महिला आयटीआय
महिलांना स्वयंपूर्ण होता व्हावे आणि त्यांना विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करणे सुलभ व्हावे यासाठी शासनाने १५ ठिकाणी फक्त मुलींसाठीच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीआय) स्थापन केली. यामध्ये ३७३९ मुलींना प्रवेश दिला जातो. ज्या शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये 6 ते 8 व्यवसाय अभ्यासक्रम आहेत, त्या ठिकाणी दोन अभ्यासक्रम मुलींसाठी राखीव ठेवावे लागतात. 4 अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना 1 अभ्यासक्रम राखीव ठेवावा लागतो. केंद्रीय प्रवेश पध्दती अंतर्गत उपलब्ध जागांपैकी 30 टक्के जागा मुलींसाठी आरक्षित ठेवण्यात येतात. याचा लाभ खुला, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती/ भटक्या जमाती (अ/ब/क/ड) आणि इतर मागासवर्ग सवंर्गातील विद्यार्थींनिंना मिळतो. विद्यार्थीनीच्या मूळ वास्तव्याच्या तालुक्यातील 70 टक्के जागा आणि दुसऱ्या तालुक्यात 30 टक्के जागा विद्यार्थींनींसाठी या आयटीआयमध्ये आरक्षित ठेवण्यात येतात.
या संस्थांमध्ये शिल्प कारागीर योजेनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. त्याचा मुलभूत आराखडा संबंधित उद्योगांमधील तज्ज्ञ व्यावसायिकांच्या सल्ल्यानुसार तयार करण्यात येतो.
अभ्यासक्रमांमध्ये ढोबळमानाने फळे आणि भाजिपाला प्रक्रिया, अंतर्गत सजावट आणि अभिकल्प (डिझायनिंग), माहिती आणि संगणकीय तंत्रज्ञान कार्यप्रणाली देखभाल, फॅशन तंत्रज्ञान, वस्त्रप्रावरणाची निर्मिती, सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस, कॉम्प्युटर ऑपरेटिंग आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट, कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्किंग , यांचा समावेश आहे.
दहावी उत्तीर्ण कोणत्याही विद्यार्थीनींना हे अभ्यासक्रम करता येतात. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र मंडळाकडून उमेदवार तांत्रिक वा व्यावसायिक विषय घेऊन दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यास त्यांच्यासा
ठी एकूण उपलब्ध जागांपैकी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात.
या अभ्यासक्रमांचा कालावधी साधारणत: एक ते दोन वर्षांचा असतो. राष्ट्रीय कौशल्य धोरणानुसार अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणावर भर दिला जातो. अभ्यासक्रमांमध्ये जवळपास ७० टक्के भाग प्रात्यक्षिकांसाठीच राखीव असल्याने प्रत्येक उमदेवार हा प्रत्यक्ष कामकाजासाठी सक्षम होतो. या आयआयटीमध्ये शासनाने चांगल्या कर्मशाळा, सर्वप्रकारची उपकरणे, संयंत्रे आणि इतरही साधने पुरवली आहेत. प्रात्यक्षिकांसाठी हत्यार संच, अप्रॉन, कच्चामाल, स्टेशनरी, ग्रंथालय, पुस्तकपेढी, गरजुंसाठी वसतिगृहाची सुविधा, जाण्यायेण्यासाठी रेल्वे व बसच्या पाससाठी शिफारस, आदिवासी मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह, दिव्यांगांना नियमानुसार सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. आर्थिकदृष्ट्या मागास, अनुसूचित जाती , जमाती आणि भटक्या जमाती संवर्गातील मुलिंना प्रशिक्षण शुल्क नाही.
या ठिकाणी शिकवणारे शिक्षक/अध्यापक हे अनुभवी असतात. अत्यंत अल्प अशा शैक्षणिक शुल्कात हे प्रशिक्षण घेता येते.
राज्यातील आयआयटीचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आवश्यक मूलभूत प्रशिक्षण आयटीआयमध्ये दिल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष कारखाने/उद्योग/व्यवसाय यामध्ये उपयोगात आणली जाणारी यंत्रसामग्री आणि उपकरणे व तंत्र याचे परिपूर्ण ज्ञान मिळावे यासाठी ही योजना राबवली जाते. यासाठी एक लाखाहून अधिक जागा राज्यातील ११ हजाराच्या आसपास औद्योगिक आस्थापनांमध्ये उपलब्ध करुन दिल्या जातात. आयटीआय मधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा ही संख्या अधिक असल्याने प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थीनीस या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थीनीस केंद्र शासनाच्या नियमानुसार विद्यावेतन दिले जाते.
अशी आहेत केंद्रे
(१) ठाणे- शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, कोपरी कॉलनी पूर्व ठाणे (अभ्यासक्रम- बेसिक कॉस्मेटॉलॉजी, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, डेंटल लेबॉरेटरी इक्विपमेंट टेक्निशिअन, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फॅशन डिझायनिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, इंफॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनन्स, इंटेरिअर डिझायनिंग ॲण्ड डेकोरेशन, सेक्रेटरीयल प्रॅक्टिस – इंग्रजी, सिविंग टेक्नॉलॉजी, टेक्निशिअन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स), (२) मुंबई – ३७४ वीर सावरकर मार्ग, दादर- पश्चिम (अभ्यासक्रम- सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस, पेंटर, इंटेरिअर डिझाइन ॲण्ड डेकोरेशन, इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनन्स, फॅशन डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्रेस मेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, बेसिक कॉस्मेटॉलॉजी), (३) अमरावती – मोर्शी रोड इरविन चौक, (अभ्यासक्रम बेसिक कॉस्मेटॉलॉजी , कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, ड्रेस मेकिंग, फ्रुट ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, इंफॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनन्स, सिविंग टेक्नॉलॉजी, ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल, मल्टिमीडिया ॲनिमेशन ॲण्ड स्पेशल इफेक्ट्स, इंटेरिअर डेकोरेटर ॲण्ड डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, सर्फेस ऑर्नामेंटेशन टेक्निक्स, क्रॉफ्ट्समन फूड प्रॉडक्शन, बेकर ॲण्ड कन्फेक्शनर, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, (4) पुणे – परिहार चौक, औंध , तालुका – हवेली (अभ्यासक्रम – (अ) कालावधी एक वर्षं- ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, फ्रुट ॲण्ड व्हिजिटेबल प्रोसेसर, कॉम्प्युटर ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, इंटेरिअर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्किंग. नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क – राष्ट्रीय कौशल्य अर्हता रचना (एनएसक्यूएफ) नुसार या अभ्यासक्रमांसाठी कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गतची पातळी चार ठरविण्यात आली आहे. (ब) कालावधी- दोन वर्षे- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टेक्निशिअन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम, इंफॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनन्स. एनएसक्यूएफ पातळी – ५), (५) अकोला – मनकर्णा प्लॉट शिवाजी कॉलेज जुने आकोट स्टॅड, (६) नागपूर – मालवीय रोड सीताबर्डी, (7) चंद्रपूर-सिव्हिल लाइन्स, जुन्या वरोडा नाक्याजळ, (8) भंडारा – नवीन टाकळी, वर्ठी रोड, (9) औरंगाबाद – भडकल दरवाज्याजवळ, (10) बीड – नगर रोड, (11)लातूर – बार्शी रोड, (१२) रत्नागिरी- नाचने रोड रत्नागिरी), (13) सोलापूर – 156/ए, रेल्वे लाइन्स, डफरिन चौक, (14) नाशिक – जुना मुंबई-आग्रा रोड त्र्यंबक नाका, आदिवासी विकास भवनजवळ, (15)जळगाव – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, जिल्हा उद्योग केंद्राजवळ, (16) पिंपरी चिंचवड महापालिका आयटीआय – कासारवाडी रेल्वेस्टेशन जवळ, पिंपरी गुरव रोड, कासारवाडी पुणे, (17) सगुणामाता मुलींचे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र – मुधोजी उच्च माध्यमिक शाळेच्या विरुध्द दिशेला, रविवार पेठ, फलटण तालुका-जिल्हा सातारा,(18) भारती विद्यापीठाचे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र – कडगाव कराड – विटा रोड, जिल्हा सांगली. (18) अहमदनगर – मुलींसाठी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर
आयटीआय अभ्यासक्रमातील विषय घटक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूट कोलकता यांनी निर्धारित केले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थीनींना राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद (नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग) चे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट) दिले जाते. या प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावर सुध्दा मान्यता दिली जाते. आयटीआय मधील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर इच्छुक विद्यार्थींनींना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो.
संपर्क – संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, टपाल पेटी क्रमांक १००३६, मुंबई – १, दूरध्वनी-०२२-२२६२०६०३, ईमेल-itiadmission@dvet.gov.in संकेतस्थळ – dvet.gov.in
०००