(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मॅग्नेटची मदत     

एक

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र ॲग्रीबिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेला आशियाई विकास बँकेचं अर्थसाहाय्य प्राप्त झालं आहे.

या संस्थेमार्फत शेतकऱ्यांमधील उद्योजकतेला प्रेरणा मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यासाठी तांत्रिक ते आर्थिक साहाय्य केलं जातं. याच अनुषंगानं, रोपवाटिका उभारणी (नर्सरी डेव्हलपमेंट) आणि उती संवर्ध प्रयोगशाळा (‍‍‍टिश्यू कल्चर युनिट) उभारणीसाठी अर्थसाहाय्य केलं जाणार आहे.

रोपवाटिका उभारणीच्या प्रकल्पात सिताफळ, पेरु, संत्री, डाळिंब, चिक्कू, मोसंबी, हिरवी आणि लाल मिरची व फुलपिके यांचा समावेश आहे. तर उतीसंवर्धन प्रयोगशाळा उभारणी प्रकल्पामध्ये केळी, स्ट्रॉबेरी, पेरु, डाळींब आणि फुलपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

अर्ज प्रक्रिया

या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा अर्ज, लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया, पात्रतेचं निकष, पात्र आणि अपात्र घटक, अर्थसाहाय्याचं स्वरुप, मूल्यांकन निकष, कागदपत्रांची तपासणी यादी, विविध प्रपत्रे यांची विस्तृत माहिती, मॅग्नेट संस्था आणि पणन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यासाठी या संकेतस्थळावरील मुखपृष्ठ (होम पेज) च्या खाली जावं लागेल. तिथे निविदा दरपत्रक, अशा शीर्षकाची बटन असून त्याच्या बाजूला, व्ह्यू ऑल, ही दुसरी बटन आहे. या बटनवर क्लिक केल्यावर निविदा/ दरपत्रक अशी खिडकी/ चौकट (विंडो) खुली होते. या चौकटितील क्रमांक ३ वर इओआय ॲण्ड गाइड लाइन्स फॉर नर्सरी डेव्हलपमेंट ॲण्ड टिश्यू कल्चर लॅब अंडर मॅग्नेट प्रोजेक्ट, अशी संपर्क साखळी (लिंक) दिसते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर संस्थेचं नाव (नेम ऑफ ऑर्गनायझेशन), संपर्क व्यक्ती (कांटॅक्ट पर्सन), संस्थेचा पत्ता (कांटॅक्ट ऑफ ऑर्गनायझेशन), दूरध्वनी, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल आयडी, ही माहिती भरण्यासाठीची चौकट/खिडकी खुली होते. संपूर्ण माहिती भरुन झाल्यावर, सबमीट (सादर करा/पुढे पाठवा) बटनवर क्लिक केल्यावर निविदा प्रक्रिया व संपूर्ण माहिती आपल्यासमोर येते.

ही माहिती भरणे सुलभ असून काही अडचणी येत असल्यास संस्थेच्या दूरध्वनीचा उपयोग करुन आपली नेमकी अडचण संबंधितांना सांगावी. या अडचणीचं निराकरण करण्यात येतं.

या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२३ आहे.

संपर्क- ३८६/२, १० वा मजला, शारदा चेंबर्स, शंकरशेठ रोड-पुणे, ४११०३७, ईमेल- projectadb@msamb.com, संकेतस्थळ- msamb.com आणि www.magnetadb.com, , दूरध्वनी-०२०-६७०६००००

०००००

दोन

मॅग्नेट संस्थेच्या वतिनं शेतकरी शेतकरी भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था,  शेतकरी उत्पादक कंपनी, संकलक, प्रक्रियादार, मूल्य साखळी/वाहतुकदार निर्यातदार यांना उद्योग वाढीसाठी वा उद्योगाच्या विविध गरजा भागवण्यासाठी वित्तीय भागिदार संस्थांमार्फत कर्ज पुरवठ्याची योजना राबवली जाते. हे अर्थसाहाय्य डाळींब, केळी, संत्रे, पेरु, चिकू, मोसंबी, चिकू, सिताफळ, स्‍ट्राबेरी, लाल व हिरवी मिरची, भेंडी व फुले यांचा उद्योग/ व्यवसाय/ प्रक्रिया/ वाहतूक या बाबींना मिळू शकतं. या योजनेंर्तगत पुढील सहा वर्षात दोन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचं निर्धारित करण्यात आलं आहे.

याघटकांशी निगडीत शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्यसाखळी गुंतवणुकदार यांना कर्जस्वरुपातील अर्थसाहाय्य मिळण्यात बऱ्याच अडचणी जातात. ही अडचण दूर करण्यासाठी संस्थेमार्फत कमी व्याजदरात वित्तीय संस्थांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. वित्तीय संस्थांनी, मुदत कर्ज आणि खेळत्या भांडवलासाठी कर्ज स्वरुपात इच्छूक लाभार्थ्यांना साहाय्य करावं असं अपेक्षित आहे. कमी व्याजदराच्या मुदत कर्जामुळे शेतकरी उत्पादक संस्था आणि इतर घटकांना मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उपप्रकल्प उभारणं सुलभ होऊ शकतं. खेळत्या भांडवलाच्या उपलब्धतेमुळे अशा कंपन्या किंवा घटकांना कामकाजासाठी लागणारं वित्तीय साहाय्य तत्काळ उपलब्ध होऊ शकतं.

वित्तीय भागीदार संस्थेची निवड मॅग्नेट आणि आशियाई विकास बँकेमार्फत केली जाते. सध्या बँक ऑफ इंडिया (एन बी. जी. वेस्ट-II, ५९२ (नवीन) सदाशिवपेठ, ४था मजला, बी. ओ. आय. बिल्डींग, लक्ष्मी रोड, पुणे – ४११ ०३०
दूरध्वनी : ०२० – २४४५११९३
ईमेल: nb.west2@bankofindia.com) आणि समुन्नती फायनांशिअल इंटरमेडिएशन ॲण्ड सर्व्हिसेस प्रॉयव्हेट लिमिटेड (बेद हायटेक पार्क, १२९-बी, ८ वा मजला, इसीआर रोड, थीरुवनमीयर,  चेन्नई – ६०० ०४१
दूरध्वनी:  ०४४ – ६६७६२४००
ईमेल: info@samunnati.com) या दोन संस्थांची निवड करण्यात आली आहे.

सुरेश वांदिले