(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रॉबिन्सन उंदीर मामा दबक्या पावलानं, स्वयंपाकघराकडे जाताना दारातच मार्गारेट मनी मावशीने त्यांना अडवलं.

काय रे उंदरोबा, चोरी करण्याची सवय जात नाही तुझी. मावशी डोळे वटारुन मामांवर खेकसली.

अग मावशे, मी चोरी करायला आलो नव्हतो. मी इकडे आलो की तुला तसच वाटतं. परवा मी इकडे आलो तेव्हा माझ्या नाकात एक सुगंध शिरला.पण तुझ्या भीतिने मला त्या सुगंधापर्यंत काही जाता आलं नाही.

म्हणजे चोराच्या मनात चांदणं!

चांदणं नाही गं!  ते फ्रिजच्यावर काय ठेवलय? त्याचाच सुगंध असावा बहुतेक.

अरे उंदरोबा, ते चीज आहे!

मावशे, ते चीज बघायला आणि हादाडायला परवानगी दे की !

उंदरोबा तुलाही चीजचा चस्का लागला वाटतं.

म्हणजे आणखी कुणी आहे का, त्याच्या मागावर?

उंदरोबा, या मान्सांना चीज भारी आवडतं. त्यांची मूलं सतत चीजचा हट्ट करतात. त्यांचे आईबाबासुध्दा हा हट्ट आनंदानं पुरवतात.

मावशे, मानसांना हा चीज इतका कां बरं आवडत असावा ? मामांनी विचारलं.

आपण याचा शोध घेऊ या का? मावशी म्हणाली.

पण कसं गं, मावशे?

तू बघच आता…असं म्हणून मावशी चीजच्या भांड्याकडे बघत मंत्र म्हणू लागली.

अकडम तिकडम गुंडा फू!

चीजूरे, बोल आता भडाभडा तू!!

या मंत्राचा प्रभाव पडून चीज दोघांच्या समोर उभा  राहिला.

हाय मावशी, हाय मामा, कशी काय आठवण झाली आज माझी? चीजने दोघांनांही विचारलं.

हाय चीज्या,या मामाला तुझा जन्म कसा होतो? मान्सांच्या मुलांना आणि मोठ्यांनासुध्दा इतका तू कां आवडतोस? हे जाणून घ्यायची इच्छा झालीय.

सांगतो की. तर माझे आईबाबा म्हणजे, दूध! माझा जन्म घडवण्यासाठी फॅक्ट्रीमध्ये मोठ्या भांड्यात दुधाला आंबवायला किंवा विरजण करायला टाकतात. दुधामध्ये व्हे (whey) आणि कॅसेन (casein) अशी दोन प्रथिनं असतात. शिवाय दुधात लॅक्टोज नावाची साखरही असते. माझ्या जन्माची पहिली पायरी म्हणजे लॅक्टोजचं रुपांतर लॅक्टिक ॲसिड मध्ये करणं! त्यासाठी माझ्यात बॅक्टेरिया टाकतात.

म्हणजे रे काय चीज्जू? मावशीनं विचारलं.

या बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्म जिवाणू! दुधाचं लॅक्टिक ॲसिङ झालं की मग त्यात रेनेट नावाचं एनझाइम(enzyme), विरजण घालण्यासाठी टाकतात. आता हे एनझाइम म्हणजे उत्प्ररेक.  तो एक प्रकारचा रासायनिक पदार्थ असतो. दुधासारख्या पदार्थांमध्ये टाकला की तो रासायनिक क्रियेला साहाय्य करतो. या प्रक्रियेत त्याच्यामध्ये काही रुपांतर होत नाही. एन्झाइममुळे केसेन प्रथिनाचं विरजण होतं आणि व्हे प्रथिन पाण्याच्या सूक्ष्म लकेरीच्या स्वरुपात बाहेर राहतं. या व्हेला बाजूला काढलं जातं. मग त्यात मीठ टाकून पुन्हा विरजायला उष्णतेवर ठेवलं जातं. त्यातून पुन्हा व्हे प्रथिन बाहेर काढलं जातं. ते पूर्णपणे बाहेर निघालं की केसिन प्रथिनाच्या गुठळया किंवा ठोकळे होतात. या ठोकळ्यांना किंवा गुठळ्यांना मग साच्यामध्ये टाकून त्याला वेगवेगळे आकार दिले जातात. मग त्याला पॅकबंद करतात. माझा आकार, माझा रंग आणि माझा गंध हे कोणत्या प्राण्याचं दूध असतं यावर अवलंबून असतं.

म्हणजे रे काय चीज्जू? मामांनी विचारलं.

अरे, मामू माझ्या जन्मासाठी गाय, म्हैस, सांबर, उंट, शेळी, मेंढी, याक या प्राण्यांचं दुध वापरलं जातं.

कित्ती छान! पण कायरे, तू या मानवास इतका कां आवडतो? मावशीनं विचारलं

मावशे, या मान्सांना असं आढळून आलं की चीजमध्ये ए, डी, के नावाचं जीवनसत्वं, झिंक (जस्त) आणि जीवनसत्व बी १२ मोठ्याप्रमाणावर असतं. ही सर्व जीवनसत्वे मान्सांच्या शरीराच्या वाढीसाठी, त्याला सुदृढ करण्यासाठी उपयुक्त ठरतात. जीवनसत्व ए, हे चांगल्या दृष्टीसाठी, पेशींच्या वाढीसाठी, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी उपयुक्त ठरतं. जीवनसत्व डी दात, हाडं बळकट करतात, प्रतिकारशक्ती वाढवात. मधुमेह होण्यापासून सरंक्षण करतात. ह्रदयरोगाचा धोका कमी करतात. विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांपासूनही बचाव करतात. जीवनसत्व के, हे रक्त गोठण्यास मदत करतात. त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात. जस्त जीवनसत्वामुळे प्रतिकारशक्ती वाढते. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. हाडांची झिज होण्यापासून बचाव करण्यासाठीही माझा उपयोग होतो. बी-१२ जीवनसत्वाचा उपयोग लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी होतो. मेंदू आणि मज्जासंस्थांतील पेशीच्या विकासासाठी होतो.

पण काय रे, चांगल्या गोष्टींशिवाय काही वाईट गोष्टीही असतील ना तुझ्यात! मावशीने विचारलं.

मावशे, चीजचं अतिरिक्त सेवन केलं की उच्च रक्तदाबाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे ह्रदयाच्या कार्यक्षतेवर परिणाम घडू शकतो. त्वचेवर परिणाम होऊ शकतो. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. अन्नाचं पचन जड जातं.

कळलं का मामा तुला?

कळलं मावशे.काहीही खा पण ते मर्यादित खा.अधाशासारखे खाऊ नका.

उगाच लाडीगोडी लावू नकोस.पटकन थोडसं चीज खा नि पळ इथून, मालकीनबाई येण्याच्या आधी! मी तुला सोडलं.पण ती कजाग बाई नाही सोडायची.

मान्सांचं काही कळतच नाही बाँ…असं म्हणून मावशीच्या मिशीला हलकासा पाय लावून मामा चीजवर तुटून पडला. तो बका बका खातोय हे दिसल्यावर मार्गारेटने त्याची शेपटी धरली नि उचलून त्याला खिडकीच्या मावशीने त्याला बाहेर ढकलून दिलं. तिच्याही तोडांला पाणी सुटलचं होतं! उरलेल्या चीजवर तिने यम्मी म्हणत ताव मारायला सुरुवात केली…

सुरेश वांदिले