मुंगी पुराण
राष्ट्राध्यक्षांच्या महालात एके दिवशी,ते आणि त्यांचे कुटुंबीय नास्ता करत असताना, टेबलवर दोन मुंग्या राष्ट्राध्यक्षांना दिसल्या.
ई…त्यांच्या मुलाने मुंग्यांकडे बघत ई केलं. त्यांच्या पत्निने नाक मुरडले.
महालाभवती इतकी प्रचंड सुरक्षा असताना या मुंग्या इथे आल्याच कशा?राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी त्यांच्यावर खेकसल्या.
ते बघून राष्ट्राध्यक्ष चेकाळले. त्यांनी ताबडतोब प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यास बोलावणं धाडलं.
या मुंग्या आल्याच कशा महालात, इतका बंदोबस्त असताना? ते त्याच्यावर ओरडले.
पण सर, कुठे आहेत मुंग्या…त्याने भीत भीत विचारलं.
अरे, तुझे डोळे खराब झाले की काय? हे बघ…असं जोरानं ओरडत राष्ट्रध्यक्षांनी मुंग्याकडे बोट दाखवलं.
पण सर, इथे तर काहीच नाही.सुरक्षा प्रमुख म्हणाले.
राष्ट्राध्यक्षांनी काळजीपूर्वक बघितलं. तिथे मुंग्या नव्हत्या. आपला कार्यभार संपवून म्हणजेच आपल्याला हवं तेवढं अन्न घेऊन मुंग्या कधीच्या दुसरीकडे निघून गेल्या होता.
राष्ट्राध्यक्षांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच मुंग्याचां शोध घेण्याचा आदेश काढला. आपल्याच राष्ट्रातील नव्हे तर सगळया जगातील मुंग्यांचा शोध घेण्याचे फर्मान त्यांनी सोडले. त्यासाठी त्यांनी भरपूर निधी उपलब्ध करुन दिला. महिन्याभरात शोध घ्या अन्यथा प्रशांत महासागरात बुडण्यासाठी तयार रहा, असा धमकीवजा आदेशच त्यांनी काढला.
आले राष्ट्राध्यक्षांच्या मना, त्याला कोण काय करणार?
मुंग्याचा शोध घेण्यासाठी मग जगाच्या चारही दिशेला मोहीम निघाली. शेकडो माणसं , यंत्रसामग्री पाठवण्यात आली. मुंग्याचे अभ्यास करणारे काही कीटकशास्त्रज्ञ या पथकांमध्ये होते. महिनाभर रात्रंदिवस सगळेजण मुंग्यांचा शोध घेत होते.
या शोधात त्यांना आढळलं की अंटार्टिका खंड सोडला तर मुंग्या सगळयाच खंडात आहेत. जिथे मनुष्यप्राणी राहू शकत नाही तिथे सुध्दा त्या आहेत. त्यांची अंदाजे संख्या त्यांनी काढली २० क्वाड्रिलियन. म्हणजे २० आणि त्यानंतर १५ शून्य! याचा अर्थ अबाबाबा करायचा लावणारी ही संख्या. त्यांनी हिशोब काढला तर सध्या मानवाची संख्या लक्षात घेतली तर पृथ्वीवर एक मानवाच्या पाठीमागे अडीच दशलक्ष मुंग्या असतात. पुन्हा अबाबाबा करायला लावणारी संख्या. त्यांचा जीवभार (बायोमास) हा मानसाच्या जीवभारापेक्षा २० टक्के अधिक इतका. त्याचं वजन होत १२ मेगॅटोन. गिझा येथील दोन पिरॅमिडच्या वजना इतकं. जगातील कोणत्याही पर्यावरणात राहण्याची त्यांची क्षमता अदभूत अशीच. त्यामुळेच ते जगातील पर्यावरण संतुलनात आणि परीसंस्थेला सक्षम करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग.
या परीसंस्थेला सक्षम करण्यासाठी या मुंग्याचं कार्य अभियांत्रिकी सारखं असतं. मुंग्या बीबियांना इकडे-तिकडे पसरवतात. मातीची घुसळण करतात. विघटनाच्या प्रक्रियेला गती देतात. त्या आपल्या चाऱ्यासाठी किंवा अन्नासाठी धाडी टाकतात. शिकारसुध्दा करतात. थोडक्यात काय तर आपल्या परीसंस्थेला हलतं-डुलतं ठेवतात.
या मोहिमेच्या शास्त्रज्ञांनी आपले निष्कर्ष लिहून काढले. आता हे राष्ट्राध्यक्षांना सांगायचं कसं? सांगितलं तर आपला राष्ट्राध्यक्ष जगातल्या मुंग्यांनाच ठार करण्याचा आदेश द्यायचा! अशी भीतीही त्यांना वाटली.
राष्ट्राध्यक्षांनी दिलेली महिन्याभराची मुदत संपत आल्याने सर्वांना राष्ट्राध्यक्षांपुढे हजर व्हावे लागले.
सर्वांचे चेहरे पडले होते. ते बघून राष्ट्राध्यक्ष काळजित पडले.
काय झालं? त्यांनी मोहीम प्रमुखांना विचारलं.
सरं, आम्ही मुंग्यांचा शोध घेतला, पण…
पण काय?
सर, कस सांगावं हा प्रश्न पडला आमच्यापुढे?
इतका गंभीर प्रश्न आहे का?
मुंग्याचा नाही सर?
मग?
त्यांच्याविषयी आम्ही माहिती दिल्यावर तुमची प्रतिक्रिया काय राहील याची चिंता वाटते. प्रमुख भीत भीत म्हणाला.
या बोलण्याची राष्ट्राधक्षांना चिड आली. त्यांनी त्या प्रमुखावर बंदुक रोखली. हे बघून घाबरलेल्या शास्त्रज्ञांनी धाडधाड माहिती सांगायला सुरुवात केली.
ती एकताना राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे बदलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील चिडण्याचे आणि रागावण्याचे भाव जाऊन कौतुकाचे भाव प्रगट होऊ लागले. माहिती सांगून झाल्यावर काहीक्षण शांततेत गेले. टाचणी पडली तरी आवाज झाला असता. अशी ती शांतता होती.
पण या शांतेतला, मदर मुंगीचा जयजयकार असो, या घोषणेने छेद दिला. सर्वजण थक्क झाले. त्यांच्या डोळयावर आणि कानावर विश्वासच बसेना. कारण ही घोषणा खुद्द राष्ट्राध्यक्ष देत होते.
म्हणजे सर! प्रमुख कसा बसा बोलला.
अरे, तुम्ही इतके घाबरता कां? तुम्ही समजता इतका मी दुष्ट नाही बरं का! मदर मुंगी आपल्या सर्वांच्या हितासाठी किती उपयुक्त आहे हे माझ्या लक्षात आल ही तुमची माहिती ऐकून.
राष्ट्राध्यक्ष शोध मोहिमेच्या सर्वांचं कौतुक करत म्हणाले. महालात येणाऱ्या मुंग्यांना सन्मानानेच वागण्यात यावे असा फतवा त्यांनी त्याच दिवशी काढला.
सुरेश वांदिले