(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भिकपती
   श्रीमंत होणं कुणाला बरं आवडणार नाही.जे गरीब असतात त्यांना तर वाटतच वाटतं पण जे श्रीमंत असतात त्यांनाही आणखी श्रीमंत व्हावं वाटतं.मनाने श्रीमंत असण्याचा कालखंड कधीचाच अंतराळात अंतर्धान पावला.
   तुमचं समाजातलं वजन हे श्रीमंतीवर तोललं जातं.अमेरिकेत बार्न ऍ़ण्ड ब्राटअप झालेल्या कुत्र्याकडे आणि इथिओपिआतल्या कुत्र्याकडे जसं बघितलं जातं ना तसंच हे.किंवा बांद्रा पूर्व आणि बांद्रा पश्चिमेतील मांजरींकडे बघितले जातं तसं.
   जो तो आपआपल्या पध्दतीने श्रीमंत होण्याच्या मार्गावर नशिब अजमावत असतो.नशिब फळलं तर अहाहा आणि नाही फळलं तर अरेरे.हे सारं आठवायचं कारण,श्रीयुत डोनाल्ड ट्रम्प हे लेखक.हे अमेरिकेतील असले तरी श्रीमंतच आहेत असे नाही.महाराष्ट्रातील एखाद दुसरा श्रीमंत मऱ्हाठी लेखकासोबत रॉबर्ट यांची तुलना करावयाची झाल्यास,मराठी लेखक हा 200चौरसफुटाच्या किराणा मालाचा दुकानदार तर  रॉबर्ट हे20000 चौरस फुटाच्या डिपार्टमेंटल स्टोअरचे ओनर,असे करावे लागेल.असे असले तरी अमेरिकेतील चित्रपट स्टार्स,राजकारणी,खेळाडू,वॅव टॅव करणारे गायक यांच्या तुलनेत रॉबर्ट हे ठार गरिब.त्यांच्या तुलनेत दारिद्र्येरेषेखालीलच.त्यामुळेच त्यांनी एके दिवशी पहाटे पहाटे रेशमाची गाठ सैल करीत श्रीमंत होण्याचा निर्धार केला केला असावा.डॉन बणून श्रीमंत होण्याचा जवळचा पण रिस्की मार्ग त्यांच्या डोळयापुढे असू शकतो.पण डॉनला बंदूक चालवावी लागते.प्रसंगी एखाद्याची बकऱ्यासारखी मुंडकी उडवावी लागते.या दोन्ही गोष्टींचे शिक्षण प्रशिक्षण  कधीच मिळाल्याने जे जमू शकतं तेच करावं या भारतीय तत्वज्ञानानुसार डोनाल्ड यांनी लेखनीच चालवण्याचं ठरवलं असावं.
   शब्दांचा ढिग कसाही पाडता येतो.डोनाल्ड यांनी मग पुस्तक लिहायलं घेतलं.विषय निवडला श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली.इंडियन ऑयडल मधल्या एखाद्या गायिकेने सूर असा नाही तर तसा आळवायचा असतो असं आशाताईंना सांगण्यासारखचं किंवा डान्स इंडिया डान्स मधील फायनलिस्टने माधुरी दीक्षितांना नृत्याचे स्टेप्स शिकवण्यासारखं किंवा कांढळी बुद्रुकच्या सरपंचाने श्रीयुत बराक ओबामा यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धडे देण्यासारखंच हे आहे.पण जगात ज्यांना जे जमत नाही ते इतरांना उत्तमउत्कृष्टअत्युकृष्ट करता यावे असे मौलिक सल्ले देणाऱ्या अशा फुकट फौजदांची संख्या कमी नाही. तब्येत कशी उत्तम राखावी असं सांगणारा मात्र अनंत आजारांनी ग्रस्त असतो.सुखी संसाराचे धडे देणाऱ्यांचा संसारच सुरु झाला नसतो किंवा त्याला ब्रेक लागला असतो.पॉझिटिव्ह थिंकिंगचे क्लासेस घेणाऱ्याला निगेटिव्ह विचारांनी घेरुन टाकलेला असतो.परमेश्वराच्या शोध घेण्यासाठी मार्ग दाखवण्याचा दावा करणाऱ्या गुरुबाबामहाराजबुवा यांना तो मार्ग डावीकडचा की उजवीकडचा हे त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत कळतच नाही.योगसाधनेचे पन्नास फायदे समजावून सांगणाऱ्यांना पाच आसनही धड येत नाहीत.नाट्यसमिक्षकांना उत्तम नाटक आणि चित्रपट समिक्षकांना हिट चित्रपट देता येत नाही.तसं या मागदर्शकांचं असतं.पण ही मंडळी त्यांना जमणाऱ्या गोष्टी इतरांसाठी ठासून आणि ठोकून सांगण्यात तरबेज असतात.डोनाल्ड यांचही तसचं.
   त्यांना श्रीमंत व्हायचं होतं.पण ते झाले नसावेत म्हणून त्यांनी इतरांनी श्रीमंत कसे व्हावे याची गुरुकिल्ली दाखवणारं,व्हाय यू वॉण्ट टू बी रिच या नावाचा चकचकित ग्रंथ लिहिला.भारतातील या ग्रंथाची किंमत 1250 रुपये.म्हणजे तुम्हा आम्हा पामरांसाठी अबाबा करायला लावणारी.एवढ्या किमतीची पुस्तक विकत घ्यायला आपल्याला पाच सहा वर्षं तरी नक्कीच लागतील.या पुस्तकांनं रॉबर्ट यांचं नशिब फळलं की नाही हे कळायला मार्ग नाही.जगात या पुस्तकाच्या किती आवृत्या निघाल्या हेही कळू शकेलेलं नाही.पण या पुस्तकाचं भारतातलं नशिब हे शनीच्या वक्री फेऱ्यात सापडल्याचं दिसते आहे.
   गेल्या काही दिवसांपासून 1250 रुपयांचं हे पुस्तक अवघ्या 100 रुपयांमध्ये विकण्यासाठी लोकलच्या प्रत्येक डब्यात 10-20 प्रती घेणाऱ्यांचे हाकारे कानी पडताहेत.पण प्रवाशांना श्रीमंत होण्यात किंवा हे पुस्तक वाचून श्रीमंत होण्यात इंटरेस्ट दिसत नाहीय.कारण कवडीमोल किंमतीतले पुस्तक घेण्यापेक्षा पन्नासाठ रुपयांचे दोन बर्गर नि 30 – 40 रुपयांची पेप्सी घेण्यासाठी पॉकिट मोकळं करणाऱ्यांना या पुस्तकाकडे बघावही वाटत नाही.देखनके पैसे लगते नही,अशी दिनवानी विनवनी करणाऱ्या त्या बिच्चाऱ्या विक्रेत्या मुलाची ही ऑफर सुध्दा कुणी स्वीकारायला तयार नाहीत.नशिब असं असतं. इतरांना लखपती करु पाहणारे हे पुस्तक मात्र भिकपती होण्याकडे वाटचाल करते आहे. रॉबर्ट यांना कदाचित हे ठाऊकही नसेल.आपल्या मौलिक ग्रंथांच्या दुर्दशेची ही दशा रॉबर्ट यांना कळली तर हिंदुस्थानच्या लोकांना अर्थशास्त्रच कळत नाही,त्यामुळे ते लखपती होऊ शकत नाही.यावरच एक ग्रंथ लिहून काढायचे.लखपती होण्याचा काळ कधीचाच गेला,आता भारतीयांना खोकापती व्हायचं असतं,हे कुठे त्या रॉबर्टला ठाऊकाय.हा..हा.हा..