अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई, तर कधी भूईंई भौऊउ करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना, एके दिवशी शेजारचे ब्रम्हेकाका तेजोमयीच्या घरी आले. त्यांना हे दृष्यबघून धक्काच बसला. त्यांना ही भुताटकी वाटली. एक यंत्र, डॉगीशी बोलतो काय, तो प्रतिसाद देतो काय, हे त्यांना पचनी पडलं नाही. ते आल्या पावली माघारी वळले.
“काका, काही काम होतं का?” तेजोमयीनं विचारलं. पण ब्रम्हेकाका, उत्तर न देताच निघून गेले.
तेजोमयीचे बाबा आतल्या खोलीत काम करत होते, तर आई स्वयंपाकखोलीत होती. तेजोमयीने, आत जाऊन, ब्रम्हेकाका दारातून कसे माघारी वळले हे दोघांनांही सांगितलं.
“ब्रम्हेंच्या नाकाला, काहीतरी वेगळा वास आलेला दिसतो.’ बाबांनी, प्रतिक्रिया दिली.
“कसला वास?” तेजोमयीने विचारलं.
“आपल्या घरी गडबड असल्याची, त्यांना खात्री वाटली असेल.” आई म्हणाली.
“पण, त्यांना दारातूनच कसं कळलं असणार?” तेजोमयीनं विचारलं.
“ते आले तेव्हा, अलेक्झांडर काय करत होता?” बाबांनी विचारलं.
“गोर्जी, त्याच्याशी बोलत होती. तो मान हलवत होता.”तेजोमयीनं सांगितलं.
“ब्रम्ह्यांना, यात नक्कीच भुताटकी वाटली असणार.” बाबांनी प्रतिक्रिया दिली.
बाबा म्हणाले अगदी तसंच झालं. ब्रम्हेकाकांनी सोसायटीच्या व्हाट्सॲप ग्रुपवर, तेजोमयीच्या घरी, कशी भुताटकी आहे, याचं वर्णन करणारी पोस्ट टाकली. भुताटकीला प्रोत्साहन देणाऱ्या, या कुटुंबाला सोसायटीतून हाकलून लावले पाहिजे, अन्यथा सर्वांनाच भुताचा त्रास होऊ शकतो, असंही या पोस्टमध्ये लिहिलं. ही पोस्ट त्यांनी इतर सोसायटींच्या ग्रुपमध्ये टाकली. त्यामुळे ती व्हायरल होत, नजिकच्या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्यापर्यंत पोहचली.
असल्या पोस्टमुळे बरीच गडबड होऊ शकते. घबराहट होऊ शकते, हे देशपांडे यांच्या लक्षात आलं. ते लगेच तेजोमयीच्या सोसायटीत पोहचले. ही पोस्ट ब्रम्हेंच्या नावे असल्याने, ते त्यांच्याच घरी गेले. त्यांना बघून ब्रम्हेंचे पाय लटपटू लागले. ते, त त प प करु लागले.
“अहो, तुम्ही घाबरता कशाला? मी, साधा प्रश्नही विचारला नाही.” देशपांडेसाहेब, ब्रम्हेंना म्हणाले.
“तुम्ही, आमच्या घरी कसे काय?” ब्रम्हेंनी विचारलं. तेव्हा देशपांडेसाहेबांनी, व्हॉट्सॲपवरील त्यांच्या नावे फिरत असलेली पोस्ट दाखवली.
“म्हणजे, भूताटकी!” ब्रम्हे कसेबसे बोलले.
“तुम्ही स्वत: बघितलं का हे भूत?”
“हो साहेब.”
“मग, तुम्हाला भूतबाधा कशी काय झाली नाही?” देशपांडेसाहेब हसू दाबत म्हणाले.
“साहेब, सोसायटीत ज्यांच्याकडे भूत आहे, तिकडे न जाता, माझीच उलटतपासणी कां करता आहात? चला माझ्यासोबत, मी तुम्हाला, भूत दाखवतो.” असं बोलून ब्रम्हेंनी, देशपांडेसाहेबांना तेजोमयीच्या घरी नेलं.
आपल्या घरी पोलीस इन्स्पेक्टरांसोबत, ब्रम्हेंना बघून, सगळा प्रकार बाबांच्या लक्षात आला. त्यांनी देशपांडेसाहेबांना आत बोलावलं.
“साहेब, आत जाऊ नका. ती बघा दोन भूतं!” अलेक्झांडर आणि गोर्जीकडे बोट दाखवत ब्रम्हे म्हणाले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत देशपांडे आत आले. गोर्जीने त्यांना नमस्कार केला. आलेल्या व्यक्तीशी सगळेजण अदबिने बोलताहेत, हे बघून अलेक्झांडरनेही शेपूट हलवून देशपांडेसाहेबांकडे प्रेमानं बघितलं.
“ब्रम्हेसाहेब, तुम्हाला या दोघांमध्ये कुठे भूत दिसला, ते सांगा.” दारातच उभ्या असणाऱ्या ब्रम्हेंना, देशपांडेसाहेबांनी दरडावून विचारलं.
“हे यंत्र, या कुत्र्याशी बोलताना मी बघितलं.”
“कुत्रा नाही, आमचा लेक आहे तो.” आई ब्रम्हेंवर रागावली.
“या यंत्राशी, यांचा हा लेक बोलतो. ही भुताटकी नाही का?” ब्रम्हे म्हणाले.
“ब्रम्हेसाहेब, तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीने, यंत्रमानवास भूत समजावे, म्हणजे कमालच झाली. कोणत्याही शेपूटवाल्या दोस्ताशी प्रेमानं बोलल्यास, त्यांना ते कळतं. याला भुताटकी नाही म्हणत.”
“पण, साहेब…”
“ब्रम्हे, सुशिक्षित माणसंच जर भुताटकीवर विश्वास ठेवून, या गोष्टींना व्हायरल करु लागल्यास, समाजात किती गोंधळ उडेल, भीतीचे वातावरण निर्माण होईल. याचा फायदा संधीसाधू लोक घेतील. हे, लक्षात घ्यायला हवं की नाही.”
“पण, साहेब.”
देशपांडेसाहेबांनी दंडूका खाली आटपून ब्रम्हेंना बोलू दिले नाही. त्यांना खोलीत यायला सांगितलं. “थोड्यावेळापूर्वी, जे काही व्हॉटसॲपर लिहिलं, ती मोठ्ठीच चूक घडली. भूतबित नसल्याची, आपली खात्री पटली असून, सर्वांना मानसिक त्रास झाला असल्यास क्षमा असावी.” असा संदेश लिहायाला लावून, तो लगेच त्यांना पोस्ट करायला लावला.
सुरेश वांदिले