(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बेकर्स ते डेझर्ट स्पेशॅलिस्ट

हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज भासत असते. त्याचबरोबर या उद्योगासाठी इतर घटकांतील कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज अधिक असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. ही गरज भागवण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या, इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन या संस्थांनी काही अभ्यासक्रम सुरु केले आहेत. दिल्ली येथील कॅम्पस १९६२ साली उघडण्यात आलं. आतिथ्यसेवा उद्योगाला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या गरजांची पूर्तता करण्याचा हेतू ही संस्था स्थापन करण्यामागे होता. गेल्या ६ वर्षात या संस्थेने या क्षेत्रातील शिक्षण – प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी आपल्या देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.

अभ्यासक्रम

    () डिप्लोमा इन बेकरी ॲण्ड कन्फेक्शनरी- हा दीड वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. बेकरी उत्पादनाशी संबंधित विषयाचं सखोल ज्ञान या अभ्यासक्रमात दिलं जातं. यामध्ये (१) ब्रेडची निर्मिती, (२) पॅस्ट्रीची निर्मिती, (३) केक डेकोरेशन, (४) चॉकलेट डेकोरेशन या विषय घटकांचा समावेश आहे. शिवाय व्यवसाय/स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, संगणकीय ज्ञान प्रदान केले जाते.

दीड वर्षांपैकी एक वर्षं संस्थेत प्रशिक्षण दिलं जातं. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमासाठी चाळणी परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना (१) बेकर्स, (२) पॅस्ट्री शेफ, (३) चॉकलेटिअर्स, (४) डेझर्ट स्पेशॅलिस्ट अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

    () डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हेरेजेस सर्व्हिस – कालावधी दीड वर्षे.

काय शिकाल?

(१) अन्नपदार्थ आणि खाद्य-पेये सेवा क्षेत्रासाठी लागणारे तंत्र आणि कौशल्य, (२) अन्नपदार्थ सेवा, (३) विविध पेय सेवा, (४) अन्न आणि पेये नियंत्रण, (५) स्वच्छता आणि आरोग्य, (६) व्यवसाय संवादसंप्रेषण, (७) रेस्टॉरेंट व्यवस्थापन, (८) बार व्यवस्थापन आणि कार्यान्वयन या विषय घटकांचा समावेश आहे.

दीड वर्षांपैकी एक वर्षं संस्थेत प्रशिक्षण दिलं जातं. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण दिलं जातं. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या उमेदवाराने १२वीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेला असावा. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो.अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.

संपर्क –  इंस्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लायब्ररी अव्हेन्यू, पुसा कॉम्पलेक्स, नवी दिल्ली ११००१२, दूरध्वनी-  ०११ – २५८४१४११, ,संकेतस्थळ- www.ihmpusa.net, ईमेल- ihmpusa@rediffmail.com

०००