मित्र गेला
तेजोमयीच्या घरी अलेक्झांडर (द डॉगी) आल्यानंतर त्यांच्या घरचं वातावरण बदलून गेलं. क्षणोक्षणी आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू लागले.अलेक्झांडरमुळे घरातच चालतं-फिरतं-बागडतं आणि बोलतं झाडच जणू काही आलं होतं. अलेक्झांडरचा लळा सर्वांना लागला. त्याच्या लिलांच्या प्रेमात कुणीही घरी आलं तरी पडू लागलं.
तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला कुळकर्णी काका राहायचे.त्यानांही अलेक्झांडरचा लळा पहिल्या दोन दिवसातच लागला. आपल्याही घरी एखादा शेपूटवाला मित्र असावा असं त्यांना वाटू लागलं.बराच शोध घेतल्यानंतर त्यांना हवा तसा हा शेपूटवाला दोस्त मिळला.त्याला ते रिचर्ड नावानं बोलवायचे.
रिचर्ड(द डॉगी)हळूहळू,तेजोमयीच्या घरी येऊ लागला.सुरुवातीला सुरुवातीला अलेक्झांडरला काही तो आवडला नाही.पण एक दोन दिवसात दोघांमध्ये मैत्री झाली.कधीकधी अलेक्झांडर रिचर्डकडे जायचा.दोघेही तिकडे नुसती धम्माल करत.कुळकर्णी काकूंनी अलेक्झांडर आणि रिचर्डमध्ये दुजाभाव केला नाही.तर इकडे तेजामयीच्या आईने दोघांना सारखेच प्रेम दिले.
एकाच वेळी दोघांना दोन दोन आया मिळाल्या.दोघांच्या लाड कौतुकात आणि मोठे होण्यात दिवस भराभर जात होते.अलेक्झांडर आणि रिचर्डची मैत्री दिवसागणित आणखी घट्ट होत गेली.कॉलनीत तर ते दोघे जय आणि विरु म्हणूनच प्रसिध्द झाले.
कुलकर्णी काका रिचर्डला फिरायला घेऊन जात.त्यावेळी त्याच्या गळात रंगिबेरंगी पट्टा ते टाकत.पट्टयाची दोरी हात ठेऊन ते रिचर्डला घेऊन रस्त्याच्या या टोकावरुन त्या टोकावर फिरवून आणत.या काळात रिचर्ड त्याचे शि-सू ठरलेल्या ठिकाणी करुन घ्यायचा.असचं परवा रिचर्डला फिरवून आणत असताना अचानक पाठिमागून एक भटकी कुत्रा आली आणि त्याला कडकडून चावा घेऊन पळाला.बिचारा रिचर्ड वेदनेने विव्हळू लागला.रस्त्यावरच त्याचा तोल गेला….कुळकर्णी काकांनी रिचर्डला रिक्षात टाकले आणि ते जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले.
डॉक्टरांनी रिचर्डला तपासलं.जखम बरीच मोठी होती.त्यांनी ताबडतोब रिचर्डला एक इंजेक्शन दिलं.त्याची जखम स्वच्छ धुतली आणि तिथे औषध लावलं.त्या ठिकाणी पट्टी बांधली.
रिचर्डच्या वेदना जरी कमी झाल्या तरी त्याच्याच्याने चालवेना.त्याला नीट उठता येईना.अशा स्थितीत त्याला घरी घेऊन जाणं योग्य नव्हतं.डॉक्टरांनी रिचर्डला दवाखान्यातच ठेवायला सांगितलं.मोठ्या दु:खद अंत:करणाने कुळकर्णी काकांनी रिचर्डला दवाखान्यातच भरती केलं.
इकडे दिवसभर रिचर्ड न दिसल्याने अलेक्झांडरची तगतगम होत होती.त्याचं खाण्यापिण्यात लक्ष लागले.कितीतरी वेळा तो रिचर्डच्या घरी जाउुन आला.कुळकर्णी काका जेव्हा दवाखान्यात परतले तेव्हा अलेक्झांडर कुळकर्णी काकांच्याच घरी होता.
काका आत आले आणि बसले.रिचर्ड कुठेच दिसेना.तेव्हा अलेक्झांडरने पुन्हा पुन्हा बाहेर डोकावून बघितलं.पण रिचर्ड काही दिसला नाही.त्याची तगमग कुळकर्णी काकांना बघवेना.त्यांनी त्याला उचलले आणि तेजोमयीच्या घरी ते आले.
कुळकर्णी काकांनी आज सकाळी काय प्रकार घडला ते सांगितलं.
अरे बापरे,असं एकाच वेळी तेजोमयी,बाबा आणि आई म्हणाले.अलेक्झांडरने दचकून आईकडे बघितलं.
तो आईला बिलगला..
आता हो काय होणार रिचर्डचं भाउुजी,आईने कुळकर्णीकाकांना विचारलं.
देवालाच ठाऊक..डॉक्टर तर शर्थीचे प्रयत्न करताहेत.
चला,आपण जाऊन बघू या का रिचर्डला.अलेक्झांडरलाही बरं वाटलं.रिचर्ड सकाळपासून दिसला नाही म्हणून तो खूप अस्वस्थ आहे.कशातच त्याचं लक्ष लागत नाही.नीट जेवला सुध्दा नाही तो..आईने कुळकर्णी काकांना सांगितलं.
तयार होऊन सर्वजण रिचर्डला भरती केलेल्या दवाखान्यात आले.
रिचर्डला खोलवर जखम झाली होती.त्याची प्रतिकार शक्ती कमी पडत होती.डॉक्टर त्याच्यावर सर्व उपचार करत होते.पण तो फार काही प्रतिसाद देत नव्हता.
अलेक्झांडरसह कुळकर्णी काका,तेजोमयी आणि तिचे आई बाबा रुग्णालयात पोहचल्यावर अलेक्झांडर भिरभिरत्या नजरेनं इकडे-तिकडे बघू लागला.त्याला रिचर्डचा बरोबर वास आला आणि तो तिकडे धावला.तेजोमयीच्या बाबांनी त्याला कसेबसे थांबवले.सर्वजण रिचर्डला ठेवलेल्या खोलित आले.रिचर्ड निपचित पडून होता.कुळकर्णी काकांनी त्याला हाक मारली.काकूंनीही हाक मारली पण त्याने डोळे काही उघडले नाही.अलेक्झांडरनेही त्याच्या नेहमीच्या पध्दतीने आवाज दिला तरीही रिचर्डने डोळे उघडले नाही..डॉक्टरांनी त्याला हात लावून बघितला तर त्याने श्वास घेणे बंद केल्याचे त्यांच्या लक्षात आले..
त्यांच्याही डोळयात अश्रू आले.त्यांनी कुळकर्णी काकांना,रिचर्डची प्राणज्योत मावळल्याचं सांगितलं.
काका-काकू, तेजोमयीचे बाबा-आई सर्वांना खूप वाईट वाटलं.चौघांच्याही डोळयातून अश्रू वाहू लागले.हे सगळं बघून अलेक्झांडरला काहीच सुचेना.तो आळीपाळीने चौघांकडे बघू लागला.आईने त्याला जवळ घेतले आणि ती त्याला घेऊन रिचर्डजवळ गेली.अलेक्झांडरचा एक पंजा हळूवार रिचर्डच्या अंगावरुन फिरवला..अलेक्झांडर रिचर्डला उठवायचा प्रयत्न करु लागला.त्याने भुंकण्याचाही प्रयत्न केला पण त्याच्या मुखातून आवाजच निघेना..
डॉक्टरांनी ताबडतोब अलेक्झांडरला तिथून न्यायला सांगितलं..दु:खद अंतकरणाने चौघेही घरी परतले.
रिचर्डला दवाखान्याच्या परिसरात पुरण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच अलेक्झांडर अस्वस्थ होता.तो त्याच्या खोलिच्या बाहेर पडला नाही.त्याने काही खाल्ले नाही.जिवलग मित्र दिसत नसल्याचे दु:ख त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते.आता त्याला कसं समजवायचं, हा प्रश्न आईबाबांना पडला.
त्याला सगळं सांगायला हवं.काय घडलं ते.आई म्हणाली.बाबांनी होकार दिला.आईने त्याला मांडिवर घेतलं आणि रिचर्ड आपल्यातून कसा निघून गेला हे समजावून सांगितलं.क्षणाक्षणाला अलेक्झांडरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत राहिले.रिचर्ड आपल्यात आता नाही,असं शेवटचं आई बोलली तेव्हा त्याच्या डोळयातून आसवं पडली.त्याने आईला घट्ट मिठी मारली..पण लगेच त्याला काय झालं कुणास ठाऊक,तो उठला आणि कुळकर्णी काकांच्या घराकडे पळाला.आईबाबाही त्याच्या पाठिमागे निघाले.कुळकर्णी काका आणि काकू दिवाणखान्यात,रिचर्डच्या आठवणी एकमेकांना सांगत अस्वस्थपणे बसले होते.त्यांच्या चेहऱ्यावरची व्यथा जाणवत होती.अलेक्झांडरला दिसताच काकूंना रडूच कोसळलं.अलेक्झांडर त्यांच्याकडे झेपावला आणि त्याने काकूंना मिठी मारली.त्याचा एक पंजा हळूहळू काकुंच्या डोक्यावर गेला.तो हलकेच फिरवू लागला….
सुरेश वांदिले
काकू तुम्ही रडू नका..मी आहे ना ..मी आहे ना.असं तो मुका जीव,त्यांना त्याला जमेल तसं सांगत होता..
ते बघून आतापर्यंत कुळकर्णी काकांनी दाबून धरलेला हुंदका बाहेर पडला…त्यांनी अलेक्झांडरला पोटाशी घेतले आणि आपल्या अश्रूंना वाट करुन दिली.बाबा आई आणि तेजोमयीचेही डोळे पाणावले..
सुरेश वांदिले
