(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अमेरिकेत राहणारी कल्याणीची चुलत बहीण वैष्णवी, काही दिवसांपूर्वी ‍तिच्याकडे आली होती. कल्याणीच्या घरी असलेली मांजर तिला फार आवडली. काळ्या पांढऱ्या रंगाची, घाऱ्या डोळ्यांची, चालण्यात वेगळी ऐट असलेली ही मांजर कुणालाही आवडेल अशीच होती. कल्याणीच्या घरी तिचे फार लाड आणि कौतुक होत असे. मांजरिने वैष्णवीकडे बघितलं. पण ती काही तिच्याकडे लगेच आली नाही. तिने मांजरीचा लाड करण्याचा प्रयत्न केला तर तिने नख बाहेर काढून वैष्णवीवर पंजाच उगारला. नख वैष्णवीस लागलं. त्यातून रक्तही निघालं. त्यामुळे वैष्णवी किंचाळली. कल्याणी लगेच धावली,

“चिंगटले, पाहुण्यांशी असं वागता का?” कल्याणी मांजरीवर डोळे वटारुन म्हणाली. मांजर दुसरीकडे पळाली.

“चिंगटले?” हे काय, वैष्णवीनं विचारलं.

“अगं, या आमच्या लाडूबाईचं नाव.”

“चिंगटले, असं?”

“अगं खरं नाव चिंगी आहे. तिचं लाड करताना आम्ही मग चिंगू, चिंगटली असं बोलावतो. रागवायचं असेल तर चिंगटली म्हणतो.”

“चिंगी, चिंगू, चिंगटली, हे काय नाव झालं?”

“म्हणजे, यात काय वाईट आहे बरं?” कल्याणीने विचारलं. या दोघी बसलेल्या सोफ्यावर चिंगी अलगद येऊन बसली. वैष्णवी घाबरुन उठू लागली. पण कल्याणीने तिला बसवलं. तिचा हात घेऊन चिंगीच्या पाठीवरुन फिरवू लागली. कधी वैष्णवीकडे तर कधी कल्याणीकडे बघत चिंगीने डोळे मिटले नि दोघींच्यामध्ये पसरली. वैष्णवीने थोडावेळ चिंगीला प्रेमाने थोपटले. चिंगी आणखी गाढ झोपी गेली.

दुपारी जेवण्याच्या टेबलवर, वडापाव खाताना, चिंगी टेबलवर आली. कल्याणीचे बाबा, तिला रागावत म्हणाले, “चिंगे तुला कितीदा समजावलं, आम्ही खाताना इथे यायचं नाहीस. तू काही शहाणी होतच नाहीस.” असं म्हणून त्यांनी चिंगीच्या मानेला हळूवार पकडून  बाजूच्या सोफ्यावर ठेवलं.

“काका, तुम्हीसुध्दा चिंगे म्हणता हिला.” वैष्णवीने विचारलं.

“अगं, लाडाचं नाव आहे ते.”

“पण हिचं नाव कसं भारदस्त असावं असं नाही का वाटलं तुम्हाला?”वैष्णवी म्हणाली.

“म्हणजे गं काय?”वैष्णवीच्या आईनं विचारलं.

“ही मांजर कशी छान दिसतेय, एखाद्या राजकन्येसारखी.”

“आहेच हो तशी चिंगी.”

“पण काकू राजकन्येचं नाव चिंगी कसतरीच वाटत ना. राजकुमारी चिंगी. असं म्हणायला सुध्दा कसंतरी वाटतं.”

“मग तुझं म्हणणं काय?”

“हिला साजेसं नाव दिलं तर”

“बरंबाई, सुचव तूच असं साजेसं नाव.” कल्याणीचे बाबा म्हणाले. वैष्णवी विचार करु लागली. कागदपेन घेऊन तिने काही नावं लिहून काढली. थोड्यावेळयाने ती म्हणाली,

“चिंगीसाठी नाव मिळालंय मला काका.”

“मग सांग की.” कल्याणी उत्सुकतेनं म्हणाली.

“राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य!” वैष्णवी म्हणाली. सगळयांनी डोळे विस्फारले. काही क्षण शांततेत गेले. मग सगळेजण फिस्सकन हसले. वैष्णवी हिरमुसली. ते बघून कल्याणीच्‍या बाबांनी तिला जवळ घेत म्हणाले,

“अगं, तू नाराज कां होतेस. आपण ठेऊ या की हेच नाव.” वैष्णवीच्या चेहऱ्यावर हसू आलं. बाबांनी कल्याणीस, चिंगीला घेऊन यायला सांगितलं. तिच्या घरात झोपलेल्या चिंगीस घेऊन कल्याणी आली. बाबांनी चिंगीला स्वत:कडे घेतलं. तिच्या डोळयात बघत तिला म्हणाले,

“चिंगू मॅडम, आजपासून तुमचं नाव राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य!” चिंगू मख्ख. तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. कल्याणीच्या आईने तिला हातात घेऊन म्हंटल, “चिंगूबाई आजपासून तुझं नाव राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य!” पण चिंगूबाईने हे ऐकलाचं न ऐकून दुसरीकडेच मान वळवली. आता कल्याणीने तिला हातात घेतले नि तिला म्हणाली,

“ चिंगी डार्लिंग, आजपासून तुझं राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य!” चिंगीने एक क्षण तिच्याकडे बघितलं नि चटदिशी डोळे मिटले. आता तूच हिच्या कानात सांग तिचं नाव, कल्याणी वैष्णवीस म्हणाली,

वैष्णवीने कल्याणीच्या हातात असलेल्या चिंगीच्या कानात नवं नाव पुटपुटलं.

झालं आता चिंगीचं नामकरण, आतापासून तिला राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य या नावानेच बोलवायचं. बाबा म्हणाले.

 चिंगीला कल्याणीजवळ कंटाळा आला असावा, तिने तिच्या हातातून सुटण्यासाठी धडपड सुरु केली. कल्याणीने तिला काही सोडलं नाही तेव्हा तिने नखांचा पंजा तिच्या उगारला,

“राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य, असं शहाणं बाळं वागतात का?” बाबा म्हणाले. चिंगीला काहीच कळलं नाही. तिने दुसऱ्या पंजाने कल्याणीला मारलेच. कल्याणीने लगेच तिला खाली ठेवलं.

“राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य, हे असं वागणं बरं नव्हे. पाहुण्यांना काय बरं वाटेल.” बाबा चिंगीला म्हणाले.

पण चिंगी मख्ख. आपण ठेवलेलं नाव काही चिंगीला पसंत पडलेलं नाही म्हणूनच ती दुर्लक्ष करतेय असं वैष्णवीला वाटलं. तिचा चेहरा पडला. ते बघून कल्याणीच्या आईने तिला जवळ घेवून समजावलं,

“अगं, या मुक्या प्राण्यांना अशा भारदस्त नावाची काही गरज नसते. त्यांना फक्त, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह हवा असतो. हे जर नसेल तर मग त्यांना कितीही भारदस्त नाव द्या, त्याचा काही उपयोग नाही. हो ना ग, राजकुमारी कर्णावतीदेवी राजराजेश्वर मौर्य,” आईने चिंगिला म्हंटलं. चिंगीने आईकडे पूर्ण दुर्लक्षच केलं. ते बघून बाबा तिच्यासमोर येऊन म्हणाले, “चिंगटले, आई म्हणाली ते बरोबरय ना.” चिंगीने झरदिशी मान वळवून बाबांकडे बघितलं, नि मँऊ मँऊ केलं. कल्याणीने वैष्णवीकडे बघितलं. वैष्णवी हसली. “काय गं चिंगे,”तिच्या तोंडून निघालं. चिंगी हळूच तिच्यापायाशी आली आणि लाड करुन घेऊ लागली.

सुरेश वांदिले