(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

राष्ट्राध्यक्षांना,महालात एके दिवशी, ते आणि त्यांचे कुटुंबीय नास्ता करत असताना, टेबलवर मुंग्या दिसल्या.

त्यांच्या मुलाने मुंग्यांकडे बघत ई केलं. पत्नीने नाक मुरडले.

महालाभवती इतकी प्रचंड सुरक्षा असताना या मुंग्या इथे आल्याच कशा? “ त्या खेकसल्या.

राष्ट्राध्यकक्षांनी ताबडतोब प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यास बोलावणं धाडलं.

या मुंग्या आल्याच कशा महालात, इतका बंदोबस्त असताना?” ते त्याच्यावर ओरडले.

पण सर, कुठे आहेत मुंग्या?”त्याने भीत भीत विचारलं.

तुझे डोळे खराब झाले की काय? हे बघ.”असं ओरडत राष्ट्रध्यक्षांनी मुंग्याकडे बोट दाखवलं.

पण सर, इथे तर काहीच नाही. सुरक्षा प्रमुख म्हणाले.

राष्ट्राध्यक्षांनी काळजीपूर्वक बघितलं. तिथे मुंग्या नव्हत्या. आपलं कार्य संपवून म्हणजेच हवं तेवढं अन्न घेऊन मुंग्या कधीच्याच दुसरीकडे निघून गेल्या होता.

राष्ट्राध्यक्षांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच मुंग्याचा शोध घेण्याचा आदेश काढला. आपल्याच राष्ट्रातील नव्हे तर जगातील मुंग्यांचा शोध घेण्याचं फर्मान त्यांनी सोडलं. त्यासाठी त्यांनी भरपूर निधी उपलब्ध करुन दिला. महिन्याभरात शोध घ्या अन्यथा प्रशांत महासागरात बुडण्यासाठी तयार रहा, असा धमकीही दिली.

आले राष्ट्राध्यक्षांच्या मना, त्याला कोण काय करणार?

मुंग्यांचा शोध घेण्यासाठी मग जगाच्या चारही दिशेला मोहीम निघाली. शेकडो माणसं , यंत्रसामग्री पाठवण्यात आली. मुंग्यांचे अभ्यास करणारे काही कीटकशास्त्रज्ञ या पथकांमध्ये होते. महिनाभर रात्रंदिवस सगळेजण मुंग्यांचा शोध घेत होते.

या शोधात त्यांना आढळलं की अंटार्टिका खंड सोडून मुंग्या सर्वत्र आहेत. जिथे मनुष्यप्राणी राहू शकत नाही तिथेसुध्दा त्या आहेत. त्यांची अंदाजे संख्या निघाली २० क्वाड्रिलियन. म्हणजे २० आणि त्यानंतर १५ शून्य! याचा अर्थ अबाबाबा! करायला लावणारी, ही संख्या. त्यांनी हिशोब काढला. सध्या मानवांची संख्या लक्षात घेतली तर पृथ्वीवर एक मानवाच्या पाठीमागे अडीच दशलक्ष मुंग्या असतात. त्यांनी पुन्हा अबाबाबा केला.

मुंग्यांचा जीवभार (बायोमास) हा मानसाच्या जीवभारापेक्षा २० टक्के अधिक. त्याचं वजन होत १२ मेगॅटोन. गिझा येथील दोन पिरॅमिडच्या वजना इतकं. जगातील कोणत्याही पर्यावरणात राहण्याची त्यांची क्षमता अदभूत अशीच. त्यामुळेच जगातील पर्यावरण संतुलनात आणि परिसंस्थेला सक्षम करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग.

या परिसंस्थेला सक्षम करण्यासाठी या मुंग्याचं कार्य अभियांत्रिकी सारखं असतं. मुंग्या, बी-बियांना इकडे-तिकडे पसरवतात. मातीची घुसळण करतात. विघटनाच्या प्रक्रियेला गती देतात. त्या आपल्या चाऱ्यासाठी किंवा अन्नासाठी धाडी टाकतात. शिकारसुध्दा करतात. थोडक्यात काय, तर आपल्या परीसंस्थेला हलतं-डुलतं ठेवतात.

या मोहिमेच्या शास्त्रज्ञांनी आपले निष्कर्ष लिहून काढले. आता हे राष्ट्राध्यक्षांना सांगायचं कसं? सांगितलं तर आपला राष्ट्राध्यक्ष जगातल्या मुंग्यांनाच ठार करण्याचा आदेश द्यायचा! अशी भीतीही त्यांना वाटली.

राष्ट्राध्यक्षांनी दिलेली महिन्याभराची मुदत संपत आल्याने सर्वांना राष्ट्राध्यक्षांपुढे हजर व्हावं लागलं.

सर्वांचे चेहरे पडले होते. ते बघून राष्ट्राध्यक्ष काळजित पडले.

काय झालं?” त्यांनी मोहीम प्रमुखांना विचारलं.

सर, आम्ही मुंग्यांचा शोध घेतला, पण…

पण काय?”

सर, कसं सांगावं हा प्रश्न पडलाय आमच्यापुढे?”

इतका गंभीर प्रश्न आहे का?”

मुंग्याचा नाही सर?”

मग?”

त्यांच्याविषयी आम्ही माहिती दिल्यावर तुमची प्रतिक्रिया काय राहील याची चिंता वाटते. शोधप्रमुख भीत भीत म्हणाला.

त्यांच्या या बोलण्याची राष्ट्राधक्षांना चिड आली. त्यांनी त्या प्रमुखावर बंदुक रोखली. हे बघून घाबरलेल्या शास्त्रज्ञांनी धाडधाड माहिती सांगायला सुरुवात केली.

ती ऐकताना राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे बदलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील चिडण्याचे आणि रागावण्याचे भाव जाऊन कौतुकाचे भाव प्रगट होऊ लागले. माहिती सांगून झाल्यावर काहीक्षण शांततेत गेले.

पण या शांतेतला, “मदर मुंगीचा जयजयकार असो, “या घोषणेने छेद दिला. सर्वजण थक्क झाले. त्यांच्या डोळयावर आणि कानावर विश्वासच बसेना. कारण ही घोषणा खुद्द राष्ट्राध्यक्ष देत होते.

म्हणजे सर! शोधप्रमुख कसाबसा बोलला.

तुम्ही इतके घाबरता कां? तुम्ही समजता इतका मी दुष्ट नाही. मदर मुंगी आपल्या सर्वांच्या हितासाठी किती उपयुक्त आहे हे माझ्या लक्षात आलय, ही तुमची माहिती ऐकून.शोध मोहिमेतील सर्वांचं कौतुक  करत राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

महालात येणाऱ्या मुंग्यांना यापुढे सन्मानानेच वागण्यात यावं असा फतवा त्यांनी त्याच दिवशी काढला.

सुरेश वांदिले