(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 माकडचाळे

एकदा सिंहमहाराज वन भ्रमंतीला निघाले असताना, त्यांना काही झाडांवर बसलेल्या माकडांकडे लक्ष गेले. एक दोन वडीलधारे माकडं सोडली तर बाकिची माकडं या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत होती. काही माकडं झाडाच्या फांद्यांनी उलटं लटकून गरगर फिरत होती. कुणीही स्वस्थ बसलेला नव्हता. मध्येच जमिनीवर येत. क्षणात वर चढत. क्षणात उडी मारत. क्षणात एकमेकांकडे दात काढून वाकुल्या करत. यालाच तर माकड चाळे म्हणत नसावे ना, असे सिंह महाराजांना वाटले. या माकडचाळे करण्यातच यांची शक्ती वाया जात असावी, असे महाराजांना वाटले. या माकडांकडे असलेला उत्साह आणि उर्जा आपण राज्याच्या हितासाठी वापरायला हवं असही त्यांना वाटलं.

महाराज हळूवार झाडाखाली आले. त्यांना तिथे बघून बरीच माकडं घाबरली आणि पटापट दुसऱ्या झाडांवर पळून गेली.

अरे पळू नका नका, मी तुम्हाला काही करणार नाही. तुमच्यासाठी मी चांगली बातमी आणली आहे. महाराज ओरडून म्हणाले. त्यांचा आवाज ऐकून काही वयस्क माकडं पुन्हा त्या ठिकाणी आली. त्यातील एकजण म्हणाला,

वनराज आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आम्ही खाली उतरलो नि तुम्ही आमच्यावर हल्ला केला तर…

नाही नाही असं काही मी करणार नाही. तुम्ही खाली आला तर मी तुम्हाला एक चांगली बातमी देईन. सिंह महाराज म्हणाले. झाडावर बसलेल्या वयस्क माकडांमध्ये यावर चर्चा झाली.

महाराजांना कोणती चांगली बातमी द्यायची आहे, हे आपण खाली जाऊन समजून घेतलं पाहिजे. एक वयस्क माकड दुसऱ्याला म्हणाले.आपण दोघे खाली जाऊन महाराज काय म्हणतात ते समजून घेऊ आणि मग आपण काय करायचं ते ठरवू. अशी चर्चा करु ते दोघे वयस्क माकडं खाली उतरली.

त्यांनी महाराजांना नमस्कार केला. महाराजांनांही त्यांना नमस्कार केला.

मग, महाराज सांगा आमच्या साठी असणारी चांगली बातमी.

तुम्ही सर्वजण इतक्या उड्या मारता, कधीच एका ठिकाणी  थांबत नाही. तुमच्याकडे खूप उर्जा आणि उत्साह आहे. मग त्याचा उपयोग आपल्या वननगरीच्या हितासाठी केला तर..

म्हणजे काय महाराज?

तुम्ही आमच्या सैन्यात सामील व्हा. शत्रुसोबत युध्द होईल तेव्हा त्यांना भांडावून सोडा. तुमच्या माकडचाळ्यांची त्यांना भीती वाटून ते पळून गेले पाहिजे.

पण, महाराज या मोबदल्यात आम्हास काय मिळणार?

अरे हो, ते सांगायचं विसरलोच की, त्या बदल्यात ही सगळी आंब्याची झाडं आता या क्षणापासून तुमची. असं समजा की या आमराईचे तुम्हीच राजे..

ते ऐकून दोन्ही वयस्क माकडांना आनंद झाला. इतर माकडांशी या विषयावर बोलतो असं सांगून वयस्क माकडांनी महाराजांचा निरोप घेतला.

दोन्ही माकडांनी इतर सर्व माकडांना बोलावून घेतलं. सिंह महाराजांचं म्हणणं सांगितलं. काही माकडांना आनंद झाला तर काही माकडांनी शंका व्यक्त केली..

आता, सुध्दा आपण या आमराईचे राजे आहोतच की..

असं आपण समजतो. पण महाराज जेव्हा आपल्या नावाने आदेश काढतील तेव्हा ही आमराई आपल्या मालकीची होईल.

आपणाकडून ते वननगरीच्या शत्रुला घाबरवून टाकण्याची अपेक्षा करत आहेत. शत्रुला आपण घाबरवणार. त्यामुळे शत्रू पळून जाणार आणि महाराज मात्र आयजीच्या जिवावर बायजी बणून राज्य करणार. असं नाही चालायचं. एक तरुण माकड म्हणाला.

मग आपण त्यांना नाही म्हणायचं काय?

नाही कशाला म्हणायचं, त्यांना आपल्या राज्याची खरोखरच चिंता असेल त्यांनी आपलं राज्यच आपल्या नावावर केलं पाहिजे. दुसरे तरुण माकड म्हणाले. या माकडाचे म्हणणे सर्वांना पटलं आणि सर्वांनी त्याच्या सुरात सुर मिसळवला. दोन्ही वयस्क माकडांचा नाईलाज झाला.ते खाली आले आणि महाराजांना काय घडलं ते सांगितलं.

महाराजांनी निश्वास सोडला. झाडांवरील माकडांकडे बघत ते म्हणाले,

माझं म्हणणं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पण जाउु द्या. पुन्हा विचार करा नि मग सावकाश सांगा. असं बोलून महाराज निघून गेले. ते तिथून जातातच दोन वयस्क माकडं सोडून सर्वांनी हर्षोलास केला. सिंह महराजांना कसं नमवलं आपण, असं म्हणून ते पुन्हा माकडचाळे करण्यात मग्न झाले. वयस्क माकडांनी कपाळावर हात मारुन घेतला.

वयस्क माकडं आणि सिंह महाराजांची चर्चा सुरु असताना दोन कोल्हे त्या ठिकाणाहून जात होते. त्यांच्या कानावर ही चर्चा पडली. तेव्हा बाजूच्या झाडीत लपून सर्व काही त्यांनी ऐकलं. मूर्ख माकडांच्या मदतीने आपणास राज्य मिळवता येईल आणि यांना सतत मूर्ख बनणून आयती मेजवाणी मिळवता येईल, याची त्यांना खात्री पटली. महाराज तिथून निघून जाताच ते दोन्ही कोल्हे झाडाखाली आणि त्यांनी जोरजोराने टाळया वाजवल्या.

तुमच्यासारखे हुषार आणि शौर्यवान जंगलात कुणीच नाही. असे झाडावरील माकडांकडे बघत ते जोरजोरात म्हणू लागले.

बरे झाले, सिंहाला त्याची जागा दाखवली ते. तुमच्या जीवावर त्याला राज्य करायचं होतं.

आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही म्हणाल ते करु. आजपासून तुम्हीच राजे..आम्ही तुमचे सेवक. एक कोल्हा जोराने म्हणाला.

ते ऐकून झाडावरील माकडं खुष झाली. ती आनंदानं पुन्हा उड्या मारु लागली.उड्या मारत असताना एका माकडाचा तोल गेला नि तो खाली पडला. ही संधी साधून एका कोल्ह्याने त्याच्यावर उडी घेतली. पण त्याचा दुष्ट हेतू साध्य झाला नाही. कारण सिंह महाराजांनी त्याच्या झडप घेतली आणि त्याला ठार केले.

माकडांशी चर्चा झाल्यावर महालाकडे परत असताना, महाराजांच्या तीक्ष्ण नाकाला कोल्ह्याचा वास आला होता. इथे काहीतरी विपरीत घडू शकते, असे त्यांचे अंतर्मन म्हणाले. त्यामुळे ते परत फिरले आणि झुडपात लपून तिथे काय घडते हे बघू लागले. कोल्हे जेव्हा माकडांशी बोलत होते, तेव्हाच सिंह महाराजांच्या लक्षात कोल्ह्यांचा दुष्टपणा लक्षात आला. ते सावध झाले आणि माकडावर हल्ला करणाऱ्या  कोल्ह्यावर उडी मारुन त्याचा खातमा केला. दुसरा कोल्हा पळून जाऊ लागला तर त्याच्या एका पायाचा लचका घेतला.

खाली पडलेले माकडं कसे बसे सावरले आणि पुन्हा वर पळाले. वयस्क माकडांनी पुन्हा सर्वांना समजवण्याचा प्रयत्न केला. आपण महाराजांना मदत केली तर ते आपले संरक्षण करतील आपल्या संकट येऊ देणार नाही. असं सांगितलं. थोड्या वेळेपूर्वी घडलेल्या घटनांमुळे माकडांना ते म्हणणं पटलं. त्यांनी महाराजांचं म्हणणं ऐकण्याचं ठरवलं. तसा निरोप घेऊन एक वयस्क माकड महाराजांकडे आले.

त्यांनी सर्वांचा होकार कळवला.

महाराज जोराने हसले. माकडांनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगत होतो तेव्हा तुम्हाला माझं म्हणणं पटलं नाही. तुमचा अहंकार दाटून आला. बेताल बडबडायाला लागला. तुमच्या जीवावर शेकलं तेव्हा मात्र तुम्ही मला होकार दिला. तुमच्या सारख्या स्वार्थी आणि अहंकारी आणि स्वत:च्या हिताचेही न कळणाऱ्यांची मदत नकोय म्हणाला. असं बोलून महाराज तिथून निघून गेले. महाराजांच्या छत्रछायेखाली येण्याची सुवर्ण संधी माकडांनी आपल्या मूर्खपणामुळे घालवली

सुरेश वांदिले.