तो तेव्हा चार वर्षाचा होता. या वयातील मुले पहाटे गाढ झोपेत असतात. त्यांना परीराणीचं स्वप्न पडलं असतं. तिच्या पंखावर बसून ते ढगावर फिरुनबिरुन येतात, मस्त मौजमस्ती करतात नि झोपेतच खुदकन हसतात. पण त्याला असं स्वप्नात रममाण व्हायला मिळालच नाही. कारण पहाटेचे चार वाजले की त्याचे आईबाबा त्याला उठवत आणि घेऊन जात मैदानावर. पुढे तीन चार तास त्याचे बाबा त्याचा कसून सराव घेत. थंडी असो की उन, या सरावात काही खंड पडायचा नाही.
त्याच्यातील गुणवत्ता बघून त्याच्या वडिलांनी त्याला पुढे पाटण्यात मनीश ओझा जेननेक्स क्रिकेट ॲकॅडेमित टाकला. त्यावेळी तो आठ वर्षाचा होता. दर दिवसाआड ते त्याला समस्तीपूरपासून १०० किलोमीटर दूर असलेल्या पटण्यात घेऊन जात.
या खडतर सरावाचा परिणाम असा झाला की तो १२ वर्षाचा असतानाच, १९ वर्षाखालील विणू मंकड चषक सामन्यात बिहारकडून खेळण्याची संधी मिळाली. २०२३ साली १९ वर्षाखाली भारत ब टीमकडून तो एका चार देशीय मालिकेत खेळला. या मालिकेत सहा डावांमध्ये १७७ धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची कारकीर्द सुरु झाली तेव्हा त्याचं वय होत १२ वर्षे आणि २८४ दिवस. तो बिहार क्रिकेट संघाकडून मुंबई संघाविरुध्द रणजी चषक सामन्यात खेळला. तो, बिहारकडून खेळणारा दुसरा सर्वात लहान खेळाडू आणि रणजी सामन्यातील सर्वात कमी वयाचा चौथा खेळाडू ठरला.
तो १४ वर्षाचा होतच नाही तोच २०२५ मध्ये त्याला राजस्थान रॉयल्स या आयपीएल क्रिकेट संघात स्थान मिळालं. तेव्हा तो आयपीएल मधील सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला. त्याने पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स या संघाविरोधात अवघ्या ३८ चेंडूत १०१ धावा ठोकल्या. आयपीएल मध्ये इतक्या कमी चेंडूत शतक ठोकणारा तो सर्वात लहान आणि दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या या विक्रमाने भले भले चकित झाले.
सप्टेबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील टीम विरुध्द खेळताना एका चार दिवसीय सामन्यात त्याने ५८ धावात शतक ठोकले. इतक्या वेगाने असे शतक ठोकणारा या कॅटेगरीतला पहिला क्रिकेटपटू ठरला. २०२४ साली १९ वर्षाखालील एशिया चषक सामन्यांमध्ये त्याने ४४ च्या सरासरीसह १७६ धावा काढल्या. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याने एशिआ कप रायझिंग स्टार्स टी २० सामन्यात भारतीय अ संघाकडून खेळताना युनायटेड एमिरेट्स विरुध्द ४२ चेंडून १४४ धावा केल्या.
डिसेंबर २०२५ मध्ये विजय हजारे चषक सामन्यात त्याने अरुणाचल प्रदेश विरुध्द खेळताना ३६ धावात शतक ठोकून आणखी एका विक्रमांची नोंद केली. अ श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात जागतिक पातळीवर गतिने शतक ठोकणारा तो सर्वात लहान खेळाडू ठरला. या सामन्यात त्याने ५९ चेंडूत १५० धावा ठोकून एबी डी विलियर्सचा सर्वाधिक वेगवान १५० धावांचा विक्रम मोडला.
तर असा हा वैभव सूर्यवंशी, सध्या भारतीय क्रिकेट संघातील १९ वर्षाखालील टीमचा कप्तान. वय वर्षे १९. हल्ली मुक्काम पटणा.
सुरेश वांदिले