(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तीन दिवसांनी बाप्पांचं आगमन होणार म्हणून तेजोमयी खूष होती. आईबाबा करत असलेल्या बाप्पांच्या आगमनाच्या स्वागताच्या जय्यत तयारीला हातभार लावत होती. आपल्याला कुणीच काहीही करायला सांगत नाही, हे लक्षात आल्याने अलेक्झांडरची अधूनमधून लुडबूड सुरु होती. त्याच्या या लुडबुडीकडे अलेक्सा गोर्जी कौतुकाने बघत होती. इकडून तिकडे कधी जोराने तर कधी हळूवार शेपूट हलवत जाणाऱ्या अलेक्झांडरला तिने न राहवून अखेर टोकलेच,

“अलेक्झू, आईबाबा आणि तेजोची लगबग कशासाठी चाललीय तुला ठाऊकाय का?”

अलेक्झांडरने डोळे मोठे्ठे करुन, ‘हे काय विचारणं झालं?’ असे भाव चेहऱ्यावर आणत तिच्याकडे बघितलं. ‘तुला नाही का ठाऊक?’  असेही भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले.

       “नाही बाँ.”

       “हे तर गड्या फारच झालं.” अशा आशयाचं अलेक्झांडरने कुई कुई केलं.

“मग तूच सांग की” गोर्जीने त्याला विनंती केली.

अलेक्झांडरने तिच्यासमोर फतकल मारली. कधी कुईंकुईं करत, तर  कधी कान वर करत, कधी कान खाली करत, कधी उडी मारुन, तर कधी स्वत:भोवती गिरकी घेऊन सांगू लागला.

गोर्जी लक्षपूर्वक त्याचं सांगणं ऐकू लागली. घरातली कामं सुरु असताना तेजोमयीचं लक्षं दोघांकडे गेलं. त्‍यांच्याजवळ येऊन तिने टोकलं.

“गोर्जे, काय चाललय तुमचं दोघांचं असं गुपचूप गुपचूप.”

“गुपचूप कुठे तेजो? इतक्या उघडपणे अलेक्झांडर मला समजावून सांगतोयना.”

“काय समजावून सांगतोय?”

“हेच की, तुम्हा तिघांची कशासाठी लगबग चाललीच ते.”

“त्याने सांगितलेलं तुला कळलं का?”

“कळलं की.”

“त्याची भाषा तुला येते?”

“भाषा कशाला यायला हवी, भाव महत्वाचा.”

“काहीतरी बंडला मारु नकोस.”

“छे छे! मी कुठे बंडला मारतो”, या आशयाचे भाव डोळयात आणत तेजोमयीकडे अलेक्झांडरनं बघितलं.

“अगं, इतकी कामं पडली असताना, त्या दोघांशी काय गप्पा मारतेस.” आईने तेजोमयीस आवाज दिला.

“अगं, अलेक्झूला म्हणे, आपण काय करतोय हे ठाऊकाय, तो ते गोर्जीला सांगतोय नि ते तिलाही कळतय.” तेजोमयी तिरकसपणे म्हणाली. तिच्या बोलण्यातला उपहास जाणवल्याने आई आणि बाबा दोघेही या तिघांकडे आले. काय झालं, म्हणून आईने विचारलं. गोर्जीने सगळा घटनाक्रम सांगितला.

“आहेत की नाही दोघेही बंडलबाज.” तेजोमयी म्हणाली. यावर बाबांनी हसून गोर्जीला विचारलं,

“तुला काय कळलं गं, अलेक्झांडरने सांगितलेलं.”

“काहीच नाही.”

“बघा, आहे ना ही गोर्जी बंडलबाज आणि अलेक्झूसुध्दा.”

“भलतच काय बोलतेस?” आई तेजोमयीला रागावली. अलेक्झांडरने शेपूट हलवून आईला पाठिंबा दिला.

“अगं, तुला राग आलाचा तरी कशाचा?  त्या दोघांना कळत असेल एकमेकांचं.” बाबांनी तेजोमयीला समजावलं.

“अहो बाबा, गोर्जी म्हणाली, भाषा नाही तर भाव महत्वाचा. आता अलेक्झांडरचा कोणता भाव हिला महत्वाचा वाटला? बंडलबाज कुठली.” तेजोमयीने  तोंड वाकडं केलं.

“अगं, असं काही वेडवाकडं बोलण्याऐवजी गोर्जीला काय वाटतं, ते तर समजून घेना. गोर्जे, तुला अलेक्झांडरचा कसला भाव महत्वाचा वाटला?” बाबांनी विचारलं.

“अहो बाबा, अलेक्झांडर मला सांगत असताना, मी माहितीच्या महाजालात जाऊन बाप्पांची माहिती घेतली. बाप्पा इतके मोठे देव, शक्तीमान, प्रचंड बुध्दीमान, सगळया विद्यांमध्ये पारंगत. पण, तरीसुध्दा पिटुकल्या उंदरोबाकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्याचा सन्मान करतात. त्याचं सांगणं मनापासून ऐकतात. मग बाप्पांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण, नाही का?”

“बघा बघा, बाबा कशी गोलमगोल उत्तर देते ही.”तेजोमयी नाक फुगवत म्हणाली.

“अगं तेजो, गोर्जी सांगते ते खरंच आहे की. बाप्पांचे आपण अनेक गुण घेऊ शकतो. आदर्श ठेऊ शकतो. मुक्या प्राण्यांचाही सन्मान करा, त्यांची भाषा समजत नसली तरी त्यांच्या मनातील भाव समजून घ्या, असंच तर,  उंदरोबांना दरवर्षी सोबत आणून ते सांगतात ना.” आई म्हणाली.

‘अच्छा, असं आहे तर माझ्या सांगण्याचा नि गोर्जीच्या ऐकण्याचा अर्थ!’, अलेक्झांडरने आईचे बोलणं ऐकून आपली प्रतिक्रिया, असा भाव चेहऱ्यावर आणत नि शेपूट हलवत व्यक्त केली. ते बघून तेजोमयीला हसू आलं. तिने गोर्जीला सॉरी म्हंटलं. अलेक्झांडरच्या समोर बसून कान पकडले.

 सुरेश वांदिले