
रहस्य?
राजराजेश्वर महाराज दररोज सकाळी उठल्याबरोबर एका गुप्त ठिकाणी जात. ते ठिकाण त्यांच्याशिवाय कुणालाही ठाऊक नव्हतं. महाराणींनी कधी त्याबद्दल महाराजांना विचारलं नाही. मात्र, महाराजांचे दोन्ही मुलं, राजपुत्र सिंगू आणि राजपुत्र बिंगू, हे मोठे होऊ लागताच, त्यांचं कुतुहल जागृत झालं. त्या दोघांनी महाराणींना विचारलं. पण त्यांना काहीच ठाऊक नव्हतं.
“राजराजेश्वरांना विचारुन सांगा ना आईसाहेब.” दोन्ही राजपुत्रांनी विनंती केली.
“नकोरे बाळांनो, महाराजांना ते आवडायचं नाही.”
“कां आवडायचं नाही? उलट, त्यांनी स्वत:हून तुम्हाला कधीचच त्याविषयी सांगायला हवं होतं. असं काही लपवून ठेवायचं असतं का?” राजपुत्र सिंगूने विचारलं. राजपुत्र बिंगूनेही असचं मत व्यक्त केलं. महाराणी काहीच बोलल्या नाहीत. मात्र, महाराजांनी आपणास कां बरं सांगितलं नसेल, हा विचार त्यांच्या मनात, भुंग्यासारखा भुणभूणू लागला. आईसाहेब काहीच बोलत नाही, हे बघून दोघेही राजपुत्र तिथून निघून गेले.
दिवसेंदिवस त्यांची उत्सुकता वाढतच गेली. एकदा राजपुत्र बिंगूने हिम्मत करुन महाराजांना, विचारलं. यावर महाराज संतापले. योग्य वेळ आली की सांगेन असं सांगून, दोन्ही राजपुत्रांना चांगलच फैलावर घेतलं. महाराज आपल्याला सांगणार नाही, हे दोघांच्याही लक्षात आल्याने, आपणच आता याचा छडा लावायचा, असं सिंगू आणि बिंगूने ठरवलं.
एके दिवशी महाराज नेहमीप्रमाणे गुप्त ठिकाणी जाण्यास निघाले. महाराणींना चकवा देऊन दोन्ही राजपुत्र त्याचवेळी महाराजांच्या पाठीमागे, त्यांना लक्षात येणार नाही, अशा पध्दतीने लपतछपत जाऊ लागले. काही वेळाने महाराज जंगलाच्या आत असणाऱ्या, गर्द घनदाट वनराईत शिरले. तिथे प्रकाशसुध्दा पोहचत नव्हता. वेगवेगळया प्रकारची प्रचंड मोठमोठी उचंच उंच झाडं एकमेकांना खेटून उभी होती. त्यांचे चित्रविचित्र आकार बघून दोन्ही राजपुत्रांना भीती वाटू लागली. महाराज, पुढेपुढे जात होते. एके ठिकाणी एका भल्यामोठ्या झाडाच्या ठिकाणी ते थांबले. त्या झाडाच्या ढोलीत, हात टाकून त्यांनी काहीतरी बाहेर काढले. दोन्ही राजपुत्र त्यांच्याकडे काळजीपूर्वक बघत होते. महाराजांच्या हातात एक पुस्तक होते. महाराजांनी भक्तीभावाने ते तीन वेळा कपाळाला लावून, पुन्हा त्या झाडाच्या ढोलीत ठेवले. झाडाला प्रदक्षिणा घालून महाराज माघारी वळले. दोन्ही राजपुत्र त्यांच्या पाठीमागून राजवाड्यात परतले.
दोघांची उत्सुकता आता शिगेला पोहचली. त्या पुस्तकात काय रहस्य असावं, याचा ते विचार करु लागले. महाराजांना विचारणं शक्यच नव्हतं. चोरुनलपून जाण्याची सोय नव्हती. दोन्ही राजपुत्र निराश झाले. मात्र, एकदा राजराजेश्वर महाराजांना, शेजारच्या राज्यातील, सोमेश्वर महाराजांच्या राजकन्येच्या विवाहासाठीचे निमंत्रण मिळाल. महाराज व महाराणी दोन दिवसांसाठी सोमेश्वर महाराजांच्या नगरीत गेले.
पुस्तकाचं रहस्य जाणून घेण्याची, अशी चांगली संधी पुन्हा येणार नाही, हे दोन्ही राजपुत्रांच्या लक्षात आलं. महाराज आणि महाराणी, सोमेश्वर महाराजांकडे कुच करताच सिंगू आणि बिंगूने गर्द घनदाट वनराईकडे प्रयाण केलं.
त्या भयाण वातावरणाची भीती वाटत असूनही ते मोठ्या हिमतीने, याठिकाणी पोहचले. त्यांनी, ते मोठे झाड बरोबर शोधले. राजपुत्र सिंगूने ढोलीत हात घालून पुस्तक बाहेर काढले. एकएक पान उलटून, वाचू लागले. वाचतावाचता एका पृष्ठावर ते थबकले. त्यांना दरदरुन घाम फुटला. मोठ्या अरिष्टाची नोंद तिथे होती.
“पण सिंगू, यावर विश्वास ठेवायचा कसा?”
“ते नंतर ठरवू. आधी आपण महाराजांना गाठले पाहिजे.” बिंगू लगबगीने म्हणाला.
“काय सांगणार त्यांना? आपण चोरुनलपून हे पुस्तक बघितल्याचं कळताच, ते आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत.” सिंगू घाबरुन म्हणाला.
“जे होईल ते होईल. त्याचा विचार नको. आता ती वेळ नाही. महाराजांना आपण तातडीने गाठलेच पाहिजे.” बिंगू म्हणाला. सिंगूला त्याचं म्हणणं पटलं.
दोन्ही राजपूत्र वेगाने धावत सुटले. काही वेळाने ते सोमेश्वर महाराजांच्या दरबारात पोहचले. त्यांचे पिताश्री, सोमेश्वर महाराजांच्या दरबारात पोहचून आसनस्थ झाले होते. सेवकांनी त्यांच्यापुढे काही पेय आणली. राजराजेश्वर महाराज आणि महाराणी ते पेय घेणार, तोच तिथे धापा टाकत पोहचलेल्या राजपुत्र सिंगू आणि बिंगूने त्यावर झेप घेऊन पेय खाली पाडले.
या अनपेक्षित प्रकाराने महाराज राजराजेश्वर गडबडून गेले. सोमेश्वर महाराज सिंहासनावरुन ताडकन उभे राहिले.
“तुम्ही इथे काय करत आहात? राजराजेश्वरांनी, रागावून, सिंगू आणि बिंगूला विचारलं.
“महाराज त्या सांडलेल्या पेयाकडे आधी बघा. नंतर आम्हाला रागवा.” सिंगू म्हणाला. राजराजेश्वरांनी पेयाकडे बघितलं. त्यापेयामुळे माशा, किटक मरुन पडले होते.
“महाराज इथे धोका आहे. आधी इथून तातडीने बाहेर पडा. राजराजेश्वरांना आता धोक्याची जाणीव झाली. त्यांनी महाराणींना इशारा केला. चौघेही सोमेश्वर महाराजांच्या दरबारातून बाहेर पडले. वेगाने आपल्या नगरीकडे निघाले. सुरक्षित ठिकाणी पोहचल्यावर चौघेही विश्रांतीसाठी थांबले. बाजुलाच नदी वाहत होती. तिथे जाऊन चौघांनी पाणी प्राशन केलं. चौघेही एका झाडाच्या सावलीखाली बसले.
“सिंगू-बिंगू, तुम्ही असे अचानक, कसे काय पोहचलात, सोमेश्वर महाराजांच्या दरबारात?” राजराजेश्वरांनी जरबेनं विचारलं.
“अहो, ते पोहचले म्हणून आपले प्राण वाचले. आपल्या दोघांवरील विषप्रयोगाचा, सोमेश्वराचा मनसुबा माझ्या लेकरांनी उधळून लावला.”
“त्याची शिक्षा त्या सोमेश्वरास आम्ही देऊच. पण, तुम्हा दोघांना आम्ही संकटात आहोत, ते कसं कळलं?” राजराजेश्वरांनी विचारलं.
सिंगू आणि बिंगूने मान खाली घातली.
“काय झालं?” राजराजेश्वरांनी विचारलं.
“महाराज क्षमा असावी.” सिंगू म्हणाला.
“कशासाठी? तुम्ही गुन्हा थोडाच केला आहात.” महाराणी प्रेमानं म्हणाल्या.
“आम्ही गुन्हाच केलाय.” सिंगू मान खाली करुन बोलला.
“स्पष्टच बोला.”महाराज गरजले.
“महाराज, झाडच्या ढोलीतील पुस्तक आम्ही चोरुनलपून बघितलं.”
“काय?” महाराज जोरदार आवाज करत ताडकन उठले. दोन्ही राजपुत्र थरथर कापू लागले. महाराणीही घाबरल्या. संतापाच्या भरात महाराज काहीही करु शकतात, हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे महाराजांसमोर धिटाईने उभ्या राहिल्या.
“महाराणी, या दोघांना शिक्षा व्हायलायच हवी.”
“त्यांनी असा कोणता गुन्हा केलाय महाराज? उलट त्यांनी आपले प्राण वाचवले, हे लक्षात घ्या.”
“त्यांनी, आपल्या पुर्वजांचं पुस्तक चोरुनलपून बघितलं, याची शिक्षा व्हायलाच हवी.”
“महाराज, याच पुस्तकाच्या ५५० पृष्ठावर तुमच्या जीवाला, शेजारच्या महाराजांकडून धोका असल्याचं आम्हाला कळलं. या पुस्तकात ते नमूद आहे.” धिर धरुन सिंगू म्हणाला.
“ते वाचताच तुमच्याकडे धावत सुटलो.” बिंगू आणखी धिटाईनं म्हणाला.
“तुम्हाला कसं दिसलं नाही, हे लिहिलेलं?” आता महाराणींनी जोरात विचारलं.
“नाही म्हणजे…” महाराज शांत होऊन चाचरत म्हणाले.
“नाही म्हणजे काय? तुम्हाला तुमच्यासोबत माझाही जीव संकटात टाकायचा होता की काय?” महाराणी रागावून म्हणाल्या.
“महाराणी, आपण हे अभद्र काय बोलता?”
“या मुलांना जे, त्या पुस्तकात दिसलं, ते तुम्हाला कां दिसलं नाही?” महाराणींनी पुन्हा रागाने विचारलं. यावर महाराजांची मान खाली गेली.
“आता, तुम्ही बोलत कां नाही?”
“महाराणी, आम्ही ते पुस्तक कधीच उघडून बघितलं नाही. आम्ही दररोज सकाळी गुप्त ठिकाणी जाऊन या पुस्तकाचं दर्शन घेत असू. आमच्या पूर्वजांचे हे पवित्र पुस्तक आहे.”
“या पवित्र पुस्तकात काय आहे, हे बघण्याची उत्सुकता तुम्हाला कां झाली नाही? मुलांनांही त्यापासून वंचित ठेवलं. त्यांनी चोरुनलपून जर हे पुस्तक बघितलं नसतं तर, विचार करा, आज किती मोठा अनर्थ झाला असता?” महाराणी चिडून म्हणाल्या.
“चुकलच माझं.” महाराज बारीक आवाजात म्हणाले.
“अहो महाराज, आपल्याकडे जे ज्ञान असतं, जे गुपित असतं ते दडवून काही उपयोग होत नसतो. तुमच्या पिताश्रींनी तुम्हाला काय सांगितलं ते, मला माहीत नाही. पण तुम्हाला जे वारस्यात मिळालं, ते जाणून घेण्याची तसदी तुम्ही घेतली नाही. पुस्तकाला भक्तीभावाने नमस्कार करुन ज्ञान मिळत नाही. पुस्तकाला भक्तीभावाने वाचल्यावर ज्ञानप्राप्ती होते.” महाराणी म्हणाल्या. महाराजांनी आपली चूक मान्य केली. ते, महाराणी आणि दोन्ही राजपुत्रांसह गुप्त ठिकाणी असलेल्या झाडाजवळ आले. त्यांनी ढोलीतून पुस्तक बाहेर काढलं.
राजवाड्यात आल्यावर चौघांनींही, या पुस्तकाचं सामुहिक वाचन केलं. राज्याच्या हिताच्या अनेक गोष्टी या पुस्तकात होत्या. हे पुस्तक आधीच वाचले असते तर, सम्राटाचे, चक्रवर्ती सम्राट झालो असतो, असं महाराजांच्या लक्षात आलं. यापुढे कोणतीही गोष्ट महाराणी आणि मुलांपासून लपवून ठेवायची नाही असं त्यांनी मनोमन ठरवलं.
सुरेश वांदिले