(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

मारुतीरायांची चिंता

बऱ्याच दिवसांनी कॉलनीतली टोळीतील तेजोमयी,कल्याणी,वैष्णवी,प्रदीप,टिंकू,चिंकू,श्रीकांतही मंडळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाले. या टोळीला मारुतीराया नेहमीच हसतमूख वाटायचे. अरे या या,तुम्ही आलात ते बरं झालं खूप आनंद झाला, वगैरे ते बोलण्याचा भास तेजोमयीस व्हायचा .गदा हलवून आशीर्वाद देण्याचा भास तिला व्हायचा. हा भास खरचं असल्याच सगळया टोळीचं एकमत होतं. त्यामुळे मारुतीरायांनी गदा हलवून आशीर्वाद दिला असं तेजोमयीनं सांगितलं की टोळी मग मंदिरातल्या बाकांवर बसून गप्पा-टप्पा करायला मोकळी.

पण आज मारुतीरायांसमोर एक मिनिटे उभे राहूनही, त्यांची गदा हलण्याचा भास तेजोमयीस झाला नाही.त्यामुळे ती काहीच बोलेना.

त्यामुळे टोळीसही हालता येईना.

अगं काय झालं?मारुतीरायांनी आशीर्वाद दिला नाही का? कल्याणीनं विचारलं.

तेजोमयीनं नकारार्थी मान हलवली.म्हणजे ते रागावले की काय?प्रदीप म्हणाला.

पण,ते आपल्यावर कशासाठी रागावतील बॉ,आपण तर काहीच केलं नाही?टिल्लू म्हणाला.

काय हो मारुतीराया तुम्ही आमच्यावर रागावलात की काय?श्रीकांतच्या तोंडून निघूनच गेलं.

सर्वांनी आधी त्याच्याकडे आणि नंतर मारुतीरायांकडे बघितलं.

अरे, आज जरा मारुतीराया नेहमीसारखे प्रसन्न वाटत नाही.त्यांचा चेहरा मलूल,पडलेला वाटतो रे!वैष्णवी म्हणाली.

पुन्हा सर्व टोळीने काळजीपूर्वक त्यांच्याकडे बघितलं.

अरे खरच की,तेजोमयी म्हणाली.ती असं म्हणाल्यामुळे सर्वांना तसच वाटलं.

मारुतीरायांची तब्येत बरी नसेल का रे/?श्रीकांतने काळजीच्या स्वरात विचारलं.

चला मग, आपण डॉक्टर काकांना बोलावू या का? पिंकी म्हणाली.

वेडी आहेस का गं?मारुतीरायांना स्ट्राँग आहेत.त्यांना काही होऊ शकत नाही.कल्याणी म्हणाली.

मग इतके मलूल का बरं वाटतात आज? त्यांना असं दु:खी बघवत नाही रे,तेजोमयी म्हणाली.

अगं मग त्यांना सांगना असं दु:खीकष्टी राहू नका म्हणून!तुला त्यांचं आणि त्यांचं तुला

कळतना बरोबर.कल्याणिने मुद्दा मांडला.तो सर्वांना पटला.

मारुतीराया,तुम्ही आता आमच्याशी बोलला नाहीत आम्ही सर्वजण रडायलाच लागू हं,तेजोमयी त्यांच्या डोळयात बघत म्हणाली.तिचा स्वर रडवलेला झाला होता.

नको,नको,तुम्ही नका रडू,मलाच रडूयेतय,म्हणून मारुतीरायांनी हुंदका दिला.

ते बघून टोळीच्या इतर सदस्यांच्या पोटात ढवळून निघालो.

पण मारुतीराया तुम्ही कां आज इतके खिन्न,दु:खी कां आहात? नेहमी सारखं प्रसन्न नाही.आम्हाला आर्शीवाद देण्यासाठी गदाही हलवली नाही.तेजोमयी पुन्हा म्हणाली.

फार दु:खाची गोष्ट आहे रे बाळांनो, सांगण्यापेक्षा तुम्हाला दाखवलेलीच बरी.

म्हणजे काय?टोळी एका सुरात म्हणाली.

चला बसा माझ्या दोन्ही खांद्यावर आणि हातांवर मी तुम्हाला माझ्या दु:खाचं कारणच दाखवून आणतो.

त्यांच्या दोन्ही खांद्यावर व हातांवर तेजोमयी,प्रदीप,कल्याणी,टिल्लू,वैष्णवी आणि श्रीकांत बसले. इतरांना नंतर घेऊन जाण्याचे सांगून मारुतीराया मंदिराच्या बाहेर येऊन त्यांनी आकाशात भरारी घेतली.आकाशातून उडताना मजा वाटत होती.पण आज मारुतीराया दु:खीकष्टी असल्याने,कुणालाच काही फारसा आनंद होत नव्हता.उडता उडता मारुतीराया एके ठिकाणी उतरले.सर्वांना खाली उतरवलं आणि त्यांना विचारलं,दिसतय कां इथे कुणी?

नाही,सर्वजण एका सुरात म्हणाले.

मारुतीरायाच्या डोळयातून अश्रू ओघळले.त्यांनी पुन्हा सर्वांना आपल्या खांद्यावर आणि हातावर बसवले आणि वर उडाले.अशा प्रकारे त्यांनी २५ ठिकाणी मुलांना उतरवले आणि दिसतय का इथं कुणी? असं विचारलं.प्रत्येक वेळी उत्तर येत होतं ,नाही नाही कुणीच नाही.

२६ व्या ठिकाणी अखेर न राहवून तेजोमयीनं मारुतीरायांना विचारलं,

मारुतीराया तुम्ही, हे आम्हास दिसलय का इथं कुणी असं कां विचाराहात हो?आम्ही नाही म्हंटलं की तुमच्या डोळयातून अश्रू ओघळतात.तुम्ही पुन्हा दु:खी होता?काय दिसावं असं तुम्हास वाटतं?

मारुतीराया,एका पिंपळाच्या डेरदार वृक्षाखाली बसले.सर्वमुले त्यांच्या भोवती बसली.

हुंदका देत मारुतीराया म्हणाले,बाळांनो मी माझे हरवलेले मित्र दिसताहेत का हे तुम्हाला विचारत होतो?

तुमचे हरवलेले मित्र?सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं.

हो ना बाळांनो,अरे एक नाही दोन नाही तब्बल  ५०० दोस्त हरवले आहेत.

काय सांगता,मारुतराया?तेजोमयी आश्चर्य व्यक्त करत म्हणाली.

पण ते कसे काय हरवले?कोण होते ते?तुम्हाला कधी कळलं मारुतीराया ते?कल्याणीनं अधिरतेनं विचारलं.

बाळांनो,मी तुम्हाला ज्या २५ ठिकाणी उतरवलं,त्या ठिकाणी हे माझे मित्र राहत.ते मित्र म्हणजे वेगवेगळया प्रजातीमधील प्राणी,कुणी सरपटणारे,कुणी पृष्ठवंशीय,तर कुणी सस्तन तर कुणी उडणारे तर कुणी थंड रक्ताचे.मोठा हुंदका देत मारुतीराया म्हणाले.तेजोमयीनं त्यांचे डोळे पुसले.

पण मारुतीराया,हे इतके तुमचे मित्र हरवल तरी कसे?आपण पोलिसात तक्रार नोंदवू या का?प्रदीप म्हणाला.

अरे, हे माझे मित्र एका दिवसात हरवले नाहीत.दरवर्षी ते हरवताहेत. ते कुणामुळे,ठाऊक आहे का तुम्हास?

नाही हो मारुतीराया आम्हास कसं ठाऊक असणार?

अगं ते हरवले ते तुमचे जे कोणी दूरचे जवळचे,या पंचेवीस ठिकाणी राहणारे,मामा मामी,काका-काकी,भाउु बहीण,यांच्यामुळे ?

आँ!

होना,या प्राण्यांना तुम्ही लोकांनी त्यांना खाण्यासाठी कधी ठार मारलं,तर कधी खेळण्यासाठी ठार केलं,शिकारीचा आनंद घेण्यासाठी ठार केलं. कधी ते राहत असलेल्या जंगलात,जमिनीवर तुम्ही अतिक्रमण केलं आणि स्वत:च राहायला सुरुवात केली.बिचाऱ्यांना बोलता येत नाही आणि तुमच्यासारखी बुध्दी नाही.मग वाट सापडेल तिकडे हे माझे मित्र निघून गेले.ते कुठे गेले? कसे गेले?आता ते जिंवत आहेत की नाही हेही ठाऊक नाही.तुम्ही मंडळी इतकी हुषार की आपल्याला या हरवलेल्याची काळजी वाटते असं दाखवण्यासाठी दरवर्षी,अशा संकटात सापडलेल्या प्राण्यांची/पक्ष्यांची लालयादी प्रसिध्द करता.हुंदका देत मारुतीराया म्हणाले.

तुम्ही ती यादी बघितलकी मारुतीराया?प्रदीपने विचारलं.

होरे माझ्या राज्या! म्हणून तर माझं चित्त ठिकाणावर नाही.तुम्हा मानवांना कोणताही त्रास न देता,आपलं आपलं जीवन आनंदांन जगणाऱ्या या छोट्या छोट्या प्राण्यांवर तुम्हीच संकट ओढवलं आणि त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आता ही लाल यादीची भानगड काढली.असा राग येतोय ना मला.असं वाटतं जोरात गदा फिरवावी आणि भिरकावून द्यावी.पण नाही ना, मला तसं करता येत नाही.माझ्या गदेच्या तावडीतून मग कुणीच सुटणार नाही…

नको नको मारुतीराया असं काही करु नका.आम्हीच काहीतरी करु आता.कल्याणी कशीबशी बोलली.

तीच एकमेव आशा उरलीय बाळांनो,तुमच्यातला मोठ्‌यांना समजावून काही उपयोग होत नाही.तुम्हीच जर सतत मोठ्यांना सांगत राहिलात,बोलत राहिलात,जमेल तसं प्रयत्न करत राहिलात तरच काहीतरी चांगलं घडेल.यंदाच्या लाल यादित हरवलेल्या प्राण्याची संख्या ५०० आहे.पुढच्या वर्षी ५००० होईल.असं होत होत एके दिवशी कदाचित तुम्ही मंडळीही हरवून बसाल?मारुतीराया काळजीच्या स्वरात म्हणाले.त्यांनी काही क्षण डोळे मिटून घेतलं.त्यांचं बोलणं ऐकून मुलांच्या चेहऱ्यांवर काळजीचे ढग जमा झाले.

मारुतीरायांनी डोळे उघडले.मुलांच्या चेहऱ्यावरची काळजी आणि दु:ख बघून त्यांना वाईट वाटलं.

बाळांनो,चला आपण परत जाऊ,नाही तर तुमच्या काळजीने तुमचे आईबाबा दु:खी होऊन पोलीस ठाण्यात जातील,तुम्ही हरवल्याची तक्रार करायला.तुमच्यासाठी त्यांना जशी काळजी वाटते तशीच या मुक्या प्रांण्याविषयी ज्या दिवशी वाटेल तो दिवस सुदीन म्हणायचा..

तो सुदीन लवकरच येऊ दे,असं मनात प्रार्थना करत,मुलं मारुतीरायाच्या खांद्यावर आणि हातावर बसली.मारुतीरायाने मंदिराकडे जाण्यासाठी आकाशात सूर मारला.

सुरेश वांदिले