
बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
अभियांत्रिकी आणि हार्डवेअरचा अभ्यासक्रम सोडून ज्या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्राचा अभ्यास करावयाचा आहे, त्यांच्यासाठी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बी.एस्सी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अभ्यासक्रम चालवणाऱ्या काही महत्वाच्या संस्था पुढील प्रमाणे आहेत –
(१) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड रिसर्च – पुणे.
गेल्या तीन – चार वर्षात या अभ्यासक्रमाच्या देशस्तरीय क्रमवारीत या संस्थेने आघाडी घेतली आहे. गेल्या ३५ वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम – अध्यापन – प्लेसमेंट-औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षण, या चार बाबी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाकडे आकर्षित करत असतात. आयटी उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन या संस्थेने डाटा सायन्स, नेटवर्किंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यासारखे स्पेशलयाझेशन पदवी स्तरावर सुरु केले आहे. शेवटच्या सत्रातील सहा महिने इंटर्नशीपसाठी राखीव ठेवले जातात. या संस्थेने पदव्युत्तर स्तरावरील म्हणजे एमसीए स्तरावरील अभ्यासक्रमात सिस्टिम सेक्युरिटी या विषयाचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणून करिअरच्या संधी मिळू शकतात.
जागतिक पातळीवर बदलत्या प्रवाहांची माहिती या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी संस्थेने असोशिएशन फॉर कॅाम्प्युटिंग मशिनरी, इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स, इन्फॉर्मेशन सिस्टिम्स ऑडिट ॲण्ड कन्ट्रोल असोशिएशन आणि इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस ॲनालिसीस या संस्थांसोबत सहकार्याचा करार केला आहे. जपान मधील रित्सूमैकन युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन कार्याची संधी संस्थेतील विद्यार्थींनींना विशेषत्वाने मिळवून दिली जाते. त्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
ओपन सोर्स टेक्नॉलॉजीचा स्वीकार करण्यामध्ये या संस्थेने देशात आघाडी घेतली आहे. संस्थेमध्ये अंतर्गत सॉफ्टवेअर डेव्हलमेंट सेल असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळे सॉफ्टेवअर तयार करण्याची संधी दिली जाते. संस्थेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना सातत्याने प्लेसमेंट मिळाले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सिम्बॉयसीस एन्ट्रन्स टेस्ट – एसईटी द्यावी लागते. ही कॉम्प्युटर बेस्ड अशी वस्तुनिष्ट पध्दतीची परीक्षा आहे. त्यासाठी www.set.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. ईमेल-info@set-test.org, दूरध्वनी-०२०-२८११६२२६,
(२) डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स – ख्रिस्त युनिव्हर्सिटी , बेंगळुरु
बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अभ्यासक्रमात या संस्थेचा अभ्यासक्रम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण समजला जातो. संधी कोणत्याही क्षणी येऊ शकते, त्यामुळे तयारीत राहा, असे या संस्थेचे ध्येय्य वाक्य आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची तयारी पहिल्या वर्षापासून केली जाते. संगणकीय अभ्यासक्रमाशी संबधित विविध कौशल्य व तंत्र विद्यार्थ्यांना प्रभावीरीत्या शिकवले जातात. या संस्थेतील बीसीए अभ्यासक्रमाची महती मोठी असल्याने देशातील विविध राज्यातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. अभ्यासक्रमाच्या मूलभूत बाबी स्वयंस्पष्ट होण्यावर या संस्थेत अत्याधिक भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या विषयाचा पाया मजबूत होण्यास सहाय्य होते. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर विविध प्रकारच्या बाबींमध्ये सक्रीय सहभागासाठी प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चौफेररीत्या विकसित व्हावे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहित केले जाते. आंतरविद्याशाखीय ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे व त्यांच्या वैचारिक क्षमतेला नवे धुमारे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातात. दुस-या वर्षामध्ये मानसशास्त्र, तांत्रिक इंग्रजी लेखन कौशल्य, वित्तीय ताळेबंदाचा अभ्यास अशासारख्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी त्यांच्या विविध जबाबदा-या टाकण्यात येतात. देशातील विविध इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला एक संशोधन प्रकल्प म्हणजेच रिसर्च प्रोजेक्ट दिला जातो. या प्रकल्पावर त्याला दर आठवडयात किमान तीन ते चार तास कार्य करावे लागते. तिस-या वर्षात विषयांची संपूर्ण स्पष्टता होते व निवडलेल्या क्षेत्रातील करिअरच्या संधी कोणत्या असू शकतात आणि त्या हस्तगत करण्यासाठी कोणत्या तंत्र कौशल्याला आधिकाधिक प्राप्त करावे लागते याची स्पष्टता होते. यादृष्टिने संस्थेचा प्लेसमेंट सेल मदत करतो. या संस्थेत एसएपी, कॉग्निजंट, इन्फोसीस, डीई शॉ ग्रुप, विप्रो अशा कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता व दर्जा लक्षात घेऊन त्यांना वार्षिक ९ लाख रुपये ते साडे चार लाख रुपयांच्या श्रेणित पॅकेज मिळू शकते. गेल्या काही वर्षापासून मोठ्या कंपन्याची गरज लक्षात घेऊन बिग डेटा आणि ॲनालिटीक्स या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक कार्याकडे वळावे यासाठी प्रेरित केले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पदव्युत्तर पदवीकडे वळतात आणि पीएचडीची दिशा निश्चित करतात. यामुळे त्यांना भविष्यात अधिक चांगल्या करिअर संधी मिळणे शक्य होते. या संस्थेतील विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरु करण्यासाठी प्रेरित करुन त्यांना योग्य ती मदत दिली जाते.
इतर संस्था
(३) लोयोला कॉलेज -चेन्नई, (४) स्टेला मॅरिस कॉलेज -चेन्नई, (५) ॲमिटी इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – नॉयडा, (६) क्रिस्तू जयंती कॉलेज बेंगळुरु, (७) वुमेन्स ख्रिश्चन कॉलेज – बेंगळुरु, (८) सेंट जोसेफ कॉलेज -बेंगळुरु, (९) मद्रास ख्रिश्चन कॉलेज – बेंगळुरू, (१०) गोस्वामी गणेश दत्त एस. डी. कॉलेज -चंदिगढ, (११) एमआयटी आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज – पुणे, (१२) सेंट मिरा कॉलेज फॉर गर्ल्स-पुणे, (१३) जगन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज-दिल्ली, (१४) प्रेसिडेंसी कॉलेज – बेंगळुरु, (१५) कन्या महाविद्यालय जालंदर, (१६) स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड आयटी – जैन , युनिव्हर्सिटी, बेंगळुरु, (१७) फॅकल्टी ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बनस्थली विद्यापीठ -जयपूर, (१७) डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी – कुरुक्षेत्र, (१८) इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज-नॉयडा, (१९) स्टेला मॅरीस कॉलेज – चेन्नई, (२०) झेवियर इंस्टिट्यूट ऑफ कॉप्युटर ॲप्लिकेशन -अहमदाबाद.