(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मालकीनबाईंचा आज मूड काही चांगला दिसत नव्हता. सारख्या येरझाऱ्या करत होत्या. असं करता करता, त्या कपाटातील भांड्यांकडे बघायच्या. मार्गारेट मावशीला मालकीनबाईंची अस्वस्थता बरोबर जाणवत असे. अशावेळी, त्यांच्यासोबत इकडूनतिकडे फेऱ्या मारल्या की, त्यांना किंचित बरं वाटायचं. फेऱ्या मारता मारता कधीतरी त्यांचं लक्षं मार्गारेटकडे जायचं. मग, त्या तिला उचलून घेत नि, सांगू लागत, “मार्गे, हे असं आहे बघ, ते तसं झालं बघ. तूच सांग आता काय करायचं बाई.” मार्गारेटसुध्दा आज्ञाधारकपणे डोळयात तेल घालून नि कान मोठे करुन ऐकत असे. मालकीनबाईंना मार्गारेटशी बोलून बरं वाटत असावं. पण, मालकीनबाईंचा मूड कधी जाईल, याचा काही भरवसा नसे. कारण एकदीड मिनिटं मार्गारेटशी प्रेमानं बोललं की लगेच, त्या तिला धाडदिशी सोफ्यावर ठेवत नि म्हणते, “मार्गे, हे तुला सांगून काय उपयोग म्हणा.” आजही तसंच घडलं.

नेमकं काय झालं, असं विचारावसं वाटून, मार्गारेटने, मँऊ मँऊ करुन मालकीनबाईंचं लक्षं वेधण्याचा प्रयत्न केला.

“अगं मार्गे, तुला सांगून काय उपयोग? ही भांडी दिसतातना, चांदिची आहेत. मोठ्या हौसेने घेतली होती बाई. बराच खर्चही केला. पण, ही भांडी सारखी सारखी काळी पडतात. काय दुर्बध्दी झाली नि ही भांडी घेतली बघ.” असं सांगून, मालकीनबाईंनी मार्गारेटला धाडदिशी सोफ्यावर टाकलं नि त्या पाय आपटत बेडरुममध्ये गेल्या. धाडदिशी दरवाजा बंद करण्याचा आवाज आला. पुढचे दोन तीन तास, त्यांची झोपण्याची ती खूण होती.

रॉबिन्सन मामा या क्षणाचीच वाट बघत होता. मालकीनबाई कधी बेडरुममध्ये जातात नि कधी आपण बिळाच्या बाहेर येतो, असे त्याला झाले होते. मालकीनबाईंनी मार्गारेटला धाडदिशी सोफ्यावर टाकल्याचं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. खरंतर त्यांनी तिला फरशीवरच धाडदिशी टाकलं असतं तर तिचं डोकं फुटून मस्त मज्जा आली असती, असं त्याला वाटलं. पण हा दुष्टपणाचा विचार त्याने लगेच बाजूला सारला नि,सॉरी सॉरी म्हणत तो बिळातून बाहेर येऊन, सोफ्यावर चढला.

“रॉब्या, तू कशाला सॉरी फॉरी म्हणतोस, ज्यांनी सॉरी म्हणायला हवं, त्यातर ढाराढूर झोपल्यातना.” रॉबिन्सचा कान उपटत मार्गारेट म्हणाली.

“मावशे, अगं, मी त्यांच्याच वतिने सॉरी म्हणत होतो. तुला त्यांनी किती धाडदिशी आपटलं या सोफ्यावर. दुष्टाडली मेली! पण, मावशे मला हे कळलं नाही, त्यांना एव्हढा राग आला तरी कशाचा? ”

“अरे, त्या सारख्या कपाटातल्या भांड्यांकडे बघत होत्या.”

“म्हणजे त्यांच्या रागाचं कारण, त्या भांड्यात तर दडल नाहीना?” कपाटाच्या दिशेने उडी मारत रॉबिन्सन म्हणाला. मावशीही कपाटाकडे आली. कपाटातील बहुतेक भांडी काळ्या रंगाची झाली होती.

“तुझ्या लक्षात आलं का राब्या?”

“अरे, ही भांडी काही दिवसांपूर्वी कशी छान चकचकित होती. चमचम करत होती. आता काळी पडलीय.”

“म्हणजे जादू की भुताटकी? याचाच तर राग नसेल ना आला मालकिनबाईंना.”

“मी तर काहीच केलं नाही.”

“मावशे, असं जर नसेल तर मग, ही भांडी काळी पडण्याचं रहस्य शोधलंच पाहिजे. त्यासाठी तू जेम्सबाँड झालीच पाहिजे.” रॉबिन्सनने डोळे मिचकावित मार्गारेटला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं.

“हं, तू म्हणतोस ते खरय. शोध तर घेतलाच पाहिजे.” मावशी नाक फुगवत म्हणाली. तिने काळजीपूर्वक कपाटातील भांडी बघितली. ती सगळी चांदिची भांडी होती. मालकीनबाईंनीसुध्‍दा तिला तेच सांगितलं होतं. पांढरी शुभ्र, चकचकित असणारी ही भांडी काळी कशी झाली असेल, या विचारात मावशी गढली. तिने डोळे मिटले. मेंदूला माहितीच्‍या महाजालात पाठवले. क्षणात डोळे उघडून आनंदाने उडी मारत तिने रॉबिन्सनची पप्पी घेतली.

“म्हणजे, माझ्या या स्मार्ट मावशीला उत्तर मिळालं म्हणायचं.”रॉबिन्सन मिशी हलवत म्हणाला.

“माम्या, मार्गारेटपासून काहीच लपून राहू शकत नाही.”

“म्हणूनच तर तू ग्रेट आणि मी तुझा लाडका पेट ना मावशे! आता, मलाही जरा हे रहस्य जरा सांगूनच देना.”

“माम्या, ही भांडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी चांदी, आर्जेन्टाइन खनिजातून प्राप्त करतात. हे आर्जेन्टाइन म्हणजे सिल्व्हर सल्फाईड. ते चांदिचं संयुग समजलं जातं.”

“पण त्याचा आणि चांदिच्या काळ्या होण्याचा काय संबंध?”

“अरे, हवेमध्ये सल्फरडाय ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड हे वायू असतात. त्यांचा संपर्क चांदिशी जेव्हा होतो, तेव्हा चांदिचं त्या संयुगात रुपांतर व्हायला मदत होते. त्यांचा रंग काळा असल्याने, चांदिच्या पृष्ठभागावर काळी पुटं जमतात. ही काळी पुटं, चांदिचा पांढरा शुभ्र चकचकित रंग झाकोळून टाकतात.”

“याचा अर्थ, सगळी भानगड, हा जो कुणी सल्फर नामे, संयुग घडवतो म्हणायचा.”

“माम्या भानगड नाहिरे. ही एक रासायनिक क्रिया आहे. अंडी, बऱ्याच फळांचे रस, व्हिनेगार, ऑलिव्ह फळे, लोकर, रबर यामध्येही सल्फरची संयुगं असतात. त्यांच्याशीसुध्दा चांदिचा संपर्क झाला तरी, चांदी काळी पडते.”

“याला काही उपाय नाहीका?”

“आहेना, चांदिच्या भांड्याचा संपर्कच हवेशी किंवा सल्फराचे संयुग असलेल्या, भांडी किंवा वस्तू यांच्यासोबत येऊ द्यायचा नाही.”

“त्यासाठी काय करावं लागेल?”

“या भांड्यांना हवाबंद डब्यात ठेवायला हवित किंवा मग त्यांना सतत स्वच्छ करायला हवित. तसे केल्याने सिल्व्हर सफ्लाइडचा लहानसासुध्दा थर तयार झाला असल्यास, तो निघून जातो नि चांदिची भांडी लखलखीतच राहतात.”

“हरे राम, हरे कृष्ण,कृष्ण कृष्ण हरे हरे! ”

“आता तुला काय झालं गधड्या.”

“मावशे, मी माझ्यासाठी नाही,मालकीनबाईंसाठी म्हणालो. अधूनमधून चांदिची भांडी स्वच्छ करण्यासाठी त्यांना सुबुध्दी मिळावी. त्यांनी, तुझ्यावरच हात चालवण्याऐवजी या भांड्यावरही हात चालवावा, म्हणून…”रॉबिन्सन डोळे बारीक करत म्हणाला.

मार्गारेटनेही बेडरुमच्या दरवाज्याकडे बघत, हरे राम हरे कृष्ण, असं पुटपुटून घेतलं.

सुरेश वांदिले