसी हेगडे. वय वर्षे १७. हल्ली मुक्काम कोस्टल कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिर्सी.
सुरेश वांदिले