(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

मिलिटरी शाळा ()

लष्करातील भरतीसाठी तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सक्षम आणि समर्थ करण्यासाठी संरक्षण मंत्रालयामार्फत सैनिक शाळा आणि मिलिटरी स्कूल चालवले जातात. सैनिकी शाळांमध्ये सर्वसाधारण नागरिकांच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य दिले जाते. मिलिटरी स्कूलमध्ये लष्कारातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेशामध्ये प्राधान्य दिले जाते.

सैनिकी शाळा

सैनिकी शाळांच्या संकल्पनेची रुजुवात १९६१ साली झाली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी) येथे काही विशिष्ट संवर्गातील व राज्यातील मुलांना प्रवेश मिळत असल्याचे दिसून आल्याने, ही तफावत दूर व्हावी, इतर राज्ये आणि समाजातील सर्वच घटकातील मुले या प्रबोधिनित प्रवेश घेण्यासाठी सक्षम व्हावी, यासाठी सैनिकी शाळा देशभरात उघडण्यात आल्या. या शाळांमध्ये मुलांना शारीरिक आणि बौध्दिकदृष्ट्या सक्षम बनवले जाते. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सैनिक स्कूल सोसायटीमार्फत या शाळांचे संनियंत्रण केले जाते.उच्च श्रेणीच्या अध्ययनाची संधी सर्व घटकातील व तळागाळातील सर्वसामान्य मुलांनाही मिळावी यासाठी या शाळा कार्यरत आहेत.एनडीएतील प्रवेशापासून ते लष्करातील इतर अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत या विद्यार्थ्यांची कामगिरी व उत्कृष्ट व्हावी,त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास व्हावा,या अनुषंगाने अभ्यासक्रमाची संरचना केली आहे.सध्या देशात ३१ सैनिकी शाळा असून महाराष्ट्रात सातारा आणि चंद्रपूर येथे या शाळा आहेत.या सैनिकी स्कूलमधील ६७ जागा संबंधित राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात.हा निवासी अभ्यासक्रम आहे.

प्रवेश प्रक्रिया

भारतातील सैनिक शाळांच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन (अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा) घेतली जाते.

सैनिक शाळेत इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेता येतो.  अर्हता – () वर्ग सहा- वयोमर्यादा ३१ मार्च रोजी १० ते १२ वर्षं , संबंधित विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत पाचव्या वर्गात शिकत असावा. () वर्ग नऊ – वयोमर्यादा ३१ मार्च रोजी, १३ ते १५ वर्षं. संबंधित विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत आठव्या वर्गात असावा. चाळणी परीक्षेतील गुणांवर आधारित निवड केली जाते.

अशी असते परीक्षा-

प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. सहावीच्या पेपरची भाषा इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असते. (उदा.- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्रजी / हिंदी आणि मराठी भाषेतील पेपर मिळतो.) मात्र ९ वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पेपरची भाषा फक्त इंग्रजी असते. वर्ग सहाच्या पेपरमध्ये १२५ प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न सामान्य ज्ञान (एकूण प्रश्न-२५ /प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण), गणित (एकूण प्रश्न- ५० / प्रत्येक प्रश्नाला ३ याप्रमाणे १५० गुण), भाषा (एकूण प्रश्न-२५/ प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण) आणि बुध्दिमत्ता चाचणी (एकूण प्रश्न-२५/ प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५०) यावर आधारित असतात. एकूण गुण ३००.

 वर्ग नऊच्या पेपरमध्ये १५० प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न सामान्य ज्ञान (एकूण प्रश्न-२५/ गुण प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण), गणित (एकूण प्रश्न-५०/ प्रत्येक प्रश्नाला ४ याप्रमाणे २०० गुण), भाषा आणि बुध्दिमत्ता चाचणी (एकूण प्रश्न-२५ / प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण) आणि सामाजिक अभ्यास/शास्त्रे (सोशल सायन्स/ स्टडीज) (एकूण प्रश्न-२५/ प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण) यावर आधारित असतात. एकूण गुण ४००,

या परीक्षेमध्ये प्रत्येक संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान गुण निर्धारित केले जातात. हे गुण मिळालेले विद्यार्थी पुढच्या टप्प्यासाठी म्हणजेच वैद्यकीय चाळणीसाठी पात्र होतात. अंतिम निवड या दोन्ही बाबींवर केली जाते. सैनिकी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक ठरते.

प्रवेश परीक्षेच्या पेपरमध्ये सीबीएसईच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन)अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. सध्या राज्य माध्यमिक बोर्डाचाही अभ्यासक्रम, सीबीएसईच्या धर्तीवरच बेतला असल्याने, महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ही परीक्षा कठीण जाऊ नये. तथापि विद्यार्थ्यांच्या विषय घटकांच्या संकल्पना स्वयंस्पष्ट असणे आवश्यक ठरते.

सैनिकी शाळेतील अभ्यासक्रम हा सेंकडरी बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनशी संलग्नित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची एनडीए (नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) व इतर परीक्षांची तयारी अभ्यासक्रमाच्या काळात होणे सुलभ जाते.

संपर्क () प्राचार्य, सैनिकी शाळा सातारा, पोस्ट बॉक्स क्रमांक२०,पीन४१५००१, दूरध्वनी०२१६२२३५८६०, संकेतस्‍थळwww.sainiksatara.org,ईमेलsainikss@rediffmail.com () सैनिकी शाळा चंद्रपूर, भिवकूंड, तालुकाबल्लारपूर , पिन ४४२७०१, दूरध्वनी०७१७२२९७९६३ संकेतस्थळhttps://sainikschoolchandrapur.com/ ईमेलsscn2019@gmail.com

०००

राष्ट्रीय मिलिटरी स्कूल

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची स्थापना १९५२ साली करण्यात आली. लष्करातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना पब्लिक स्कुलच्या दर्जाचे शिक्षण मिळणे शक्य व्हावे, हा त्यामागचा हेतू होता. या स्कूलमध्ये प्राधान्याने लष्करातीलच व्यक्तिंच्या मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला जात असला तरी अल्पप्रमाणात सर्वसाधारण नागरिकांच्या मुलांनाही प्रवेश दिला जातो. २००७ साली या स्कूलला राष्ट्रीय मिलिटरी स्कूल हे नाव देण्यात आले. शीलम परम् भूषणम, या तत्वाला अंगिकारुन या सर्व स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण केली जाते.

   प्रवेश प्रकिया

   या शाळांमधील वर्ग ६ आणि ९ मधील प्रवेशासाठी सामायिक परीक्षा- कॉमन एंट्रस टेस्ट (सीईटी) दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतली जाते. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रावर घेण्यात येते. ही परीक्षा संगणकआधारित (कॉम्प्युटर बेस्ड) आहे.

() सहावी प्रवेशासाठी परीक्षा पध्दत

वर्ग ६ च्या प्रवेश चाळणी परीक्षेत बुध्दीमत्ता चाचणी (गुण- ५०), सामान्य ज्ञान (गुण- ५०), गणित (गुण- ५०), आणि इंग्रजी (गुण- ५०),यावर आधारित असते. एकूण दोनशे गुणांचे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे हे प्रश्न असतात. हे प्रश्न ५ व्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर विचारले जातात. मुलाखतीसाठी २० गुण असतात.

शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून वर्ग ५ किंवा  वर्ग ६ ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या  चाळणी परीक्षेला बसू शकतात. तथापी ५ व्या वर्गात  शिकणारे विद्यार्थीसुध्दा या  चाळणी परीक्षेस बसू शकतात. वर्ग ६ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांचे वय १ जुलै  रोजी १० वर्षापेक्षा कमी  आणि ११ वर्षापेक्षा जास्त नसावे.

() नववी प्रवेशासाठी परीक्षा पध्दत

    ९ व्या वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा ८ व्या वर्गाच्या दर्जाची असते. या परीक्षेत दोन पेपर असतात. () पेपर एक- हिंदी (गुण- २०), सामाजिक शास्त्रे (गुण- ३०) आणि इंग्रजी (गुण- ५०) , () पेपर दोन- गणित (गुण- ५०) आणि विज्ञान (गुण- ५०), या विषयांचे प्रश्न विचारले जातील. () मुलाखत- ५० गुण.

९ व्या वर्गात प्रवेश  घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनमान्य शाळेतून ८ वी इयत्ता उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यंदा ८ वीत असलेले विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी बसू शकतात. वर्ग ९ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांचे वय १ जुलै  रोजी १५ वर्षापेक्षा कमी  आणि १६ वर्षापेक्षा जास्त नसावे. शहीद झालेल्या जवान/ अधिकारांच्या पाल्यांसाठी ६ महिन्यांची सूट दिली जाते.

०००

शिष्यवृत्ती

इंटरनॅशनल अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशीप

ब्रिटनमधील शेफिल्ड विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशीप शिष्यवृत्ती दिली जाते. कला, मानव्यशास्त्र, सामाजिकशास्त्रे या शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी २००० पौंड आणि अभियांत्रिकी, विज्ञान, वैद्यकीय, दंतकशास्त्र या अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी २५०० पौंडाची  शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी दरवर्षी चांगले गुण मिळणे आवश्यक आहे. १८ जून २०२१ पर्यंत या विद्यापीठातील प्रवेश निश्चित केल्यासच ही शिष्यवृत्ती मिळू शकेल. या विद्यापीठात प्रवेश घेतल्याबरोबर ही शिष्यवृत्ती लागू होते. त्यासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज भासत नाही.

संपर्क- www.sheffield.ac.uk

सुरेश वांदिले

०००