साता समुद्रापलीकडील शिक्षण म्हण्णजेच अमेरिका-ब्रिटन-कॅनेडा-ऑर्स्टेलिया-स्वीडन-स्वीत्जर्लंड-इटली-फ्रांस-नेदलँडस-जर्मनी अशासारख्या देशांमध्ये शिकण्याची इच्छा अनेक प्रज्ञावंत आणि महत्वाकांक्षा मुला – मुलींना असते. या देशातील शिक्षणाचा खर्च हा फार मोठा असल्याने अपवाद वगळता पालकमंडळी मुलींना परदेशातील शिक्षणासाठी पाठवण्यासाठी धजावत नाही.मात्र आता त्याची काळजी करण्याची गरज नाही,कारण महाराष्ट्र शासनामार्फत परदेशातील उच्च शिक्षणासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारांनाही परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या निर्णय घेतला आहे.यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिष्यवृत्तीसाठी निवड करताना 30 टक्के जागांवर महिलांना प्राधान्य दिलं जातं. या शिष्यवृत्तीसाठी लाभ घेऊ इच्छिणा-या उमेदवारांना जागतिक पातळीवर पहिल्या 200 क्रमांकात असणाऱ्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळणं आवश्यक ठरतं. ही क्रमवारी टाइम्स हायर एज्युकेशन (THE) किंवा क्वॅकक्वारेल्ली सायमंडस (QS) या दोन पैकी कोणत्याही एका संस्थेने निर्धारित केलेली असावी.
या शिष्यवृत्तीअंतर्गत पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी 30 आणि पीएचडीसाठी निवड झालेल्या उमदेवारांसाठी 10 अशा एकूण 40 शिष्यवृत्ती आहेत. यामध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी – ३ आणि पीएचडीसाठी-१, वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी – ३ आणि पीएचडीसाठी-१,विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी – ३ आणि पीएचडीसाठी-१, व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी – ३ आणि पीएचडीसाठी-१, विधि शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी – ३ आणि पीएचडीसाठी-१, अभियांत्रिकी/वास्तुकला शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी – १२ आणि पीएचडीसाठी-४ आणि औषधीनिर्माण शास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी – ३ आणि पीएचडीसाठी-१ अशा संख्येत शिष्यवृत्ती दिली जातील.
शिष्यवृत्ती
या शिष्यवृत्तीमध्ये संबंधित उमेदवाराला प्रवेश मिळालेल्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्काचा समावेश आहे. ही रक्कम तंत्रशिक्षण विभागामार्फत संबंधित संस्थेला थेट अदा केली जाते. (परदेशातील शिक्षण संस्था किंवा विद्यापीठाच्या प्रवेश पत्रात नमूद शैक्षणिक शुल्कात भविष्यात काही कारणास्तव वाढ झाल्यास वाढीव रक्कम दिली जाईल. मात्र त्यासाठी संबंधित देशातील भारतीय उच्चायुक्तांची शिफारस आवश्यक राहील.) या उमेदवारांचा परदेशातील कालावधीसाठीचा निर्वाह भत्ता, परदेशातील त्याच्या बँक खात्यात जमा केला जाईल. त्यासाठी त्याला भारतात राष्ट्रीयकृत बँकेत आणि परदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे बंधनकारक आहे. याच खात्यावर त्याची शिष्यवृत्ती डिजिटली अदा केली जाईल. ही रक्कम संबंधित संस्थेनं ठरवलेली अथवा शासनानं निर्धारित केल्याप्रमाणे असेल.
अभ्यासक्रमांचे विषय
अभियांत्रिकी शाखेमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, प्रॉडक्शन, इंडस्ट्रिअल, एनव्हीरॉन्मेंटल, पेट्रोकेमिकल, मायनिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिक्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन सिस्टिम/ इन्फॉर्मेशन सायंस/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर लॉ/सायबर सिक्युरिटी, बायोमेडिकल इंजिनीअरिंग, क्लायमेट चेंज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्किटेक्चर अशा 21 विषयांचा सध्या समावेश आहे.
व्यवस्थापन शाखेत एमबीए (फायनांस, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, सिस्टिम ॲनॅलिीसीस) आणि हॉटेल मॅनेजमेंट या विषयांचा समावेश आहे.
विज्ञान शाखेत- कृषी, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सामान्य विज्ञान, पशुवैद्यकीय, उद्यानविद्याशास्त्र या विषयांमध्ये शिष्यवृत्ती मिळू शकते. (या शिष्यवृत्ती अंतर्गत विज्ञान/अभियांत्रिकी शाखेतील विषय ढोबळ मानाने ठरवण्यात आले असले तरी सध्याच्या काळातील नव्या उदयमान विषयांचा सुध्दा विचार केला जाऊ शकतो. या विषयांमध्ये ॲटमोस्फेरिक सायंस, ॲडॅप्टेशन ॲण्ड मिटिगेशन ऑफ क्लायमेंट चेंज, ॲटोमेशन ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रिन्युएबल एनर्जी, एनर्जी इफिसियंसी टेक्निक्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, बेसिक ॲनॅलिटिक्स आदींचा समावेश आहे.)
कला आणि वाणीज्य शाखेमध्ये समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि वाणीज्य विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी किवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे.
अटी आणि शर्ती
(१) या शिष्यृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या पालकांचं सर्व स्त्रोतांव्दारे मागील वर्षाचं उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावं संबंधित उमेदवार नोकरी करत असल्यास त्याचेही उत्पन्न या मर्यादेत धरलं जातं. (विद्यार्थी आणि पालक दोघेही नोकरी करत असल्यास शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करताना उमेदवारा आणि पालक यांचे आयकर विवरण पत्र, फॉर्म नंबर 16 आणि तहसिलदार किंवा नायब तहसलिदार यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. इतर उमेदवारांना मात्र उपरोक्त नमूद श्रेणीच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं, मागील आर्थिक वर्षाचं कुटुंबाचं सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं.)
(२) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास पदवी परीक्षेत आणि पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारास पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळणं आवश्यक.
(३) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवाराचं वय 1 जुलै रोजी कमाल 35 आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलीचं कमाल वय 40 असलं पाहिजे. दोन्ही अभ्यासक्रम विहीत कालावधित पूर्ण करणं बंधनकारक आहे.
(४) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. हा कालावधी साधारणत: पीएचडीसाठी 4 वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी 2 वर्षे आणि पदव्युत्तर पदविकेसाठी 1 वर्षे असावा किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी जो कमी असेल तो, ग्राह्य धरला जातो.
(५) ही शिष्यवृत्ती कुटुंबातील एकाच सदस्याला फक्त एकदाच दिली जाते.
(६) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित उमेदवारांनी टॉफेल (टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज फॉरेन लँग्वेज), जीआरई (ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन) या दोन परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतील गुणांचा आधार घेऊन परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश दिला जातो.
(७) अनकंडिशनल ऑफर लेटर (कोणत्याही अटींशिवाय/विनार्शत प्रवेशपत्र) मिळालेल्या मुलींनाच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. परदेशात जाण्यापूर्वी पासपोर्ट(पारपत्र) आणि व्हिजा मिळवण्याची प्रकिया या उमेदवारास स्वत: करावी लागते. त्यासाठी संबंधित उमेदवारास स्वत: खर्च करावा लागतो. ज्या शैक्षणिक संस्थेत आणि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, त्याच कारणासाठी व्हिजा घेणे बंधनकारक ठरते.
(८) शिष्यवृत्तीमध्ये नियमित अभ्यासक्रमाच्या शुल्काव्यतिरिक्त इतर कोणताही अभ्यासक्रम वा प्रशिक्षणावरील खर्च दिला जाणार नाही. या शिवाय भाषेचं शिक्षण, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर प्रवास, संशोधन, पुरक शैक्षणिक साहित्य, क्षेत्रीय भेटी, कार्यशाळेतील सहभाग, इंटर्नशीप, संगणक खरेदी यासाठीचा खर्च शिष्यवृत्तीत समाविष्ट नाही.
कार्यपध्दती
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराच्या निवडीसाठी शासनाने कार्यपध्दती निर्धारित केली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. ही यादी तयार करताना १० वी, १२ वी , पदवी , पदव्युत्तर पदवी आणि प्रवेश मिळालेल्या संस्थेची THE किंवा QS संस्थेने जाहीर केलेली क्रमवारी लक्षात घेतली जाते.(उदा- एखाद्या उमेदवारास दहावी आणि १२ वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास त्याच्या गुणांचे मूल्यांकन प्रत्येकी १० ,पदवी परीक्षेत ८० टक्क्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास गुणांचे मूल्यांकन ३० आणि THE किंवा QS ची श्रेणी १ ते ५० असल्यास गुणांचे मूल्यांकन ५० असे केले जाते. याचा अर्थ दोन उमेदवारांना एकाच संस्थेत प्रवेश मिळाला असल्यास ज्या उमेदवाराचे १० वी १२ वी आणि पदवीतील गुण हे दुसऱ्यापेक्षा अधिक असल्यास त्याच्या गुणांचे मूल्यांकन अधिक होऊन तो किंवा ती गुणवत्ता यादित वरच्या क्रमांकावर जाईल.)
या शिष्यवृत्तीसाठी जाहिरात दिली जाते. साधारणत: एक महिन्याचा कालावधी अर्ज सादर करण्यासाठी दिला जातो. अर्ज ऑनलाइन सादर करावे लागतात. आलेल्या अर्जातून गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड शासनाच्या उच्चस्तरीय समिती मार्फत केली जाते. पीएचडी अभ्यासक्रमासाठी एखाद्या शाखेतील उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्या वर्षापुरती ती जागा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून भरली जाते. हेच तत्व पदव्युत्तर पदवी /पदविका अभ्यासक्रमासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाही तर अवलंबले जाते. या जागा संबंधित विषयातील पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जातात.
संपर्क – संचालक तंत्र शिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, पोस्ट बॉक्स क्रमांक १९६७, मेट्रो चित्रपट गृहाच्या विरुध्द दिशेला, दूरध्वनी- ०२२-२२६४११५०, मुंबई- ४००००१, http://www.dtemaharashtra.gov.in/आणि foreignschlolarship2023 dtemaharashtra.gov.in
000