तो जेव्हा जन्मायचाच होता, तेव्हाच त्याच्या आईला वाटू लागलं होतं की, आपलं होणार बाळ, उत्तम चित्रकारच होणार. आईचं हे वाटणं त्या बाळानं खरोखरच खरं करुन दाखवलं. तो जेव्हा आठ महिन्यांचा झाला, तेव्हा त्याने पहिलं पेंटिंग रंगवलं. दोन वर्षाचा होता होता, पुण्याच्या, ‘आर्ट टू गॅलरित’ त्याचं पहिलं चित्रप्रदर्शन भरलं. तो कुक्कुलं बाळ असतानाच, ‘कसं रंगवायचं’ हे त्याला चांगलं कळू लागलं होतं. जणू काही तो आईच्या पोटातच चित्र रंगवण्याची कला शिकलाय. पण प्रत्यक्षात त्याने चित्र रंगवायला सुरुवात केली, तेव्हा त्याला कुणीही काहीच शिकवलं नाही.
रंगातील त्याची गती आणि रस बघून त्याच्या आईबाबांनीसुध्दा त्याला एखादा गुरु किंवा शिक्षकाकडे चित्रकलेच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं नाही. ‘असं जर केलं असतं तर त्याची स्वत:ची शैली निर्माण झाली नसती. तो शिक्षकाच्या शैलीच्या प्रभावाखाली येऊन त्यांची नक्कल करत बसला असता,’ असं त्याच्या आईला वाटतं.
रंगाशी खेळत खेळत तो चित्रकलेच्या विविध ‘कला” आत्मसात करत गेला. वयाच्या चौथ्या वर्षी त्याच्या एकट्याच्या (सोलो) पेंटिग्जंचं प्रदर्शन कॅनडात लागलं. ही प्रदर्शनी दोन महिने तिथे होती. त्याची सगळी चित्रं चार दिवसात विकल्या गेली. गेल्या वर्षीच्या जून-जुलैमध्ये अमेरिकेतील लागुना बीच, तोहोइ लेक, लास वेगास, की वेस्ट आणि फोर्ट लौडेरडेल येथे त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं. त्यानंतर त्याला यंदा जानेवारी ते मार्च या कालावधीत अमेरिकतील चार प्रमुख आर्ट गॅलरित (कला दालन) एकल प्रदर्शिनीसाठी निमंत्रित केलं गेलं. आतापर्यंत जगातील वेगवेगळया आर्ट गॅलरिंमध्ये १९ एकल आणि समुह कला प्रदर्शनिमध्ये तो सहभागी झालाय. नुकतंच त्याचं एक पेंटिग १६ हजार ८०० डॉलर्सला म्हणजेच १४ लाख ८७ हजार रुपयांना विकलं गेलं. आतापावेतो त्याच्या विकल्या गेलेल्या कलाकृतिंची किंमत ३ लाख डॉलर म्हणजेच २६ कोटी ५ लाख ५६ हजार रुपये इतकी भरते. तो स्वत:ला अर्मूत (ॲबस्ट्रॅक्ट) कलावंत मानतो. त्याच्यावर जॅकसन पोलॉक या जागितिक कीर्तिच्या चित्रकाराचा पगडा आहे. पण त्याचबरोबर त्याला प्राणी, डायनोसार, ड्रॅगन यांचीही चित्र काढायला आवडतात.
पेंटिंगमधील त्याच्या या अदभूत कलागुणांमुळे त्याच्याकडे विविध पुरस्कार चालून येताहेत, २०२० साली त्याला ग्लोबल चाइल्ड प्रोडिगी अवॉर्ड, २०२३ साली सगळ्यात तरुण टेडेक्स व्याख्याता म्हणून, एशिया बूक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स, २०२२ साली बीवायजेयूएस यंग जिनियस ॲवार्ड, २०२० साली ग्लोबल स्टॉर किड ॲवार्ड, २०२३ साली इंटरनॅशलन स्टॉर किड ॲवार्ड यांनी तो सन्मानित झालाय.
त्याच्या वयाची मुलं जेव्हा कार्टून आणि क्रिकेटमध्ये रंगून गेली असतात, तेव्हा हे महाशय रंगांच्या दुनियेत गुंग झालेले असतात. त्याचा आवडता रंग आहे काळा. कारण त्याचं सांगण आहे की सगळे रगं एकमेकात मिसळवले की त्यांचा काळाच रंग होतो. काळ्या रंगासोबत त्याला भीतीदायक म्हणजेच हॉरॅर कथा खूप आवडतात. त्यामुळे अशाच कथांचं एक पुस्तकही तो लिहितोय.
तर असा हा अव्दैत कोलारकर. वय वर्षे ११. हल्ली मुक्काम पुणे.
सुरेश वांदिले