(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ससोबासारखा भित्रोबा वननगरित शोधुनही सापडणार नाही, असं त्याला लहान-मोठे सर्व प्राणी चिडवत. या चिडवण्यामुळे ससोबाला सुध्दा आपण खरोखरच तसच आहोत असं वाटायला लागलं. त्यामुळे तो बिळाच्या बाहेरही पडेनासा झाला.

त्याचं हे घाबरेलपण एकदा त्याच्या बिळातील मुंगीच्या लक्षात आलं. ती त्याला समजावत म्हणाली,

“ससुल्या, कुणी चिडवलं म्हणून आपण खरोखरच भित्रं होत नाही. खरंतर अशांपासून दूरच राहायला हवं.”

“म्हणूनच तर मी बिळातून बाहेर पडत नाही.” ससोबा म्हणाला.

“ससुल्या, असं बिळात दडून काय होणार? बाहेर तर पडायलाच पाहिजे. सूर्यप्रकाश अंगावर पडला पाहिजे. खायला ताजं गवत पाहिजे. प्यायला पाणी पाहिजे. हे कुठं आहे तुझ्या बिळात? मुंगी म्हणाली.

“बापरे, याचा तर मी विचारच केला नव्हता. अशाने माझे प्राण जायचे.” ससोबा घाबरुन म्हणाला.

“म्हणूनच सांगते, बिळाच्या बाहेर पड.”

“अगं पण भीती…”ससोबा चाचरत म्हणाला.

“अरे, कसली भीती? मी इतकी इटुकली. पण तरी हत्तीला भिते का? “

“खरं की काय?”

“खरंच रे ससुल्या. तुला सर्वाधिक भीती कुणाची वाटते? मुंगीने विचारलं. काही क्षण विचार करुन ससोबा उत्तरला,

“सिंह महाराजांची.”

“मग त्यांच्याच पुढे जाऊन उभा राहना.”

“हे तर स्वत:हून आगीत लोटून दिल्या सारखं!”

“ससुल्या, माझी आजी सांगायची, की ज्याची सर्वाधिक भीती वाटते, तीच गोष्ट केली तर आपली भीती नष्ट होते नि आत्मविश्वासही वाढतो.”

“पण, महाराजांनी एकाच पंज्याने माझा खात्मा केला तर?”

“ते असच करतील हे कशावरुन? याला काहीच पुरावा नाही. म्हणून त्यांच्यासमोर जा. फक्त सावध राहा. सिंहमहाराज आपला घात करु शकतात, असं तुझ्या लक्षात आलच तर तू तिथून धूम झुडुपात पळ. तू इतक्या वेगाने पळू शकतोस की महाराजांना ते शक्यच होणार नाही.”

ससोबाला ते पटलं. त्याने सिंह महाराजांच्या पुढे जाऊन आपली भीती दूर करायचीच हा निर्धार केला. या निर्धाराने त्याला हायसं वाटलं नि तो निघाला पळतपळत महाराजांच्या गुहेकडे.

वाटेत काही प्राण्यांनी त्याला हटकलं. आपण सिंह महाराजांना भेटायला चालल्याचं त्याने जेव्हा या प्राण्यांना सांगितलं तेव्हा, त्यांनी त्याला मूर्खशिरोमणी ठरवलं. यालाच म्हणतात जीवावर उदार होणं, कोंबडोबा म्हणाला. कोंबडोबानं सगळीकडे ससोबा कसा सिंहाकडे निघालाय हे पसरवलं. त्याची फटफजिती बघण्यासाठी प्राणी महाराजांच्या गुहेजवळ जाऊन आडोशाला लपून बसले.

०००

इकडे ससोबा धावत धावत महाराजांच्या गुहेजवळ पोहचला. महाराज त्यावेळी गुहेच्या बाहेर डोळे मिटून येऊ उन खात बसले होते. ससोबा त्यांच्यासमोर येऊन उभा ठाकला तरी त्यांचं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं.

“महाराज सुप्रभात, ससोबा जोराने म्हणाला. महाराजांनी डोळे उघडले.

“ससुटल्या, तू इकडे काय करतोस? मुख्य म्हणजे माझ्याकडे येण्याची भीती नाही का वाटली तुला?” महाराजांनी जांभई देत विचारलं. त्यांच्या जबड्यातील सुळे बघून ससोबा घाबरलाच. पण तसं न दर्शवता तो म्हणाला,

“महाराज तुम्ही खरोखरच भीतीदायक आहात का? हे बघायचं होतं”.

“मग?”

“थोडेसे आहात. पण इतकेही नाही की तुमच्याशी गप्पा करता येणार नाही.”

“काय सांगतोस, असं वाटलं तुला?    कुणीतरी आपल्याशी गप्पा माराव्यात. असं मला कित्ती वाटायचं म्हणून सांगू. पण वननगरीतले सगळेच प्राणी माझ्यापासून दूरदूरच राहतात. “

“महाराज तुमच्या भीतीमुळे असं घडतं.”

०००

ससोबाची होणारी फटफजिती बघण्यासाठी गुहेच्या आसपास लपून बसलेले प्राणी समोरचं दृष्य बघून थक्कच झाले. सिंह महाराज ससोबासोबत गप्पा मारायला लागल्याचं बघून अनेक प्राण्यांना धक्का बसला.

आपल्या गुहेच्या आजूबाजूला बरेच प्राणी चोरुनलपून आपल्याकडे बघताहेत हे महाराजांच्या लक्षात आलच होतं. त्यांनी एक जोरदार आरोळी ठोकली. ‍नि गर्जना करत सर्वांना समोर येण्याचं ठणकावलं.

खाली मान घालून बरेच प्राणी समोर आले.

“काय रे, गम्मत बघत होतातना, या ससुल्याची कशी माझ्यासमोर त्रेधातिरिपिट उडते याची? पण याची नाही तर तुमचीच त्रेधातिरीपट उडालेली दिसते. आजपासून ससोबा माझा खास मित्र! त्याच्या वाटेला कुणी गेलात तर याद राखा.”

“हो महाराज, ” असं म्हणून प्राणी तिथून पसार झाले.

ससोबाने महाराजांना थँक्यू म्हंटलं. आपली भीती घालवण्याची प्रेरणा देणाऱ्या मुंगीचेही  मनातल्या मनात आभार माणले.

सुरेश वांदिले